काही काही गोष्टी
मला अजूनही कळत नाहीत
एका पावसात
वाहून जातात गावंच्या गावं
अतीवृष्टीमुळे...
आणि पाठोपाठच्या उन्हाळ्यात
गावा गावांतून
नाहीशी होते वीज,
धरणात पाणी नसल्याच्या नावाखाली...
कोसळून वाहून जाणाऱ्या पाण्याचे
हिशोब काही जुळत नाहीत
काही काही गोष्टी
मला अजूनही कळत नाहीत
गावांपासून देशापर्यंतच्या
सर्वच अर्थसंकल्पांमधे
पाहत असतो आम्ही
घशाला कोरड पाडणारी तूट
आणि उत्तरोत्तर वाढत जाणारे
कर्जाचे डोंगर
आणि पाठोपाठच्या महिन्यांत
वाचत रहातो बातम्या
खासदारांच्या वाढत्या भत्त्यांच्या
आणि शेतकऱ्यांच्या माफ केलेल्या कर्जांच्या
तिजोऱ्यांतून गायब होणाऱ्या पैशांचे
हिशोब काही जुळत नाहीत
काही काही गोष्टी
मला अजूनही कळत नाहीत
पाणी असो वा पैसा
आल्या गेल्याचा हिशोब नाही
येण्या जाण्याचं नियोजन नाही
अकलेच्या दुष्काळात रहाण्याचे
आमचे भोग काही टळत नाहीत
काही काही गोष्टी
मला अजूनही कळत नाहीत...
No comments:
Post a Comment