कविता शोध

माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.

आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/


Saturday, November 12, 2011

विझता विझता स्वत:ला

झूठ बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते
अशी आमंत्रणे आम्हालाही आली; नाहीच असेही नाही

असे किती हंगाम शीळ घालीत गेले घरावरून
शब्दांनी डोळे उचलून पाहिलेच नाही, असेही नाही

शास्त्र्याने दडवावा अर्थ आम्ही फक्त टाळच कुटावे
आयुष्याचा अनुवाद करा सांगणारे खूप; नाहीत असेही नाही

असे इमान विकत घेणारी दुकाने पाड्यापाड्यावर
डोकी गहाण ठेवणारे महाभाग नाहीत असेही नाही।

अशा बेइमान उजेडात एक वात जपून नेताना
विझता विझता स्वत:ला सावरलेच नाही, असेही नाही।

कवी - नारायण सुर्वे

हृदय अर्पण करतात ती माणसं...

हृदय अर्पण करतात
ती माणसं निराळीच असतात

पूर असतो त्यांच्या स्वभावात
किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात
कोसळतात खोल तेव्हा किती उंच जातात

जशी हसतात फुलं, पूर्ण उमलतात,
उधळतात गंध, गळून पडतात
नियतीचा सहज स्विकार हृदय देणारेच करतात

अश्रुंच्या प्रत्येक थेंबातून त्यांची गाणी फुलतात
प्रीतीचे दिव्य किरण त्यांच्यातून नित्य पाझरतात
ज्यांची दारे बंद होतात त्यांनाही आपले हृदय देतात

हृदय अर्पण करतात
ती माणसं निराळीच असतात

कवी - शिरीष पै

Monday, August 16, 2010

दोन दिवस

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले.


कवी - नारायण सुर्वे

Thursday, June 17, 2010

माझ्या मना बघ दगड

(विंदांच्या माझ्या मना बन दगड़ ह्या कवितेचे विडंबन)

हा रस्ता अटळ आहे
पावसामधून - पाण्यामधून
ट्रॅफिकमधून - खड्ड्यांमधून
अंधेरी, व्हीटी किंवा शीव?
नको - नको! टाक लीव!
नाहीतर अडकून बसशील खास
ट्रॅफिकमध्ये तासनतास
तहान - भुकेने होईल त्रास
विसर ऑफिस किंवा रड
माझ्या मना बघ दगड

हा रस्ता अटळ आहे
बसमध्ये शिरलास तर
उभं राहायला जागा कर
दांड्यावरती हात धर
तरी होशील खाली - वर
म्हणून म्हणतो धर पक्का
संभाळ, संभाळ लागेल धक्का
पडणाऱ्या, पडशील किती?
झुलणाऱ्या, झुलशील किती?
धक्काबुक्की करशील किती?
जिरेल पुरती तुझी रग
माझ्या मना दगड बघ

हा रस्ता अटळ आहे
येथेच असतात सदा'चर'
जागोजाग रस्त्यावर
असतात फिरत गणवेषात
थांबवून करतात पुढे हात
आणि म्हणतात " ही हिंमत?
सिग्नल मोडलास - टाक किंमत! "
पावती महाग, लाच स्वस्त
हां - हां म्हणता करतात फस्त
कमावशील पुन्हा गाळून स्वेद
सरकव नोट, नको खेद

हा रस्ता अटळ आहे
सुट्टी घेणे हाच उपाय
काय अडेल तुझ्याशिवाय?
रस्त्यावरचे सारे पाणी
वाहून काय नेईल कोणी?
काय तुझी ही छत्री
न भिजण्याची देईल खात्री?
रुळावरून वाहतील ओढे
मध्य रेल्वेचे अडेल घोडे
चाल वर धरून विजार
जवळून जाईल मग मोटार
शर्टावरचे डाग रगड
माझ्या मना बघ दगड

हा रस्ता अटळ आहे
अटळ आहे घाण सारी
अटळ आहे ही शिसारी
एक सर अशी येईल,
घाणीचीच राड होईल
डास-माशा सगळे किडे
घोंगावतील मग चोहीकडे
रोगराईचा धुमाकूळ
रोगी होईल सारे कूळ
ऐका थापा! ऐका आवाज!
निवडणूक येते आज!
निवडणुकीतला उमेदवार
या रस्त्यावर घालिल टार
इतकी चंगळ तुला रगड
माझ्या मना बघ दगड

कवी - नचिकेत कुलकर्णी

Tuesday, June 15, 2010

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

कवी - सुरेश भट