कविता शोध

माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.

आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/


Wednesday, September 17, 2008

अहि नकुल

ओतीत विखारी वातावरणी आग
हा वळसे घालित आला मंथर नाग,
मधुनीच उभारी फणा, करी फुत्कार
ये ज्वालामुखीला काय अचानक जाग !

कधी लवचिक पाते खड्‌गाचें लवलवते,
कधी वज्र धरेवर गगनातुनी कडकडते,
कधी गर्भरेशमी पोत मधे जरतार,
प्रमदेचे मादक वस्त्र जणूं सळसळते.

मार्गावर याच्या लवत तृणाची पाती
पर्णावर सुमने मोडुनी माना पडती
थरथरती झुडुपे हादरती नववेली
जग गुलाम सारे या सम्राटापुढती.

चालला पुढे तो-काय ऐट ! आनंद !
अग्नीचा ओघळ ओहळतो जणुं मंद,
टाकली यमाने कट्यार वा कनकाची
चालली बळींचा वेध घेत ही धुंद.

वा ताण्डव करता सोम प्राशुनी काली
रक्तांत नाहली, शिरमुंडावळ भाली,
थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या,
हे कंकण निखळुनि पडले भूवर खाली.

चालला पुढे तो लचकत मुरडत मान,
अवतरे मूर्तिमान् मल्हारांतिल तान
चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य
चालला मृत्युचा मानकरीच महान !

हा थांब-कुणाची जाळीमधे चाहूल
अंगावर-कणापरी नयन कुणाचे लाल,
आरक्त ओठ ते ध्वजा जणू रक्ताच्या,
रे नकूल आला ! आला देख, नकूल !

थबकलाच जागीं सर्प घालुनी वळसा,
रिपु समोर येता सोडुनी अन् आडोसा,
भूमीस मारुनी मागे तीव्र तडाका,
घे फणा उभारुन मरणाचा कानोसा.

पडलीच उडी ! कि तडितेचा आघात
उल्केपरि तळपत कण्यात घुसले दात,
विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प
फुंफाट करी अन् पिशापरी त्वेषांत !

रण काय भयानक-लोळे आग जळांत
आदळती, वळती, आवळती क्रोधांत,
जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व
आषाढघनाशी झुंजे वादळवात !

क्षणि धुळीत गेली वहात ती विषधार
शतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर
विच्छिन्न तनूंतुनि उपसुनी काढुनी दात
वार्‍यापरी गेला नकुल वनांतुनी दूर।

संग्राम सरे, रक्ताचे ओघळ जाती,
आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती,
पिंजून कापसापरी पडे तो नाग,
ते खंड गिळाया जमले कीटक भोती !


कवी - कुसुमाग्रज

3 comments:

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

जुन्या मराठी कवितांवर तुमचे प्रेम आहे तर मग त्या ब्लॉगवर लिहिताना शुद्धलेखनाकडे जरूर लक्ष द्यावे, र्‍हस्व दीर्घाच्या फरकामुळे जुन्या वृत्तबद्ध कविता वाचताना ठेचकाळल्यासारखे होते. यात त्या जुन्या कवींवरही अन्याय होतो.

अमित said...

मी याची काळजी घेण्याचा पुर्ण प्रयत्न करतो, पण ब-याचदा ह्या कविता मला लिखित स्वरुपात मिळत नाहीत. मग कोणाकडुन तरी ऐकलेली कविता टाकताना अशा काही चुका राहुन जातात. तरी इथुन पुढे आणखी काळजी घेईन.

Post मधे अशा काही चुका आढळल्यास आपण मला amitpatil_amit [at] hotmail [dot] com वर कळवू शकता. मी त्यानुसार नक्कीच बदल करेन. धन्यवाद.

Keep Blogging. :)

आदित्य said...

नमस्कार,
ही कविता अशी अगदी हाताशी आल्यामुळे खूपच सोय झाली आहे; धन्यवाद!
ही कविता मुद्रित स्वरूपात 'विशाखा' या कवितासंग्रहात उपलब्ध आहे. त्याचा काही उपयोग होऊ शकेल..
पुन्हा धन्यवाद!