रमला न जीव येथे, कोणा लगाव नाही
वेल्हाळ माणसांना येथे उठाव नाही
गर्दी अनोळख्यांची वाटे हवीहवीशी
नजरेत घोळक्याच्या कावा, बनाव नाही
सामान्य लोक आले, असहाय्य पाहुनी मज
जे नामवंत होते त्यांचाच ठाव नाही
गर्भार मेघमाला, आषाढमास दाई
का कोंडल्या जळाला तरिही बहाव नाही
कैदेत शैशवी मी, कैदेत यौवनीही
बाहूत बंधनांच्या मुक्तीस वाव नाही
वात्सल्यकैद सरता, तारुण्य इंद्रियांचे
फेरा अखंड चाले, मरुनी बचाव नाही
मी आळवू पहातो बाल्यातला सुरांना
ओठांस भैरवीचा अजुनी सराव नाही
आत्म्या, निलाजरा तू, तुज पेहराव नाही
कवी - मिलिंद फ़णसे
No comments:
Post a Comment