कविता शोध

माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.

आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/


Friday, August 31, 2007

म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही.....

कितीही सुंदर मुलगी दिसली तरी,
तिची स्तुती करुन तिला
हरबरयाच्या झाडावर चढवायला
आम्हाला कधी जमलेच नाही ॥१॥
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही.....

कोणाच्या मागे शिट्या मारत फिरणं
आमच्या तत्वात कधी बसलेच नाही ॥२॥
म्हणुन आम्हाला प्रेम ..

कोणी जर आवडलीच तर
स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला
आम्हाला कधी जमलेच नाही ॥३॥
म्हणुन आम्हाला प्रेम ..

दुसरयाचे विचार ऎकत असतांना
आपले विचार मांडण्याची संधी
आम्हाला कधी साधताच आली नाही ॥४॥
म्हणुन आम्हाला प्रेम ..

कधी हिंमत करुन कोणाला जर विचारलेच
तर मी तुला त्या द्रुष्टीने कधी बघितलेच नाही
याव्यतिरीक्त दुसरे काही
आम्हाला ऎकायलाच मिळाले नाही ॥५॥
म्हणुन आम्हाला प्रेम ...

प्रेमात नाहीचा अर्थ हो असतो
हे गणित आम्हाला कधी समजलेच नाही ॥६॥
म्हणुन आम्हाला प्रेम..

फुलपाखरा प्रमाणे आम्हीही
बरयाच सुदर फुलांमध्ये वावरत होतो
पण जाऊन बसण्यासारखे फुल
अजुन आम्हाला दिसलेच नाही ॥७॥
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही....

Friday, August 24, 2007

पाखरु आणि गरुड

एकेकाळी मी अंड्यात होतो, मझ्यासारखीच अंडी आजूबाजूला होती
त्या अंड्यांना चीकटून रहाताना, जवळजवळ रहायची सवय जडली होती

रहायला छान घरट होतं, उबेला आईचे पंख होते
वडीलांचा आदर्श घेउन, माझ्या पंखात बळ येत होते

एक दीवस सुर्याची आस धरुन मी आकाशात झेपावलो
उडता उडता लक्षात आले की आता मी एकटाच रहीलो

राजासारखं उडता उडता मला खाली जग दिसलं
फाजील गर्व जागा झाला आणी इथेच मनं फसलं

इतर पाखरही जवळ आली , आम्हालाही शिकव म्हणाली
बळकट पाखर जवळ रहीली, अशक्त मत्र हीरमुसुन गेली

असेच कही दीवस उडत थव्याबरोबर उंच गेलो
अचानक एक गरुड आला मी पुरता गोंधळलो

गरुडाला यापुर्वी मी कधी पाहीलच नव्हतं
आकाशात मझ्यावर कोणी राहीलच नव्हतं

गरुडाची उंची पाहुन मी बीचकलो तोराच बीथरला
मन सैरभैर झालं आणि सगळा माज उतरला

तो म्हणाला बरोबर चल तुला उंच आकाश दाखवतो
अथांग आकाशात तरंगायच कस ते मी तुला शिकवतो

पुढे कधीतरी चालुन तु ही एक गरुड होशील
पण एक वचन दे, इतर पाखरांनाही वर नेशील

Tuesday, August 21, 2007

आई...

दिवसभर कितीही दंगा केला
तरी मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाही
घरापासुन दूर आता म्हणूनच कदाचित
शांत झोप कधी लागली नाही

कुणी विचारतं ..
"तुला घरी जावसं वाटत नाही?"
कसं सांगू त्यांना, घरातून निघताना
आईला मारलेली मिठी सोडवत नाही

आई, तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठि डबा करायचा नसतो
तरीहि तू सहा वाजताच उठतेस

तुझ्या हातचा चहा
तुझ्या हातची पोळी
तुझ्या हातची माझी नावडती भाजीही खायला
आता जीभ आसुसली

घरापासून दूर ...
आई जग खूप वेगळं आहे
तुझ्या सावलीत अगदी बिंनधास्त होते
आता रणरणंत ऊन आहे

तू आपल्या पिलांसाठी
सगळं केलंस ...
एक दिवस पिलं म्हणाली, "आई आता आम्हाला जायचंय" ...
आणि तू त्यांना जाऊ दिलंस

Friday, August 17, 2007

शोधतोय...

आयुष्याच्या या वाटेवर

मी माझी वाट शोधतोय,

वाहणारे अश्रु येतात जिथुन

मी तो पाट शोधतोय..

मला व्यापलं आहे जीवनाने

अन,मी माझी जागा शोधतोय,

नात्यांच्या या रेशिम बंधातुन

मी माझा धागा शोधतोय...

मनात जे भरुन आहेत कधीचे

मी त्या श्वासांना शोधतोय,

जगण्याची जे उर्मी देतात

मी त्या ध्यासांना शोधतोय....

खरं सांगायचं तर मी

माझ्या हरवलेल्या स्वप्नांना शोधतोय.......

Thursday, August 16, 2007

काय मिळतं मोठं होवून..?

आइच्या अंगाई गीताने लागणारी झोप,
आता लागते झोपेच्या गोळ्या खावून..,
काय माहीत काय मिळतं मोठं होवून..?

बाबांनी बोट धरून शिकवलेले चालणे,
आता ते ही चालावे लागते काठीचा आधार घेवून..,
काय माहीत काय मिळतं मोठं होवून..?

आइने तेलाचा मारा करून वाढवीलेले केस,
आता ते ही लवकरच जातात डोकं सोडून..,
काय माहीत काय मिळतं मोठं होवून..?

मित्रां सोबत रात्रं-दिवस असायच्या Timepass गप्पा,
आता फ़क्त-"हाय! कसा आहेस..?" ते ही फ़ोन वरून..,
काय माहीत काय मिळतं मोठं होवून..?

शाळेत सरांच्या रागवण्यातही असायची एक मज्जा,
आता फ़क्त संताप-चिडचिड बॉसच्या बॉसींग वरून..,
काय माहीत काय मिळतं मोठं होवून..?

सारेच रमतात लहानपणीच्या आठवणींच्या जगात,
आणि जगतात-"I miss my teenage" म्हणुन..,
काय माहीत काय मिळतं मोठं होवून.

Tuesday, August 14, 2007

आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे...

घरकुल या चित्रपटामधून खास स्वातंत्र्यदिनानिमित्त...

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

येथे नको निराशा, थोडया पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जन शासनातळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

गीतकार :ग. दि. माडगुळकर

आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

तिला कळतच नाही...

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण ते शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुलं तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणंच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहीसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याचीच भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यासाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील

Monday, August 13, 2007

आलाय पाऊस….. भिजून घ्या

आलाय पाऊस….. भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस….. भिजून घ्या

बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस….. भिजून घ्या

ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस….. भिजून घ्या

सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या ..
आलाय पाऊस….. भिजून घ्या

बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
आलाय पाऊस….. भिजून घ्या

Sunday, August 12, 2007

आठवून पाहायचो मी...

आठवून पाहायचो मी काही पावसाळे
तिच्या-माझ्या संगतीत भिजलेले
हवेभोवती गंध घेवून
रानोमाळ पसरलेले. . .

आठवायचा अवचीत मग तो नदीकाठ
कमळ फुलांनी बहरलेला
चांदणीची वाट पाहत मग
तो चंद्र रात्र जागलेला. . .

जाणवायची नकळत मग ती बोचरी थंडी
गुलाबी स्वप्नातून जागवणारी
नुसतीच मग एक निरर्थक धडपड
अपूर्णतेतही पूर्णत्व शोधणारी. . .

आठवून यायची, तीची सारी वचने
अशीच कुठेशी मोडून पडलेली
प्रतिसादांना शोधणारी तीची प्रत्येक हाक
नियतीने माझ्यापासून दूर लोटलेली. . .

दाटलेलं धुकं मग सावकाश पाझरायचं
ओल्या होवून जायच्या तिच्या सगळया "आठवणी"
एखाद-दुसरां मग त्या चुकार थेंबानी
उगीचचं भरुन यायची माझी गोठलेली "पापणी"

Friday, August 10, 2007

अरेंज मॅरेज......एक ब्लाइण्ड गेम

पत्त्यांची जशी नेहमी "ब्लाइण्ड गेम" असते
तशी ठरवून केलेल्या लग्नाचीही असते......

तो-तिला नि ती-त्याला ओळखतही नसते
वीसेक लोकांत ओळख पटलेलीही नसते....

होकार असाच एका नजरेत द्यायचा असतो
बाकी सर्व नशिबावर सोडून द्यायचे असते...

काहींना कधी कधी असाच गुलामही मिळतो
तर काहींना कधी हुकूमी एक्का लाभतो....

काहीच्या नशिबी मात्र दुर्री-तीर्री च येते
कारण ही एक "ब्लाइण्ड गेम" असते....

येईल त्या पत्त्याने खेळून दाखवायाचे असते
जिंकून हरण्यापेक्षा,हरून जिंकायचे असते....

कारण "ब्लाइण्ड" जरी असली तरी
ही आयुष्याची "गेम" असते...

Thursday, August 9, 2007

पावसाच्या मनातलं मला काही कळत नाही..

पावसाच्या मनातलं मला काही कळत नाही..
तो बरसतोय अन तिची आठवण काही सरत नाही..

त्याला म्हटलं, टळ की लेका,त्रास का देतोस
तुझी रिमझिम तिची चाहूल काही विसरू देत नाही

तो वाफ़ाळता कप, त्या खिडकीतल्या गप्पा
ते ओलेचिंब भिजणे,डोळ्यांना काही हसू देत नाही

म्हणतो आता जादू बघ, अन हसला गडगडाटी
दारावर टकटक झालं अन पाहतॊ तर ती उभी होती
हसली खुदकन अन ओलेतीच येउन बिलगली
आणि ओढतच मला पावसात घेउन गेली

हं, खरंच पावसाचं मला काही कळत नाही
तो सरलाय आता पण तो क्षण काही सरत नाही
तो बरसतोय अन तिची आठवण काही सरत नाही..

Wednesday, August 8, 2007

मैत्री

तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा
म्हणजे माझ्यासाठी जणु उन्हाळ्यातही पावसाळा
तुझी मैत्रि म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं
एखादं जाळीदार पान....
जसंजसं त्याचं आयुष्य वाढत जातं
तसंतसं त्याच्या सुंदरतेला तेज चढत जातं
तुझ्या मैत्रिविना आयुष्य धुसर धुसर वाटेल...
तशी वाट सापडेल जगण्याची...
पण...हातात माझ्या हक्काच असं काही नसेल
मैत्रिचा हा नाजुक धागा दोघांनीही आता सांभाळायला हवा
मैत्रि एक धर्म...यास दोघांनीही पाळायला हवा
येणारे येतात अन जाणारे जातातही... मैत्रि सगळ्यांशीच होत नाही
मैत्रि सहज होवुन जाते ... करायची ठरवली तरी ती करता येत नाही
तुझ्या माझ्या मैत्रिला वय नाही...
म्हणुनच वाटतं...तुझ्या माझ्या मैत्रिला भय नाही
मैत्रिचा ठेवा हा असाच जपुन ठेव
तु हास अन दु:ख तुझी माझ्याआड लपवुन ठेव
उद्या जर नसलोच तुझ्यासोबत तरी माझे शब्द असतील
तू हसत रहा माझ्यासाठी..तुला बघुन माझे शब्दही हसतील
शब्दांनी नाही सांगु शकणार अशी तुझी मैत्रि
मी आहे तुझ्याबरोबर तुझ्या सुख दु:खात एवढीच देऊ शकतो तुला खात्री..


कवी - संदीप सुरळे.