कविता शोध

माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.

आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/


Tuesday, November 25, 2008

शांतता

घराचे पाठीमागले दार उघडले...
तेवढाच काय तो कडीचा आवाज
बाकी शांतता...
हिरवी शांतता...
गार शांतता...
हिरव्यागार बागेत आलेले रेशमी सूर्यकिरण
फुले फुललेली... उमलती शांतता... मंद गंध
नव्हे... प... रि... म... ल...
अलगद उडणारी फुलपाखरें
फांदीवर सरडा... सजग... स्तब्ध
पलीकडे ऊंच आभाळात देवीच्या देवळाचा कळस
त्या भोवती घारीचे भ्रमण
शांततेवर उमटलेला एक वलयाकार तरंग
सरसरत गेलेला पानांचा आवाज... साप...
नंतर कोसळती शांतता
पण मुंग्यांची संथ निमूट चाललेली रांग
शांतता सजीव... गतिमान
अलगद अलगद तरंगत कुठून तरी आलेले
एक अलवार बाळपीस
वाऱ्याची मंद, नीरव झुळूक
दयाळ पक्षाची एक प्रश्नार्थक शीळ...
शांतता मधुरलेली
मऊ मातीवर उमटलेली माझी पावले... त्यांचे ठसे
जादूचे... गूढ
पुढे पुढे नेणाऱ्या पाऊलवाटेचे लाडीक वळण
पुढे गहन... गगन
शांततेत ऊभे माझे निवांत एकटेपण!


कवी - शंकर वैद्य

No comments: