मित्र-बित्र मी जोडत आलो, तोडत आलो वळणांवरती;
वार्यासंगे बागडलो जणु माझे नभ अन् माझी धरती!
कधी उधळलो स्वच्छ प्रकाशी, वाटुन घेतला कधी अंधार;
आपले आपले एक तंत्र मग, टांगा पलटी घोडा फरार..!
गाउन झाली गाणी-बीणी, हात-बीतही होते हातात;
'ती' माझे सर्वस्वही होती, अन् मीच मग तिच्या जगात!
आज मात्र 'ती' झाली परकी, आज संपला अलिखीत करार;
आपले आपले एक तंत्र मग, टांगा पलटी घोडा फरार..!
थोडा झालो मोठा-बिठा, कष्टही ओवले मज ताग्यात..
यश-बिशही खेचुन आणिले, कधी न होते जे भाग्यात!
साम-दाम-दंड-भेदाने विजयी, जरी तत्त्वांची दुर्दैवी हार
आपले आपले एक तंत्र मग, टांगा पलटी घोडा फरार..!
ऊन्हे-बिन्हेही झेलून झाली, जवळी आली संध्याकाळ,
डबके झाले मज प्रवाहाचे, जिथे जळाहुन जादा गाळ!
अशात जाहले केस पांढरे, बोथट झाली शस्त्रांची धार;
आपले आपले एक तंत्र मग, टांगा पलटी घोडा फरार..!
1 comment:
You've a nicely done site with lots of effort and good updates. I would like to welcome you to submit your stories to www.surfurls.com and get that extra one way traffic to your site.
Post a Comment