कविता शोध

माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.

आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/


Monday, September 29, 2008

श्रावणबाळ

शर आला तो धावुनी आला काळ
विव्हळला श्रावणबाळ
हा, आई गे ! दीर्घ फोडूनी हाक
तो पडला जाऊन झोक
ये राजाच्या श्रवणी करुणवाणी
हृदयाचे झाले पाणी

त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी
शोकाकुल झाला नृमणी
आसवे आणुनी नयनी
तो वदला हा हंत तुझ्या नाशाला
मी पापी कारण बाळा

मग कळवळूनी
नृपास बोले बाळ
कशी तुम्ही साधीली वेळ
मम म्हातारे माय-बाप तान्हेले
तरुखाली असती बसले
कावड त्यांची
घेवून मी काशिला
चाललो तीर्थयात्रेला
आणाया निर्मळ वारी
मी आलो या कासारी
ही लगबग भरूनी झारी
जो परत फिरे
तो तुमचा शर आला
या उरात रुतुनी बसला

मी एकुलता पुत्र कसा हा घाला
मजवरती अवचित आला
तयां वृध्दपणी
मीच एक आधार
सेवेस आता मुकणार
जा बघतील ते
वाट पाखरावाणी
द्या नेऊन आधी पाणी.
आहेत अंध ते दोन्ही
दुर्वार्ता फोडू नका ही
ही विनती तुमच्या पायी
मज माघारी करा तुम्ही सांभाळ
होउनिया श्रावण बाळ

परी झांकुनी सत्य कसे हे राहील ?
विधीलेख न होई फोल
काळीज त्यांचे फाटून शोकावेगे
ते येतील माझ्यामागे
घ्या झारी... मी जातो.. त्याचा बोल
लागला जावया खोल
सोडीला श्वास शेवटला
तो जीव - विहंग फडफडला
तनु - पंजर सोडूनी गेला
दशरथ राजा रडला धायी धायी
अडखळला ठायी ठायी

कवी - ग. ह. पाटील

(अनय देशमुखने सुचवल्यानुसार ही कविता इथे टाकत आहे. पण कवितेचे शब्द अगदी तसेच्या तसे आहेत की नाही ते पहाण्यासाठी मुळ कविता न सापडल्याने मला जशी मिळाली तशीच इथे लिहीली आहे. आपणास जर कवितेत मुळ कवितेपेक्षा काही वेगळे आढळल्यास कळवा, त्यानुसार बदल करायला मला नक्कीच आवडेल.)

No comments: