कविता शोध

माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.

आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/


Monday, June 30, 2008

प्रसाद

हा सांग का तुझा, इंद्रा, प्रसाद नाही
पृथ्वीतळी शिळांची मोजदाद नाही

जी स्पंदने सुखाची जारकर्म देई
घरच्या फळास ऐसा चोरस्वाद नाही

आमीष का सुखाचे दावतेस सखये
मी सोवळा, मला भलताच नाद नाही

केलीस दुर्गुणांची तू सखोल चर्चा
माझ्या सुधारण्याचा, का प्रवाद नाही?

दे आरशा जराशी, ओळखून हाळी
बाकी कुणास माझे नाव याद नाही

आहे तुझी परीक्षा, केशवा, खरी ही
उदरात उत्तरेच्या, गर्भनाद नाही

कवी - मिलिंद फ़णसे

Friday, June 27, 2008

कारण या जगात प्रेम करावं असं काहीच नसतं..

मनापासून प्रेम करावं... तर ...त्याचं प्रेम फसतं..

कारण या जगात प्रेम करावं असं काहीच नसतं..


प्रत्येकाच्या आयुष्यात अशीच एखादी परी असते..

त्याच्या मते ती जरा.. चारचौघींपेक्षा बरी असते..

परी ही खरी व्हावी..त्याच्या जीवनात बहार यावी..

जणू हरवलेल्या स्वप्नांनाही भल्या पहाटे जाग यावी..

प्रितीच्या पहील्या वहील्या वळणावरचं ते..

आशावादी दार असतं..

मनापासून प्रेम करावं... तर ...त्याचं प्रेम फसतं..

कारण या जगात प्रेम करावं असं काहीच नसतं..


अशाच एका सकाळी ती परी त्याला भेटते..

तिच्या विरहाची ज्योत त्याची रात्र होवून पेटते..

अशा कित्येक रात्री तिच्या श्वासांना तो वाहतो..

आठ्वणींचा चंद्र तिच्या डोळ्यांमध्ये पाहतो..

आसुसलेल्या डोळ्यांचं, विखुरलेल्या श्वासांचं..

प्रेम हेच नाव असतं..

मनापासून प्रेम करावं... तर ...त्याचं प्रेम फसतं..

कारण या जगात प्रेम करावं असं काहीच नसतं..


संथ वाहत्या पाण्यातसुद्धा आवेगाचा भास होतो..

तिच्या प्रत्येक अदेचा गुलाम त्याचा श्वास होतो..

कधी दुःखांचे तर कधी सुखाचे क्षण वेचून घेतो..

कधी भारवलेली तर कधी हरवलेली संवेदना बनून राहतो..

पाण्यातल्या तरंगांचं, इंद्रधनुंच्या रंगांचं..

मन वेडं धुंद असतं..

मनापासून प्रेम करावं... तर ...त्याचं प्रेम फसतं..

कारण या जगात प्रेम करावं असं काहीच नसतं॥


कवी - माधव कुलकर्णी

Thursday, June 26, 2008

चार दिवस

फार काही मागत नाही, घेऊ नका आडकाठी
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी

नसेन पुत्र मी कुणाचा
आज्ञाधारक अन् शहाणा
नसेन भाऊ, दादा, भाचा
केवळ अलाणा-फलाणा
जरा मोकळा राहू द्या, येऊ नका माझ्या पाठी
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी

नसेन पती अर्धांगीचा
बैल जुंपलेलो घाणा
नसेन वडील मी मुलींचा
पायी झिजल्या वहाणा
जाईन गणिकेच्या कोठी अथवा संन्याश्यांच्या मठी
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी

नसेन मित्र मी दोस्तांचा
म्हणू दे माणूसघाणा
नको कोणत्याही पेशाचा
धंदेवाईक बहाणा
मनीषा ही एक आहे, जवळ आली आता साठी
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी

साखळदंड दायीत्वाचा
तुटे ना कितीही ताणा
अर्ज करता मी रजेचा
करता किती हो ठणाणा
मुक्त श्वास घेईन मी, सोडा सार्‍या निरगाठीं
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी

भार उतरू दे डोईचा
पाठीचा वाकला कणा
देई यत्न लिहिण्याचा
सृजनाच्या सुखद वेणा
फावला तो वेळ मिळता करीन लेखनकामाठी
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी

व्यापार चारच दिवसांचा
लाख मोलाचा पण जाणा
आयुष्याच्या भैरवीचा
वाजू लागला तराणा
हिशोब मांडीत बसले चित्रगुप्ताचे तलाठी
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी

कवी - मिलिंद फ़णसे

Wednesday, June 25, 2008

कर्ज

आज चुकवून सारी देणी मोकळा मी जाहलो
ताठ मानेने जाण्या पहा मोकळा मी जाहलो

दिसताच मी फिरवून नजरा लोक झाले चालते
निर्धास्त व्हा, अद्यापही भिकेस ना मी लागलो

रंग सरड्यासम बदलते रक्त तुमचे मतलबी
उकळत्या रक्तास माझ्या आटवून मी चाललो

तुम्हीच होता कापला हळुवार हातांनी खिसा
स्पर्श सारे चोरटे आता ओळखू मी लागलो

नाही दिलासा आज कोठे तरीही मस्तीत मी
मिंधेपणाच्या जगण्यास ठोकरून मी चाललो

द्रव्य लाविले पणाला, कुलशील नव्हते सोडले
जुगार अब्रुचा खेळणारा धर्म ना मी जाहलो

कशास येणे फिरुन येथे, वनवास बरवा ह्यापरि
व्यापार हरलो भावनांचा, नादार मी चाललो

ओलांडणे न वेस अंतिम कर्ज मागे ठेवूनी
फेडून आज सव्याज सर्व अपमान मी चाललो

मानवली नाही, लोकहो, गावची तुमच्या हवा
प्रत्येक घरच्या तक्षकाला परीक्षित मी भासलो

कवी - मिलिंद फ़णसे

Tuesday, June 24, 2008

टांगा पलटी घोडा फरार..!

मित्र-बित्र मी जोडत आलो, तोडत आलो वळणांवरती;
वार्‍यासंगे बागडलो जणु माझे नभ अन् माझी धरती!
कधी उधळलो स्वच्छ प्रकाशी, वाटुन घेतला कधी अंधार;
आपले आपले एक तंत्र मग, टांगा पलटी घोडा फरार..!

गाउन झाली गाणी-बीणी, हात-बीतही होते हातात;
'ती' माझे सर्वस्वही होती, अन् मीच मग तिच्या जगात!
आज मात्र 'ती' झाली परकी, आज संपला अलिखीत करार;
आपले आपले एक तंत्र मग, टांगा पलटी घोडा फरार..!

थोडा झालो मोठा-बिठा, कष्टही ओवले मज ताग्यात..
यश-बिशही खेचुन आणिले, कधी न होते जे भाग्यात!
साम-दाम-दंड-भेदाने विजयी, जरी तत्त्वांची दुर्दैवी हार
आपले आपले एक तंत्र मग, टांगा पलटी घोडा फरार..!

ऊन्हे-बिन्हेही झेलून झाली, जवळी आली संध्याकाळ,
डबके झाले मज प्रवाहाचे, जिथे जळाहुन जादा गाळ!
अशात जाहले केस पांढरे, बोथट झाली शस्त्रांची धार;
आपले आपले एक तंत्र मग, टांगा पलटी घोडा फरार..!

कवी - अनिरुध्द

Monday, June 23, 2008

आजकाल मी मलाच टाळतो

आजकाल मी मलाच टाळतो
मौन आपल्यासवेच पाळतो

रोज भासशी पहाट तू नवी
रोज मी तुझ्या रुपास भाळतो

रात्र ही अशी कशी शहारते
कोण ह्या नभात चंद्र माळतो ?

ठेवलेस मोरपीस तू जिथे
मी अजून तो वळीव चाळतो

सांत्वनातही असेल फायदा
आसवे उगीच कोण ढाळतो?

पाखरे उडून दूर चालली
अंगणात पारिजात वाळतो

भेटले इथेच ते अखेरचे
हा झरा पुढे इथून वाळतो


कवी - प्रसन्न

Tuesday, June 17, 2008

पक्ष्यांचे गाणे

प्रणयमंजुषा उषा उदेली,
दिव्यत्वाने वसुधा नटली,
की स्वर्गाची प्रभा फाकली ही वरती खाली.

निर्विकार विश्वाचे अंतर
प्रशांत पसरे नभःपटावर
शांतिदायिनी भूमि मनोहर ही हसते खाली.

पटल धुक्याचे हळूंच सारुनि,
चंडोलाच्या चाटु वचांनी,
स्पष्ट भूमिला समजावोनी हा चुंबी तरणी.

उषःकालची मंगलगीते
ही सरिता, हे कानन गाते,
हा विहगांचा ध्वनी मजेचा साथची हो त्याते.

प्रभातवायू मंद वाहती,
वनराजी आंदोलन घेती,
हळूंच लतिका फुले आपुली-उधळुनिया देती.

माझ्या प्रिय विहगांनो, आता
प्रसंग सुंदर असा कोणता?
यापुढती हो उघडा अपुली - प्रेमाची गाथा.

पुरे कोटरी आता वसती,
रान मोकळे, पुष्पें हसती,
उडा बागडा प्रशांत गगनी जा, जा, जा वरती.

नभात मारा उंच भरारी,
प्रेमपूर्ण की रमा भूवरी,
विविधा सृष्टी ही देवाची तुमची ही सारी.

कवी - बालकवी

Thursday, June 12, 2008

कैद

रमला न जीव येथे, कोणा लगाव नाही
वेल्हाळ माणसांना येथे उठाव नाही

गर्दी अनोळख्यांची वाटे हवीहवीशी
नजरेत घोळक्याच्या कावा, बनाव नाही

सामान्य लोक आले, असहाय्य पाहुनी मज
जे नामवंत होते त्यांचाच ठाव नाही

गर्भार मेघमाला, आषाढमास दाई
का कोंडल्या जळाला तरिही बहाव नाही

कैदेत शैशवी मी, कैदेत यौवनीही
बाहूत बंधनांच्या मुक्तीस वाव नाही

वात्सल्यकैद सरता, तारुण्य इंद्रियांचे
फेरा अखंड चाले, मरुनी बचाव नाही

मी आळवू पहातो बाल्यातला सुरांना
ओठांस भैरवीचा अजुनी सराव नाही

गणगोत, धर्म, जाती, ही जन्मजात वसनें
आत्म्या, निलाजरा तू, तुज पेहराव नाही


कवी - मिलिंद फ़णसे

Wednesday, June 11, 2008

अनंत

अनंत तारा नक्षत्रे ही अनंत या गगनात
अनंत दीप्ती, अनंत वसुधा, हे शशिसूर्य अनंत.
वरती खाली सर्व साठले वातावरण अनंत,
माप कशाचे, कुणा मोजिता, सर्व अनंत अनंत।

कितेक मानव झटती, करिती हाडाचेही पाणी,
अनंत वसुधा आजवरी हो परी मोजली कोणी!
म्हणोत कोणी 'आम्ही गणिला हा ग्रह- हा तारा,'
परंतु सांगा कुणी मोजिला हा सगळाच पसारा?

विशाल वरती गगन नव्हे, हे विश्वाचे कोठार,
उदात्ततेचा सागर हा, चिच्छांतीचा विस्तार.
कुणी मोजिला, कुणास त्याची लांबीरूंदी ठावी?
फार कशाला दिग्वनिंताची तरी कुणी सांगावी?

अनंत सारे विश्व जाहले अनंतात या लीन,
क्षुद्र मानवा, सांग कशाचा बाळगिसी अभिमान?
तव वैभव हे तुझे धनी ही, हे अत्युच्च महाल,
जातिल का गगनास भेदूनि? अनंत का होतील?

तुझ्या कीर्तिचे माप गड्या का काळाला मोजील!
ज्ञान तुझे तू म्हणशी 'जाईल', कोठवरी जाईल?
'मी' 'माझे' या वृथा कल्पना, तू कोणाचा कोण?
कितेक गेले मी मी म्हणता या चक्री चिरडून।

कवी - बालकवी

Tuesday, June 10, 2008

सावल्या

मिट्ट काळोखात होत्या गूढ काही सावल्या
भूतकाळातील पापांच्या उशाशी सावल्या

जागतो सैतान देही आज कोणा पाहुनी
चेहऱ्याला नाव होते, या निनावी सावल्या

गाडले होतेस ज्यांना खोल तू अपुल्या मनी
त्या भुतांच्या खेळती आता जिवाशी सावल्या

जोडले नाते तनुशी कालपावेतो जरी
या निघाल्या आज करण्या बेइमानी सावल्या

जीवनाचे सत्त्व सारे शोषले जळवांपरी
जीव माझा घेउनीही का उपाशी सावल्या

काय तृप्तीच्या बढाया मारता माझ्यापुढे
पोटभरल्या माणसांच्याही अधाशी सावल्या

शाप त्यांना, सांग, कोणी हा विदेहाचा दिला
मांडती दावा उभा बघ इंद्रियांशी सावल्या

कवी - मिलिंद फ़णसे

Monday, June 9, 2008

काही काही गोष्टी मला अजूनही कळत नाहीत

काही काही गोष्टी
मला अजूनही कळत नाहीत

एका पावसात
वाहून जातात गावंच्या गावं
अतीवृष्टीमुळे...
आणि पाठोपाठच्या उन्हाळ्यात
गावा गावांतून
नाहीशी होते वीज,
धरणात पाणी नसल्याच्या नावाखाली...
कोसळून वाहून जाणाऱ्या पाण्याचे
हिशोब काही जुळत नाहीत
काही काही गोष्टी
मला अजूनही कळत नाहीत

गावांपासून देशापर्यंतच्या
सर्वच अर्थसंकल्पांमधे
पाहत असतो आम्ही
घशाला कोरड पाडणारी तूट
आणि उत्तरोत्तर वाढत जाणारे
कर्जाचे डोंगर
आणि पाठोपाठच्या महिन्यांत
वाचत रहातो बातम्या
खासदारांच्या वाढत्या भत्त्यांच्या
आणि शेतकऱ्यांच्या माफ केलेल्या कर्जांच्या
तिजोऱ्यांतून गायब होणाऱ्या पैशांचे
हिशोब काही जुळत नाहीत
काही काही गोष्टी
मला अजूनही कळत नाहीत

पाणी असो वा पैसा
आल्या गेल्याचा हिशोब नाही
येण्या जाण्याचं नियोजन नाही
अकलेच्या दुष्काळात रहाण्याचे
आमचे भोग काही टळत नाहीत
काही काही गोष्टी
मला अजूनही कळत नाहीत...

कवी -

Friday, June 6, 2008

फुलराणी

हिरवे हिरवेगार गालिचे--हरित तृणाच्या मखमालीचे;

त्या सुंदर मखमालीवरतीं--फुलराणी ही खेळत होती।

गोड निळ्या वातावरणांत--अव्याज मने होती डोलत;

प्रणयचंचला त्या भ्रूलीला--अवगत नव्हत्या कुमारिकेला।

आईच्या मांडीवर बसुनी--झोंके घ्यावे, गावीं गाणीं;

याहुनि ठावें काय तियेला--साध्या भोळ्या फुलराणीला ?


पुरा विनोदी संध्यावात--डोलडोलवी हिरवें शेत;

तोच एकदा हांसत आला--चुंबून म्हणे फुलराणीला--

"छान माझी सोनुकली ती--कुणागडे ग पाहत होती ?

कोण बरे त्या संध्येतून--हळूच पाहते डोकावून ?

तो रविकर का गोजिरवाणा--आवडला अमुच्या राणींना ?"

लाजलाजली या वचनांनी--साधी भोळी ती फुलराणी।


आंदोलीं संध्येच्या बसूनी--झोंके झोंके घेते रजनी;

ह्या रजनीचें नेत्र विलोल--नभीं चमकती ते ग्रहगोल !

जादूटोणा त्यांनी केला--चैन पडेना फुलराणीला;

निजलींशेतें, निजलें रान--निजले प्राणी थोर लहान।

अजून जागी फुलराणी ही--आज अशी ताळ्यावर नाही ?

लागेना डोळ्याशीं डोळा--काय जाहलें फुलराणीला ?


या कुंजातून त्या कुंजातून--इवल्याश्या ह्या दिवट्या लावून,

मध्यरात्रिच्या निवांत समयी--खेळखेळते वनदेवी ही

त्या देवीला ओव्यां सुंदर--निर्झर गातो; त्या तालावर -

झुलुनि राहिलें सगळे रान--स्वप्नसंगमी दंग होऊन !

प्रणयिचिंतनी विलीनवृत्ती--कुमारिका ही डोलत होती;

डुलतां डुलतां गुंग होऊनी--स्वप्नें पाही मग फुलराणी-


"कुणी कुणाला आकाशांत--प्रणयगायनें होतें गात;

हळुंच मागुनी आले कोण--कुणी कुणा दे चुंबनदान !"

प्रणय-खेळ हे पाहुनि चित्तीं--विरहार्ता फुलराणी होती;

तों व्योमींच्या प्रेमदेवता--वाऱ्यावरती फिरतां फिरतां-

हळूच आल्या उतरून खाली--फुलराणीसह करण्या केली।

परस्परांना खुणवुनि नयनीं--त्या वदल्या "ही अमुची राणी"


स्वर्भूमीचा जुळवित हात--नाचनाचतो प्रभातवात;

खेळुनि दमल्या त्या ग्रहमाला--हळुहळु लागति लपावयाला

आकाशींची गंभीर शांती--मंदमंद ये अवनीवरती;

विरूंलागलें संशयजाल--संपत ये विरहाचा काल

शुभ्र धुक्याचें वस्त्र लेवोनी--हर्षनिर्भरा नटली अवनी।

स्वप्नसंगमीं रंगत होती--तरीहि अजुनी फुलराणी ती !


तेजोमय नव मंडप केला--लख्ख पांढरा दहा दिशांला,

जिकडेतिकडे उधळित मोती--दिव्य वऱ्हाडी गगनी येती

लाल सुवर्णी झगे घालुनी--हांसत हांसत आले कोणी;

कुणीं बांधिला गुलाबि फेटा--झकमकणारा सुंदर मोठा !

आकाशीं चंडोल चालला--हा वाङ्मनिश्चय कराव्याला;

हे थाटाचें लग्न कुणाचें--साध्या भोळ्या फुलराणीचें !


गाउं लागले मंगलपाठ--सृष्टीचे गाणारे भाट

वाजवि सनई मारूतराणा--कोकिळ घे तानांवर ताना!

नांचु लागले भारद्वाज--वाजविती निर्झर पखवाज,

नवरदेव सोनेरी रविकर--नवरी ही फुलराणी सुंदर !

लग्न लागतें ! सावध सारे !--सावध पक्षी! सावध वारे !

दंवमय हा अंतःपट फिटला--भेटे रविकर-फुलराणीला !


वधूवरांना दिव्य रवांनीं--कुणी गाईल मंगल गाणी;

त्यांत कुणीसें गुंफित होते--परस्परांचे प्रेम ! अहा ते !

आणिक तेथिल वनदेवीही--दिव्य आपुल्या उच्छ्वासांहीं

लिहित होत्या वातावरणीं--फुलराणीची गोड कहाणी !

गुंगतगुंगत कवि त्या ठायीं--स्फुर्तीसह विहराया जाई;

त्याने तर अभिषेकच केला--नवगितांनी फुलराणीला !

कवी - बालकवी

Thursday, June 5, 2008

काटे

माझ्यावरीच केवळ हे भाळलेत काटे
वा काळ होउनी हे सोकावलेत काटे

म्हटले गुलाब टाळू, टाळू मजेत काटे
जाईजुईतही पण बोकाळलेत काटे

लिहिलीत प्रेमपत्रं रक्ताळल्या करांनी
मार्गातुनी सखीच्या मी वेचलेत काटे

करता गुन्हा जरासा सुमनांस स्पर्शण्याचा
दुमडून अस्तन्यांना सरसावलेत काटे

केली न मी फुलांशी त्यांची जरी चहाडी
जखमा करून आता संकोचलेत काटे

केले मला फुलांनी घायाळ एव्हढे की
लाजून शुश्रुषेला सरसावलेत काटे

हसुनी फुलं म्हणाली उमलून सांजकाली
नाही, मिलिंद, धोका, सुस्तावलेत काटे


कवी - मिलिंद फ़णसे

Wednesday, June 4, 2008

आघात

शिकविलेस जे गाणे मला अजूनही मी गात आहे
षडज पेलला नाही जरी लयीत मी निष्णात आहे

नखशिखान्त तू लावण्यमूर्त लाजभारे वाकलेली
तनुलतेस जो येई सुगंध कोणत्या पुष्पात आहे

सुखमयी अशा या वेदना अजाणता देऊन जाशी
उमलत्या कळीचा, साजणी ग , कोवळा आघात आहे

जवळ तू तरीही बोललो न गूज कानी प्रेमिकांचे
बहरलीस तू, मी कैद मात्र वादळी मेघांत आहे

मृदुल मोरपंखी स्पर्श हा ईमान डोलावून जाता
वचनबध्द मी राहू कसा ग, खोट ही रक्तात आहे


कवी - मिलिंद फ़णसे

Tuesday, June 3, 2008

विरह

मनावर दगड ठेवून म्हणालो तिला
तुझा माझा संबंध आता सम्पला
म्हणाली , हेच ऐकवण्यासाठी
जवळ केले होतेस का मला ?

आताशा एकटेपणा अक्षरशः
खायला उठतो जिवाला
पण पुन्हा तिला जवळ केले
तर घरे पडतील काळजाला

तिच्या नाही, तरी माझ्या घरचे
विरोध नक्कीच करणार
आणि त्यांच्यापर्यंत आमची
कुणकुण तर गेलीच असणार

आमचा समेट घडवायला
मित्र सारे आतुर झालेत
म्हणूनच रूमवरचे सारे ASH TRAY
मी केव्हाच फेकून दिलेत


कवी - सचिन

Monday, June 2, 2008

ओहळ

कापले जे दोर मागे, सांग बांधले कसे
तोडले नाते कधीचे, जात सांधले कसे

आपल्या प्रेमास साक्षी चंद्र, सूर्य, तारका
वेगळे झाल्यावरी देतात दाखले कसे

जीव ओवाळून आता शोधिसी निरांजने
तेवती डोळ्यांत ज्योती, अश्रु दाटले कसे

वासनांचा पूर गेला, प्रीत शेष राहिली
होम देहाचा करोनी कार्य साधले कसे

माग घेता आसवांचा भेटली सुखं जुनी
आठवांच्या ओहळाने मैल कापले कसे


कवी - मिलिंद फ़णसे