कविता शोध

माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.

आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/


Wednesday, November 26, 2008

श्रीमंत अक्षरांची इतुकीच खंत आहे

हे फूल तू दिलेले मजला पसंत आहे,
आहे फुलात काटा तोही पसंत आहे.

दुःखावरी मुलामा देऊन तू सुखाचा,
जे वाटतोस ते ते सारे पसंत आहे.

विरता जुने प्रहार पडती नवीन घाव,
तक्रार सांगण्याला कोठे उसंत आहे.

मी भोगल्या व्यथांना साक्षी कुणी कशाला,
माझाच एक अश्रू अजुनी जिवंत आहे.

कधि सांगता न आल्या शब्दात प्रेमगोष्टी,
श्रीमंत अक्षरांची इतुकीच खंत आहे।


कवी - यशवंत देव

Tuesday, November 25, 2008

शांतता

घराचे पाठीमागले दार उघडले...
तेवढाच काय तो कडीचा आवाज
बाकी शांतता...
हिरवी शांतता...
गार शांतता...
हिरव्यागार बागेत आलेले रेशमी सूर्यकिरण
फुले फुललेली... उमलती शांतता... मंद गंध
नव्हे... प... रि... म... ल...
अलगद उडणारी फुलपाखरें
फांदीवर सरडा... सजग... स्तब्ध
पलीकडे ऊंच आभाळात देवीच्या देवळाचा कळस
त्या भोवती घारीचे भ्रमण
शांततेवर उमटलेला एक वलयाकार तरंग
सरसरत गेलेला पानांचा आवाज... साप...
नंतर कोसळती शांतता
पण मुंग्यांची संथ निमूट चाललेली रांग
शांतता सजीव... गतिमान
अलगद अलगद तरंगत कुठून तरी आलेले
एक अलवार बाळपीस
वाऱ्याची मंद, नीरव झुळूक
दयाळ पक्षाची एक प्रश्नार्थक शीळ...
शांतता मधुरलेली
मऊ मातीवर उमटलेली माझी पावले... त्यांचे ठसे
जादूचे... गूढ
पुढे पुढे नेणाऱ्या पाऊलवाटेचे लाडीक वळण
पुढे गहन... गगन
शांततेत ऊभे माझे निवांत एकटेपण!


कवी - शंकर वैद्य

Monday, November 24, 2008

तहान

सारा अंधारच प्यावा
अशी लागावी तहान
एका साध्या सत्यासाठी
देता यावे पंचप्राण

व्हावे एव्हढे लहान
सारी मने कळों यावी
असा लागावा जिव्हाळा
पाषाणाची फुले व्हावी

फक्त मोठी असो छाती
सारे दुःख मापायला
गळो लाज गळो खंत
काही नको झाकायला

राहो बनून आभाळ
माझा शेवटला श्वास
मना मनात उरो
फक्त प्रेमाचा सुवास


कवी - म. म. देशपांडे

Thursday, November 20, 2008

त्याचे गाणे

एकहि वेळा न तुजला भरूनि डोळे पाहिलें,
परि जिव्हारी घाव बसुनी हृदयी जखमी जाहले!
मी फिरस्ता चुकुनि कोठे दारि तुझ्या पातलो;
सहज तुजला निसटतांना पाहिलें ना पाहिलें
नेसली होतीस तेव्हां शुभ्र पातळ रेश्मी,
त्यांतुनी आरक्त कांती और कांहींशी खुले!
रर्विकरीं सोनेरि उड्ती केस पिंगट मोकळे;
तपकिरी तेजांत डोळे खोल अर्थ भारिले!
पायिं त्या नाजूस गोर्‍या रूळ्त होते पैंजण,
रक्त तापे , अंग कांपे , हृदय पेटूं लागलें!
न कळता तुं प्रीतिचा खंजीर हृदयी मारिला,
ध्यानिंही नाहीं तुझ्या कीं काय माझें जाहलें!
स्मृति जशीच्या तशि असे ही-काळ कितिही लोटला;
हसत तुं असशील, परि या अश्रु भालीं रेखिले!


कवी - अनंत काणेकर

Wednesday, November 19, 2008

घाटातील वाट

घाटातील वाट,
काय तिचा थाट,
मुरकते गिरकते,
लवते पाठोपाठ.

निळी निळी परडी,
कोणी केली पालथी,
पान फुलं सांडली,
वर आणि खालती.

खाली खोल दरी,
वर उंच कडा,
भला मोठा नाग,
जणू वर काढून फणा.

भिऊ नका कोणी,
पाखरांची गाणी,
सोबतीला गात गात,
खळाळतं पाणी.


कवयित्री - सरिता पदक.