कविता शोध

माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.

आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/


Thursday, November 13, 2008

अशीच यावी वेळ एकदा

अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना ,
असे घडावे अवचित काही, तुझ्या समिप मी असताना

उशीर व्हावा आणि मिळावी एकांताची वेळ अचानक ,
जवळ नसावे चीट्ट्पाखरू केवळ तुझी नि माझी जवळिक

मी लज्जित, अवगुंठित आणि संकोचाचा अंमल मनावर ,
विश्वामधले मार्दव सारे दाटून यावे तुझ्या मुखावर

मनात माझ्या 'तू बोलावे' तुझ्या मनीही तीच भावना ,
तूच पुसावे कुशल शेवटी, करून कसला वृथा बहाणा

संकोचाचे रेशीमपडदे हां हां म्हणता विरून जावे ,
समय सरावा मंदगतीने अन प्रीतीचे सूर जुळावे

तू मागावे माझ्यापाशी असे काहीसे निघताना ,
उगीच करावे नको नको मी हवेहवेसे असताना

हुशार तू पण, तुला कळावा अर्थ त्यातुनी लपलेला ,
आपुलकीच्या दिठीत भिजवुन मिठीत घ्यावे तू मजला

सचैल न्हावे चिंब भिजावे तुझ्या प्रितीच्या जलामध्ये ,
युगायुगांची आग विझावी त्या बेसावध क्षणांमध्ये

शब्दांवाचुन तुला कळावे गूज मनी या लपलेले ,
मुक्तपणे मी उधळून द्यावे जन्मभरी जे जपलेले


कवी - प्रसाद कुलकर्णी
(ही कविता 'स्वप्न उद्याचे घेउन ये' या कवितासंग्रहामधील आहे. याच कवितेचे अजून एक रुपडे 'सांज गारवा' अल्बम मध्ये दिसते. ते ही प्रसाद कुलकर्णी यांचेच आहे.)

3 comments:

Saurabh said...

अहो हीच कविता इतर ठिकाणी सौमित्र यांच्या नावावर दिसते आहे ? नक्की कुणाची आहे, तुमची का त्यांची ?

अमित said...
This comment has been removed by the author.
अमित said...

सौरभ, तुझी शंका रास्त आहे. (तुझा अभिप्राय का कुणास ठाऊक इथे दिसत नाहीये, पण मी तो वाचलेला आहे.)
इतर बऱ्याच ठिकाणी ही कविता सौमित्रची आहे असा लिहिण्यात आलंय. मलाही तुझा अभिप्राय वाचल्यावर तसच वाटलं आणि बदलही केला पण नंतर गेले काही दिवस नीट शोधाशोध केल्यावर लक्षात आलं की कदाचित तसं नाहीये.
ही कविता प्रसाद कुलकर्णींच्या 'स्वप्न उद्याचे घेउन ये' या कवितासंग्रहामधील आहे. याच कवितेचे अजून एक रुपडे 'सांज गारवा' अल्बम मध्ये दिसते (इतर बऱ्याच ठिकाणी हे रुपडे पाहायला मिळते). ते ही प्रसाद कुलकर्णी यांचेच आहे. मी हा कवितासंग्रह शोधतोय सध्या म्हणजे ही गोष्ट नक्की बरोबर आहे ते पहाता येईल.