माझ्यावरीच केवळ हे भाळलेत काटे
वा काळ होउनी हे सोकावलेत काटे
म्हटले गुलाब टाळू, टाळू मजेत काटे
जाईजुईतही पण बोकाळलेत काटे
लिहिलीत प्रेमपत्रं रक्ताळल्या करांनी
मार्गातुनी सखीच्या मी वेचलेत काटे
करता गुन्हा जरासा सुमनांस स्पर्शण्याचा
दुमडून अस्तन्यांना सरसावलेत काटे
केली न मी फुलांशी त्यांची जरी चहाडी
जखमा करून आता संकोचलेत काटे
केले मला फुलांनी घायाळ एव्हढे की
लाजून शुश्रुषेला सरसावलेत काटे
हसुनी फुलं म्हणाली उमलून सांजकाली
नाही, मिलिंद, धोका, सुस्तावलेत काटे
कवी - मिलिंद फ़णसे
No comments:
Post a Comment