मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले
जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले
जखम जिवाची हलके हलके भरून यावी
तसे फिकटले, फिकट रंग ते मग ओसरले
घेरित आल्या काळोखाच्या वत्सल छाया
दुःखाचीही अशी लागते अनवट माया
आक्रसताना जग भवतीचे इवले झाले
इवले झाले आणिक मजला घेरित आले
मी दुःखाच्या कुपीत आता मिटते आहे
एक विखारी सुगंध त्याचा लुटते आहे
सुखदुःखाच्या मधली विरता सीमारेषा
गाठ काळजातली अचानक सुटते आहे
जाणीव विरते तरीही उरते अतीत काही
तेच मला मम अस्तित्वाची देते ग्वाही
आतुरवाणी धडधड दाबून ह्रुदयामधली
श्वास आवरून मन कसलीशी चाहुल घेई
हलके हलके उतरत जाते श्वासांची लय
आता नसते भय कसले वा कसला संशय
सरसर येतो उतरत काळा अभेद्य पडदा
मी माझ्यातून सुटते, होते पूर्ण निराशय
कवयित्री - शांता शेळके
अशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.
कविता शोध
माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.
आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/
आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/
Friday, September 26, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment