कविता शोध

माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.

आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/


Friday, December 11, 2009

अनामवीरा

अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनांत
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात

धगधगता समराच्या ज्वाला या देशासाठी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव

जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान

काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा

कवी - कुसुमाग्रज

Tuesday, December 8, 2009

गणपत वाणी

गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी;

मिचकावुनि मग उजवा डोळा
आणि उडवुनी डावी भूवयी,
भिरकावुनि ती तशीच द्यायचा
लकेर बेचव जैसा गवयी.

गिर्‍हाईकाची कदर राखणे;
जिरे, धणे अन धान्यें गळित,
खोबरेल अन तेल तिळीचे
विकून बसणे हिशेब कोळित;

स्वप्नांवरती धूर सांडणे
क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिणमिण जळत्या; आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा.

गोणपटावर विटकररंगी
सतरंजी अन उशास पोते;
आडोशाला वास तुपाचा;
असे झोपणे माहित होते.

काडे गणपत वाण्याने ज्या
हाडांची ही ऐशी केली
दुकानातल्या जमीनीस ती
सदैव रुतली आणिक रुतली.

काड्या गणपत वाण्याने ज्या
चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,
दुकानांतल्या जमीनीस त्या
सदैव रुतल्या आणिक रुतल्या.

गणपत वाणी बिडी बापडा
पितांपितांना मरून गेला;
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला!

कवी - बा.सी.मर्ढेकर

Friday, December 4, 2009

सदैव सैनिका, पुढेच जायचे

सदैव सैनिका, पुढेच जायचे
न मागुती तुवा, कधी फिरायचे

सदा तुझ्यापुढे, उभी असे निशा
सदैव काजळी, दिसायच्या दिशा
मधून मेघ हे, नभास ग्रासती
मधेच या विजा, भयाण हासती
दहा दिशांतुनी, तुफान व्हायचे

प्रलोभने तुला, न लोभ दाविती
न मोहबंधने, पदांस बांधिती
विरोध क्रोध वा, तुला न थांबवी
न मोह भासतो, गजांत वैभवी
न दैन्यही तुझे, कधी सरायचे

कवी - वसंत बापट

Thursday, December 3, 2009

माझ्या मराठीची गोडी

माझ्या मराठीची गोडी
मला वाटत अवीट,
माझ्या मराठीचा छंद
मना नित्य मोहवित.

ज्ञानोबांची तुकयाची
मुक्तेशाची जनाईची,
माझी मराठी गोडी
रामदास शिवाजीची.

'या रे, या रे अवघे जण,
हाक मायमराठीची,
बंध खळाळा गळाले
साक्ष भीमेच्या पाण्याची.

डफ तुणतुण घेऊन
उभी शाहीर मंडळी,
मुजर्‍याची मानकरी
वीरांची ही मायबोली.

नांगराचा चाले फाळ
अभंगाच्या तालावर,
कोवळीक विसावली
पहाटेच्या जात्यावर.

हिचे स्वरूप देखणे
हिची चाल तडफेची,
हिच्या नेत्री प्रभा दाटे
सात्विकाची, कांचनाची.

कृष्णा गोदा सिंधुजळ
हिची वाढवती कांती,
आचार्यांचे आशिर्वाद
हिच्या मुखी वेद होती.

माझ्या मराठीची थोरी
नित्य नवे रुप दावी,
अवनत होई माथा
मुखी उमटते ओवी.

कवी - वि. म. कुलकर्णी.


(माझ्या कवितांच्या संकलनामधे मोलाची भर घातल्याबद्दल सारंग गोसावी याचे आभार.)

Monday, June 15, 2009

सावर रे सावर रे उंच उंच झुला...

सावर रे सावर रे सावर रे उंच उंच झुला
सुख मला भिवविते सांगू कसे तुला ?

आता आभाळ भेटले रे
अंग फुलांनी पेटले रे
पहा कसे ऐकू येती श्वास माझे मला

फांदी झोक्याने हालते रे
वाटे स्वप्नी मी चालते रे
मिटले मी माझे डोळे, हात हाती दिला

जुने आधार सुटले रे
तुझ्या मिठीत मिटले रे
सांभाळ तू बावरल्या वेड्या तुझ्या फुला


कवी – मंगेश पाडगावकर

Thursday, June 4, 2009

भाव माझ्या अंतरीचे...

भाव माझ्या अंतरीचे एकदा कळतील सारे
दूरच्या रानात तेव्हा गीत हे गातील वारे

धूर्त सार्‍या माणसांची जाहली बंद जेव्हा दुकाने
त्या क्षणी माझ्या घराची बंद होती सर्व दारे

पिंजर्‍याची चीड होती, पंख हे आयुष्य माझे
या नभाच्या आशयाला शब्द माझे लाख तारे

पावसाला हाक जेव्हा मोर हे घालीत आले
लाभले प्रितीस माझ्या रंगवेडे हे पिसारे

वाहुनी नेतील लाटा मौन माझे गूढ रात्रीं
एकदा नसतील तेव्हा सागराला या किनारे


कवी - मंगेश पाडगांवकर

Wednesday, June 3, 2009

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं...

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

तुमचं दु:ख खरं आहे,
कळतं मला,
शपथ सांगतो, तुमच्याइतकंच
छळतं मला;
पण आज माझ्यासाठी
सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदणं होऊन
अंगणभर पसरायचं.

सूर तर आहेतच; आपण फक्त झुलायचं,
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

आयुष्यात काय केवळ
काटेरी डंख आहेत?
डोळे उघडून पहा तरी;
प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत!

हिरव्या रानात,
पिवळ्या उन्हात
जीव उधळून भुलायचं!
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

प्रत्येकाच्या मनात एक
गोड गोड गुपीत असतं,
दरवळणारं अत्तर जसं
इवल्याश्या कुपीत असतं!

आतून आतून फुलत फुलत
विश्वासाने चालायचं,
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

आपण असतो आपली धून,
गात रहा;
आपण असतो आपला पाऊस,
न्हात रहा.

झुळझुळणार्‍या झर्‍याला
मनापासून ताल द्या;
मुका घ्यायला फूल आलं
त्याला आपले गाल द्या!

इवल्या इवल्या थेंबावर
सगळं आभाळ तोलायचं,
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.


कवी – मंगेश पाडगांवकर

Tuesday, June 2, 2009

आता पुन्हा पाऊस येणार...

आता पुन्हा पाऊस येणार,
मग आकाष काळं नीळं होणार,
मग मातीला गंध फुटणार,
मग मधेच वीज पडणार,
मग तूझी आठवण येणार,
काय रे देवा...

मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार,
मग मी ती लपवणार,
मग लपवुनही ती कुणाला तरी कळावसं वाटणार,
मग ते कोणीतरी ओळखणार,
मग मित्र असतील तर रडणार,
नातेवाईक असतील तर चिडणार,
मग नसतंच कळलं तर बरं, असं वाटणार...
आणि ह्या सगळ्याशी तुला काहीच देण घेण नसणार...
काय रे देवा...

मग त्याच वेळी दूर रेडियो चालू असणार,
मग त्यात एखादं जुनं गाणं लागलेलं असणार,
मग त्याला एस. डी. बर्मननी चाल दिलेली असणार,
मग साहीलनी ते लिहिलेलं असणार,
मग ते लतानी गायलेल असणार...
मग तूही नेमकं आत्ता हेच गाणं ऐकत असशील का? असा प्रश्न पडणार,
मग उगाच छातीत काहीतरी हुरहुरणार,
मग ना घेण ना देण पण फुकाचे कंदील लागणार...
काय रे देवा...

मग खिडक्यांचे गज थंडगार होत जाणार...
मग त्याला आकाशाची आसवं लगडणार,
मग खिडकीत घट्ट बांधून ठेवलेल्या आपल्या पालथ्या मूठीवर ते टपटपणार...
मग पाच फूट पाच इंच देह अपूरा अपूरा वाटणार,
मग ऊरी फुटुन जावसं वाटणार,
छाताडातून ह्रुदय काढून त्या शूभ्र धारेखाली धरावसं वाटणार...
मग सारं कसं मूर्खासारखं उत्कट उत्कट होत जाणार,
पण तरीही श्वासाची लय फक्त कमी जास्त होत राहाणार, पण बंद नाही पडणार,
काय रे देवा...

पाउस पडणार...
मग हवा हिरवी होणार...
मग पाना पानात हिरवा दाटणार,
मग आपल्या मनाच पिवळ पान देठं मोडून हिरव्यात शिरू पहाणार,
पण त्याला ते नाही जमणार्,
मग त्याला एकदम खरं काय ते कळणार, मग ते ओशाळणार,
मग पून्हा शरीराशी परत येणार,
सर्दी होऊ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार,
चहाच्या पाण्यासाठी फ्रीजमध्ये कुडमुडलेलं आलं शोधणार,
एस. डी. चं गाणंही तोपर्यंत संपलेलं असणार,
रेडियोचा स्लॉट भरलेला असणार्,
मग तीच्या जागी ती असणार, माझ्या जागी मी असणार,
कपातल वादळ गवती चहाच्या चवीने पोटात निपचीत झालेलं असणार...
काय रे देवा...

पाउस गेल्यावर्षी पडला,
पाउस यंदाही पडतो...
पाउस पूढच्या वर्षीही पडणार...
काय रे देवा...


कवी - संदीप खरे

Friday, May 29, 2009

अजुनी रुसून आहे...

अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना ।

समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे,
ते आज का नसावे, समजावणी पटे ना
धरीला असा अबोला, की बोल बोलवेना ।

का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे,
विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना,
मिटवील अंतराला, ऐसी मिठी जुटे ना ।

की गूढ काही डाव, वरचा न हा तरंग,
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ।


कवी – अनिल [आ. रा. देशपांडे]

Wednesday, May 27, 2009

लागेल जन्मावें पुन्हा...

माझी न घाई कांहिही, जाणून आहे अंतरी,
लागेल जन्मावें पुन्हा नेण्या तुला मझ्या घरी.

तू झुंजुमुंजू हासशी, जाईजुईचे लाजशी;
मी वेंधळा मग सांडतॉ थोडा चहा बाहीवरी.

तू बोलतां साधेसुधें सुचवुन जाशी केवढे,
मी बोलतो वाचाळसा अन् पंडीती काहीतरी.

होशी फुलासह फूल तू अन् चांदण्यासह चांदणे,
ते पाहणे, इतकेंच मी बघ मानलें माझ्या करी.

म्हणतेस तू, "मज आवडे रांगडा सीधेपणा!"
विश्वास मी ठेवू कसा या हुन्नरी शब्दांवरीं.

लिहिती बटा भालावरी ऊर्दु लिपींतिल अक्षरें;
हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी.


कवी - विंदा करंदीकर

Monday, May 25, 2009

आलाप

मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते;
कुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते!

वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही;
उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते?

कुठेतरी पाहिले तुला मी, जरी तुझे नाव आठवेना...
करू तरी काय? हाय, तेंव्हा खरेच डोळे नशेत होते!

असूनही बेचिराख जेंव्हा जगायचे श्रेय जिंकले मी,
कितीतरी लोक आसवांची प्रमाणपत्रेच घेत होते!

जरी जिवाला नकोनकोशी हयात हासून काढली मी
निदान जे दु:ख सोसले, ते सुखात होते! मजेत होते!

बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो?
धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते!

मला विचारू नकोस आता, कुठून हे शब्द आणले मी?
तुझेच आलाप काल रात्री उसासणार्‍या हवेत होते!


गझलकार - सुरेश भट.

Friday, May 22, 2009

सांग सांग भोलानाथ...

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचुन, सुट्टी मिळेल काय ?

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?

भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा ,
आठवड्यातून रविवार, येतील का रे तीनदा ?

भोलानाथ उद्या आहे, गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ?

भोलानाथ भोलानाथ चॉकलेट मिळेल काय ?
आकाशातून वेफर्सचा पाऊस पडेल काय ?

भोलानाथ जादूचा शंख मिळेल काय ?
भोलानाथ परीसारखे पंख देशील काय ?

सांग सांग भोलानाथ... सांग सांग भोलानाथ...


कवी – मंगेश पाडगावकर

Thursday, May 21, 2009

क्षणभर वेडया प्रेमा थांब!

अधिर मनासह जाशी कोठें?
चुकशिल, संकटी पडशिल वाटे,
जग हें सारें बा रे खोटें !
हृदया सोडुनि; गडया म्हणोनी, जाइं न कोठें लांब !

क्षणीं पांढरा, क्षणींच काळा
रंग आवडे असा जगाला,
ठाव तयाचा कुणा न कळला
खुळ्या तूलाची, अशा जगाची, कळेल का कृति सांग?

जग सगळें हें देखाव्याचें!
गुलाम केवळ रे स्वार्थाचें,
स्मशान कीं हें शुद्धत्वाचें!
शुद्ध भाबडें, सरळ रोकडें, अशांत करशिल काय?

प्रेमा येथें शपथ लागते!
प्रासावांचुनि कविता अडते!
कर्त्यावांचुनि कार्यहि घडतें!
देव बिचारा, तया न थारा, तुझी कथा मग काय?

तुझ्यासारखा तुला सोबती,
मिळेल का या अफाट जगतीं?
संकुचितहि हें अफाट जरि अती
आणि न मना, अशी कल्पना, अगदीं भोळा सांब!

कोणी तुजला मानिल खोटें,
तिरस्कारही दिसेल कोठें,
अपमानाचेंही भय मोठें,
बाग जगाची, ही न फुलांची, कांटे जागोजाग!

टाकिल कुणि तुज धिक्कारानें,
रडविल किंवा उपहासानें,
फसविल नकली कीं मालानें,
कोणी भटकत, उगाच रखडत, फिरवील मागोमाग!

म्हणुनि लाडक्या, कुठें न जाई,
या हृदयांतचि लपुनी राही,
योग्य मित्र नच सुख तरि नाहीं!
कुसंगतीहुनि, वेडया; मानीं, फार बरा एकांत!


कवी - राम गणेश गडकरी.

Wednesday, May 20, 2009

राहिले रे अजून...

राहिले रे अजून श्वास किती?
जीवना, ही तुझी मिजास किती?

आजची रात्र खिन्न तार्‍यांची,
आजचा चंद्रही उदास किती?

मी कसे शब्द थोपवू माझे?
हिंडती सूर आसपास किती?

दुःख माझे... विरंगुळा त्यांचा?
मी करावे खुळे कयास किती?

ओळखीचे कुणीतरी गेले...
ओळखीचा इथे सुवास किती

हे कसे प्रेम? या कशा आशा?
मी जपावे अजून भास किती?

सोबतीला जरी तुझी छाया...
मी करू पांगळा प्रवास किती?


गझलकार - सुरेश भट.

Monday, April 13, 2009

मी नाही!

जिवंत कोण? कुणालाच बातमी नाही
दिसे हरेक तरी... सावली हमी नाही

किती धुवाल तुम्ही रक्त शेवटी अमुचे
पचेल खून असा रंग मोसमी नाही

जपून वेच, फुले ही जनावरांसाठी
अरे, वसंत असा येत नेहमी नाही!

अम्हास रोज तुझे शब्द सांगतो वारा
तुला कळेल... तुझी शॄंखला घुमी नाही

धनुष्यबाण जरी शोधशोधतो आम्ही
कसे अरण्य, इथे एकही शमी नाही!

दिलास तूच मला तूच हा रिता पेला
नसेल थेंब, तरी धुंद ही कमी नाही!

विचारतेस कशी बावरुन ताऱ्यांना...
घरासमोर तुझ्या चांदण्यात मी नाही!


गझलकार - सुरेश भट.

Thursday, April 9, 2009

शाई, कागद, टांक...

शाई, कागद, टांक, रूळ, रबरे इत्यादी लेखायुधे
(काड्या आणि विड्या तशा!) जमवुनी खोलीत तो बैसला!
स्फूर्तीचा झटका असा न जबरा आला कधी त्याजला-
"काव्याची उठवीन मी दसकडी या बैठकीला!" वदे!

टाकी बंद करून सर्व खिडक्या-जाळ्या, झरोके तसे
दारालाही तशीच लावित कडी आतूनबाहेरुनी!
दोस्ताला कुठल्यातरी बसविले दारावरी राखणी;
"काव्याची बघतो मिजास!" वदला अस्पष्ट काही असे!

आता कंबर बांधुनीच कवने 'पाडावया' तो बसे
वार्ता ही वणव्यासमान पसरे गल्लीत चोहीकडे!
आले धावुनि लोक सर्व! दुसरे कोणा सुचावे कसे?
चिंताक्रान्त मुखे करूनि बसले निःस्तब्ध दारापुढे!

झाला तब्बल तास! चाहुल परी काही न ये आतुनी,
सर्वांचा अगदीच धीर सुटला! कोमेजले चेहरे!
भाळी लावुनि हात कोणी वदती "मजी प्रभूची बऽऽरे!"
दृष्टी खिन्नपणे नभी वळवुनी निःश्वास टाकी कुणी!

गंभीर ध्वनि तोच आतुनि निघे! उंचावली मस्तके!
श्वासोच्छ्वास क्षणैक थांबत! मुखे रुंदावली कौतुके!
डोकावूनि बघे फटींतुनि कुणी-तो त्या दिसे अद्‌भुत!
होता बाड उरी धरून पडला निश्चित तो घोरत!!


कवी - प्र. के. अत्रे .

Tuesday, April 7, 2009

संक्षेप

हा ठोकरून गेला, तो वापरून गेला..
जो भेटला मला तो वांधा करून गेला!

वेशीवरी मनाच्या आले सवाल सारे
माझा सवाल माझ्या ओठी विरून गेला

माझ्याविना फुलांची दिंडी निघून गेली
काटाच प्यार आता जो मोहरून गेला

चाहूल ही तुझी की, ही हूल चांदण्याची?
जो चंद्र पाहिला मी तोही दुरून गेला!

केव्हाच आसवांची गेली पुसून गावे..
स्वप्नामधेच माझा रस्ता सरून गेला

बोलू कुणास देई आकांत हा सुखाचा?
मागेच दु:खितांचा टाहो मरून गेला!

कानात कोठडीच्या किंचाळला झरोका-
"बाहेर एक कैदी तारा धरून गेला!"

आजन्म ही तुझी मी केल्यावरी प्रतीक्षा..
माझाच भास माझ्या अंगावरून गेला!


गझलकार - सुरेश भट

Thursday, April 2, 2009

पाखरा येशिल का परतून?

पाखरा येशिल का परतून?

मत्प्रेमाने दिल्या खुणांतुन एकतरी आठवून?
पाखरा...

हवे सवें मिसळल्या माझिया निश्वासा वळखून?
पाखरा...

वा‌‌र्‍यावरचा तरंग चंचल जाशिल तू भडकून!
पाखरा...

थांब घेऊदे रूप तुझे हे ह्रुदयी पूर्ण भरुन!
पाखरा...

जन्मवरी मजसवें पहा ही तवचंचूची खूण!
पाखरा...

विसर मला, परि अमर्याद जग राहीं नित्य जपून!
पाखरा...

ये आता घे शेवटचे हे अश्रू दोन पिऊन!
पाखरा येशिल का परतून?


कवी - ना. वा. टिळक.

Wednesday, April 1, 2009

परीटास...

परिटा येशिल कधी परतून?

काल दिलेल्या कपड्यांमधले दोन चार हरवून!
परिटा...

कोट रेशमी लग्नामधला मानेवर उसवून!
परिटा...

उरल्या सुरल्या गुंड्यांचीही वासलात लावून!
परिटा...

बारिकसारिक हातरुमाला हातोहात उडवून!
परिटा...

सद‍र्यांची या इस्तरिंने तव चाळण पार करुन!
परिटा...

खमिसांची ही धिरडी खरपुस भट्टीमधें परतून!
परिटा...

तिच्या भरजरी पैठणीची या मच्छरदाणी करुन!
परिटा...

गावांतील कपड्यांची सगळ्या गल्लत छान करुन!
परिटा...

रुमाल जरीचे आणि उपरणीं महिनाभर नेसुन!
परिटा...

सणासुदीला मात्र वाढणे घेई तुझे चोपुन!
परिटा येशिल कधी परतून?


कवी - केशवकुमार

Tuesday, March 31, 2009

दोष असती जगतात...

दोष असती जगतात किती याचे
नसे मजला सामर्थ्य गणायाचे,
दोष माझा परि हाच मला वाटे
दोष बघता सत्प्रेम कसे आटे?

दोष असती जगतात, असायचे
मला त्यांशी तरि काय करायाचे?
प्रेमगंगेच्या शुद्ध सिंचनेही
शुद्ध होई न जो -दोष असा नाही.

गड्या पुर्णा! मज आस तुझी नाही
सख्या न्युना, ये मार मिठी देही
प्रीति माझ्या ह्रदयात करी वास
न्युनतेला पुर्णत्व द्यावयास !


कवी - बालकवी

Thursday, March 26, 2009

कषाय-पेय-पात्र-पतित मक्षिकेप्रत

कषाय-पेय-पात्र-पतित मक्षिकेप्रत
(अर्थात - चहाच्या कपात पडलेल्या माशीस... :) )

अयि नरांग-मल-शोणित-भक्षिके,
जनु-विनाशक-जंतु-सुरक्षिके!
असु-परीक्षित-हारक-तक्षिके,
'क्या हुवा अफसोस!' मक्षिके.

या प्रभातसमयास मंगल,
चमकती दंवमौक्तिक निर्मल,
गात पक्षिगण हा गगनी फिरे,
पण दशा तव काय अर-अरे!

ओसरीवरुनि या तव मैत्रिणी,
गात स्वैर फिरतात सुलक्षणी;
परि तुला न बघती मुळि ढुंकुनी,
'संकटी जगि कुणा न असे कुणी!'

मंडई नव्हति का तुज मोकळी,
की मिठाई 'मघुरा-भुवनांतली',
नव्हति का 'उपहार-गृहे' खुली,
म्हणुनि आलिस शहरातिल बोळ ते,
मनुजवस्तित आलीस का इथे!

करीत 'दत्तु-भट' काय तपासणी
म्हणुनि घाबरुनी आलीस तू झणी!
शर्कराकण येथिल सांडले
सेवुनी न तुज सौख्य जाहले?

की 'यमी' करिंचे गुळखोबरे,
शमवी भूक न काय तुझी बरे?
पेय बोलुनिचालुनि घातकी,
बुडविते बघ भारतियास की !

या अशा व्यसनात विलायती,
अडकता फळ दारुण शेवटी !
नर जसा बुडतो भवडोही
तेवि खालिवर जासि अयाई!

काडी वाचवि जरी बुडत्याला,
काडीचा न परि आश्रय गे तुला!
स्थिति तुझी करुणास्पद ही अशी.
बघु तरी उघड्या नयनी कशी?

अंगि तेवि भरले भयकापरे,
आणि त्यात निवला न चहा बरे!
हाय! सोडुनि जाशिल ना अम्हा,
छे, सले नुसती मनी कल्पना?

समिप पाउसकाळहि पातला,
आणि तू निघुनि जाशिच आजला!
अहह, आम्रफल-मोसम येईल,
अम्हि असू परि तू नसशील!

फेकु सालटि चोखुनि चोखुनि,
तुजविना पण जातिल वाळुनी
तुजविना कवि-मुखे दिसतील की,
भृंगहीन कमळांसम ती फिकी,

कौन्सिलात, सभासद आणी,
मारतील कवणा तुजवाचुनी?
राजकारण रोज नवे नवे,
राष्ट्रभक्त करण्यास तयार हे.

शिंकुनि अहह! देइल त्यापुढे,
त्या इशारत कोण तरी गडे?
यापरी नव-तरंग मनात
येउनी ह्रदय होय कंपित.

पेयपृष्ठि उठली इतुक्यात,
मंद-श्वास,-लहरीसह लाट!

फड फड फड पंखा हालवी ती तराया,
तडफड बहु केली जाहले कष्ट वाया,
मिटवुनि इवलेसे पाय, ती शांत झाली,
अहह, तडक आणि खालती खोल गेली!

टाकुनी लांब सुस्कार, उमाळा दाबुनी उरी,
चहा तो शांत चित्ताने प्राशिला वरचेवरी.


कवी - केशवकुमार

Wednesday, March 25, 2009

कणा

‘ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.

माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा!


कवी - कुसुमाग्रज

Tuesday, March 24, 2009

कवी आणि कारकून

बोले हासुनि कारकून कुठला गर्वे कवीला असे
'माझे साम्य तुझ्यामधे दिसतसे-आहोत बंधू जसे!
दोघेही दिनरात्र ना खरडतो काहीतरी आपण,
जन्माचे पडलेत की ठळक हे बोटास काळे वण!

'माझे अक्षर का कुणास उमगे-आला जरी तो खुदा
ब्रह्याच्याहि पित्यास का समजणे काव्यार्थ तूझा कदा!
येती कागद जे समीप करणे त्यांची मला नक्कल
तूही ना नकला अशाच करिसी-लागे न ज्या अक्कल!

आणे, पै, रुपये हिशेब करितो-ज्यांचे न हो दर्शन,
नाही पाहियली तरी करिसि ना ताराफुले वर्णन?
पोटाचे रडगान मी रडतसे वेळी अवेळी जसे
चाले संतत काव्यरोदन तुझे तीन्ही त्रिकाळी तसे!'

'मित्रा, हे सगळे खरे,' कवि वदे, 'तुझ्याप्रमाणे पण-
माझ्या मूर्खपणास ना दरमहा देई कुणी वेतन!'


कवी - केशवकुमार

Friday, March 20, 2009

येणारा दिवस मला हेटाळत हसणारच...

येणारा दिवस मला हेटाळत हसणारच
जाणारा दिवस मला जाताना डसणारच |

वरवरच्या बोलण्यात गेली बघ रात्र सरून
मावळता चंद्र तुझे नाव मला पुसणारच |

देताना हृदय तुला केला मी हा विचार-
'घेणारा घेणारच! देणारा फसणारच ' |

हारूनही लाखवार माझी झाली न हार
मी माझ्या स्वप्नांना फिरफिरून पिसणारच |

माझे घर वार्‍याचे अन् पायच पार्‍याचे
मी जगास रस्त्यावर गाताना दिसणारच |

काही भलतेच लोक तेव्हा करतील शोक
तेव्हाही मी त्यांच्या आसवांत नसणारच |


गझलकार - सुरेश भट

Thursday, March 19, 2009

वणवण

रुणझुणत राहिलो, किणकिणत राहिलो,
जन्मभर मी तुला 'ये' म्हणत राहिलो|

सांत्वनांना तरी हृदय होते कुठे?
रोज माझेच मी मन चिणत राहिलो|

ऐकणारे तिथे दगड होते जरी,
मीच वेड्यापरी गुणगुणत राहिलो|

शेवटी राहिले घर सुनेच्या सुने...
उंबऱ्यावरच मी तणतणत राहिलो|

ऐनवेळी उभे गाव झाले मुके;
मीच रस्त्यावरी खणखणत राहिलो|

विझत होते जरी दीप भवतालचे,
आतल्या आत मी मिणमिणत राहिलो|

दूर गेल्या पुन्हा जवळच्या सावल्या
मी जसाच्या तसा रणरणत राहिलो|

मज न ताराच तो गवसला नेमका...
अंबरापार मी वणवणत राहिलो|


गझलकार - सुरेश भट

Wednesday, March 18, 2009

लावण्य

असे काहीतरी आगळे लावण्य केव्हा कधीकाळी दिसून जाते
वेगळ्या सौंदर्य-पर्युत्सुक जीवा जन्मांतरीचे सांगत नाते

नसते निव्वळ गात्रांची चारुता त्याहून अधिक असते काही
ठाव त्याचा कधी लागत नाही आणि आठवण बुजत नाही

रुप रेखेत बांधलेले तरी मोकळी खेळते त्यातून आभा
डोळ्याआडाच्या दीपज्योतीहून निराळी भासते प्रकाशप्रभा

आधीच पाहिले पाहिले वाटते पहिलेच होते दर्शन जरी
स्मरणाच्या सीमेपलिकडले कुठले मीलन जाणवते तरी

पुन्हा तहानेले होतात प्राण मन जिव्हाळा धाडून देते
जागच्या जागी राहून हृदय प्रीतीचा वर्षाव करून घेते !


कवी - अनिल

Tuesday, March 17, 2009

केवढे हे क्रौर्य!

क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी;
किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.

म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला;
करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,
करो जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!

अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना;
तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी,
क्षणैक बसले तो शिरे बाण माझ्या उरीं.

निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय,
म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला,
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!

म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां
म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा;
स्मरा मजबरोबरी परि दयाघना इश्वरा.

असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी;
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक;
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!


कवी - ना. वा. टिळक.

Monday, March 16, 2009

या झोपडीत माझ्या

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥

महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥

पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥


संत तुकडोजी महाराज

Friday, March 13, 2009

मावळत्या दिनकरा

मावळत्या दिनकरा अर्घ्य तुज
जोडुनि दोन्ही करा |

जो तो वंदन करी उगवत्या,
जो तो पाठ फिरवि मावळत्या,
रीत जगाची ही रे सवित्या
स्वार्थपरायणपरा |

उपकाराची कुणा आठवण ?
‘शिते तोवरी भूते’ अशी म्हण;
जगात भरले तोंडपूजेपण,
धरी पाठिवर शरा |

आसक्त परि तू केलीस वणवण,
दिलेस जीवन, हे नारायण,
मनी न धरिले सानथोरपण,
समदर्शी तू खरा |

प्रभु-सचिवा विरही मुखधूसर
होति दयामृदु नयनिष्ठुर कर
टाकुनि कारभार चंद्रावर
चाललास तू खरा |


कवी - भा.रा.तांबे

Thursday, March 12, 2009

एखाद्याचें नशीब

काही गोड फुलें सदा विहरती स्वगागनांच्या शिरीं,
काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरीं;
काही जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि तें,
एखादे फुटकें नशीब म्हणुनी प्रेतास शृंगारितें ।

कोणी पर्वत आपुल्या शिरिं धरि हैमप्रभा शीतला,
कोणाच्या उदरामधून निघती मोठया नद्या निर्मला;
कोणाला वनदेवता वरितसे मोदांत जी नाहते,
एकाद्यामधुनी परंतु जळती ज्वालानदी वाहते !

झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,
स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळ्या पानांवरी नाचती;
सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते,
एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !

चाले खेळ असा जगांत; बहुधा सौख्यांत सारे जरी,
एखादा पडतो तसाच चुकुनी दुःखार्णवीं यापरी
पाही कोण अशा हताश हृदया ? जो तो असे आपला,
देवा ! तूं तरि टाकिं अश्रु वरुनी, त्यासाठीं तो तापला !


कवी - गोविंदाग्रज

Wednesday, March 11, 2009

खाली डोकं, वर पाय!

जेव्हा तिला वाटत असतं, तुम्ही जवळ यावं
जवळ यावं याचा अर्थ, तुम्ही जवळ घ्यावं !
अशा क्षणी चष्मा पुसत, तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला,
व्यामिश्र अनुभूती, शब्दांनी तोलत बसला !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

जेव्हा ती लाजत म्हणते, “आज आपण पावसात जायचं”
याचा अर्थ चिंब भिजून, तिला घट्ट जवळ घ्यायचं,
भिजल्यामुळे खोकला होणार, हे तुम्ही आधीच ताडलंत,
भिजणं टाळून खिशातून, खोकल्याचं औषध काढलंत !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

तिला असतो गुंफायचा, याच क्षणी श्वासात श्वास,
अनंततेवर काळाच्या, तुमचा असतो दृढ विश्वास,
तुम्ही म्हणता थांब जरा,
आणि होता लांब जरा,
तुम्ही चिंतन करीत म्हणता, “दोन श्वासांमध्ये जे अंतर असतं,
काळाच्या पकडीत ते कधीसुद्धा मिळत नसतं !”
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

भाषेच्या ज्ञानाने तर, तुम्ही महामंडित असता,
व्याकरणाचे बारकावे, त्याचे तुम्ही पंडित असता,
ती ओठ जवळ आणते, व्याकरणात तुम्ही शिरता,
ओठ हे सर्वनाम? त्याचा तुम्ही विचार करता !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !


कवी - मंगेश पाडगावकर

Tuesday, March 10, 2009

दर्जेदार

ती कुणाची झुंज होती? तो कसा जोहार होता?
जो निखारा वेचला मी तो निखारा गार होता!

हा कसा आता उन्हाचा निर्दयी पाऊस आला?
मी मघाशी पाहिलेला मेघ काळाशार होता!

गांजले ज्यांनी मला ते शेवटी माझेच होते...
हा कळीचा दंश होता! तो फुलांचा वार होता!

ह्या करंट्यांनी स्वतःचे फोडले आधीच डोळे..
(त्यांचियासाठी उद्याचा सूर्य अत्याचार होता!)

स्वागतासाठीच माझ्या भुंकले ते आदराने
थुंकले तोंडावरी तो केवढा सत्कार होता!

गाडल्या त्यांनी पिढ्या अन् ठेवला नाही पुरावा
ह्या स्मशानाच्या धन्यांचा देव ताबेदार होता!

लागला आहे अताशा वेदनेचा शौक त्यांना
(एरवी, त्यांचा सुखाचा चोरटा व्यापार होता!)

चोरली माझ्या घराची राखही त्याने परंतू
मी न केला ओरडा... तो चोर अब्रूदार होता!

पाहिला नाही जरी मी चेहरा मारेकर्‍याचा
लोकहो, माझा तरीही खून दर्जेदार होता!


गझलकार - सुरेश भट

Monday, March 9, 2009

अनय

नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात;
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून,
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून
तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे
धुंदमदिर निळे तळे.

त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा अळता लावलेली तुझी पावले
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता
पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न्‌ कण
प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना.

कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दु:खाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.
तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं
त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.
राधे, पुरुष असाही असतो!


कवयित्री - अरुणा ढेरे

Tuesday, March 3, 2009

सलाम

सलाम
सबको सलाम
ज्याच्या हातात दंडा
त्याला सलाम,
लाथेच्या भयाने
डावा हात गांडीवर ठेवून
उजव्या हाताने सलाम,
बघणाऱ्याला सलाम,
न बघणाऱ्याला सलाम,
विकत घेणाऱ्याला सलाम,
विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला सलाम,
सलाम, भाई, सबको सलाम.

वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम,
शेंदूर थापलेल्या दगडाला सलाम,
लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम,
देवळांतल्या देवांच्या धाकाला सलाम,
देवांचे आणि धर्मांचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम,
रिकाम्या हातातून उद काढणाऱ्या बडेबुवाला सलाम,
शनीला सलाम,
मंगळाला सलाम,
भीतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम,
आईवर आयुष्यभर गुरगुरणाऱ्या बापाला सलाम,
बापावर गुरगुरणाऱ्या साहेबाला सलाम,
साहेबाची टरकावणाऱ्या
त्याच्या साहेबाला सलाम,
सलाम, प्यारे भाईयों और बेहेनों,
सबको सलाम.

ज्याच्या हातात वृत्तपत्र
त्याला सलाम,
भाषणांचे, सभांचे
फोटोसकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम,
वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम,
त्यांची वेसण धरणाऱ्या
राज्यकर्त्यांना सलाम,
ज्याच्या समोर माइक्रोफोन
त्याला सलाम,
त्यातून न थांबता बोलतो
त्याला सलाम,
लाखोंच्या गर्दीला सलाम,
गर्दी झुलवणाऱ्या
जादूगारांना सलाम,
भाईयों और बेहेनों सबको सलाम.

नाक्यावरच्या दादाला सलाम,
हातभट़्टीवाल्याला सलाम,
स्मगलरला सलाम,
मटकेवाल्याला सलाम,
त्यांनी पेरलेल्या हफ्त्यांना सलाम,
लोकशाहीलाबी सलाम,
ठोकरशाहीलाही सलाम,
सत्तेचा ट्रक चालविणाऱ्यांना सलाम,
ट्रकखाली चिरडलेल्या
गांडुळांना, कुत्र्यांना सलाम,
ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम,
विमानातून बॉंम्ब फेकणाऱ्यांना सलाम,
शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापाऱ्यांना सलाम,
काळाबाजारवाल्यांना सलाम,
त्यांना फाशी देण्याची घोषणा करणाऱ्यांना सलाम;
गटारातल्या पाण्याने इंजेक्शने भरणाऱ्यांना सलाम,
तिरडीचे समान विकणाऱ्यांना सलम,
तिरडी उचलणाऱ्या खांद्यांना सलाम,
मौत सस्ती करणाऱ्या सर्वांना सलाम,
सलाम, प्यारे दोस्तों, सबको सलाम.

बिळांना सलाम,
बिळांतल्या उंदरांना सलाम,
घरातल्या झुरळांना सलाम,
खाटेतल्या ढेकणांना सलाम,
गजकर्णी भिंतींना सलाम,
पिचलेल्या बायकोला सलाम,
दीड खोलीतल्या पोर्वड्याला सलाम,
गाडीत चेंगरणाऱ्या गर्दीला सलाम,
किडक्या धान्याला सलाम,
भोके पडलेल्या पिवळ्या गन्जिफ्रोकला सलाम,
धंद्याच्या मालकाला सलाम,
युनियनच्या लिडरला सलाम,
संपाला सलाम,
उपासमारीला सलाम,
सर्व रंगाच्या सर्व झेंड्यांना सलाम,
चाळीचाळीतून तुंबलेल्या
संडासातल्या लेंड्यांना सलाम,
मानगूट पकडणाऱ्या
प्रत्येक हाताला सलाम,
सलाम, भाईयों और बेहेनों, सबको सलाम.

या माझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम,
या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम,
सर्व बिलंदर घोषणांना सलाम,
जातिभेदांच्या उकिरड्यांना सलाम,
या उकिउरडयांतून सत्तेचे पीक काढणाऱ्यांना सलाम,
उपनिषदे आणि वेदांना सलाम,
साखरकारखान्यांच्या दादांना सलाम,
त्यांच्या शेकडो लॉऱ्यांना सलाम,
निवडणुकींना सलाम,
निवडणुकफंडाला सलाम,
अदृश्य बुक्क्यांना सलाम,
मतांच्या आंधळ्या शिक्क्यांना सलाम,
ससा हाती असलेल्या पारध्यांना सलाम,
त्यांच्या तैनातीतल्या गारद्यांना सलाम,
दलितांवर अत्याचार करणाऱ्यांना सलाम,
या बातम्या वाचणाऱ्या सर्व षंढांना सलाम,
सलाम, भाईयों और भैनों, सबको सलाम.

सत्ता संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हटले
तर डोके फोडतील ,
हलकट लाचारांचा देश म्हटले
तर रस्त्यावर झोडतील,
खरीदले जाणाऱ्यांचा देश म्हटले
तर वाटा रोखतील,
देवाधर्माविषयी, नेत्यांविषयी वाईट बोललो
तर नाक्यावर गाठून ठोकतील,
शोषण करणाऱ्यांचा देश म्हटले
तर नोकरीवरून काढतील;
म्हणून आधी माझ्या नपुंसकत्वाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच
या माझा
परमपवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम,
या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.
सलाम
प्यारे भाईयों और बेहेनों, सबको सलाम,

अनेक हात असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकिन माफ़ करना भाईयों,
हात तर दोनच
आणि त्यातला डावा
लाथेच्या भयाने
ठेवलेला गांडीवर
म्हणून फक्त
उजव्या हाताने सलाम,
सलाम, सबको सलाम
भाईयों और बेहेनों, सबको सलाम.


कवी - मंगेश पाडगावकर.

Monday, March 2, 2009

सिद्धांत आसवांचा

आरंभही मी जीवनाचा, रडण्यातुनी केला सुरू
अंतावरी रहील वाटे, कार्य हे माझे सुरू

आता जसा निःशंक रडण्या, सरसावलो थोडा पुढे
आले स्वये भगवान, आणि टाकली गीता पुढे

याही जरी जन्मात आम्हा देइल ना कोणी रडू
मी तरी सांगा अता कोठे रडू, केव्हा रडू

बोललो रडलास तूही, हरवता सीता तुझी
रडता अम्ही आम्हापुढे, टाकसी गीता तुझी?

ओशाळला ऐकून आली, सारी स्मृती त्याला पुन्हा
भगवानही मी काय सांगू, माझ्या पुढे रडला पुन्हा

आसवे आम्हीच पुसली, नयनातली आम्ही स्वये
प्रार्थुनी म्हणतो कसा, सांगू नको कोणास हे

बोललो कि व्यर्थ आहे, परमेश्वरा शंका तुझी
राखायची आहे मलाही, परमेश्वरा अब्रू तुझी

रडण्यातही सौंदर्य माझ्या, ना जरी बघते कुणी
भगवन अरे, ही शायरीही ऐकली नसती कुणी

सिद्धांत ऐसा आसवांचा, त्यालाच मी सांगितला
होता जसा युद्धात त्याने, कुंतीसुता सांगितला

बोलला, साक्षात अविध्यानाथ आम्ही पहिला
पार्थाहुनीही मूर्ख आम्ही, अद्याप नव्हता पाहिला.


कवी - भाऊसाहेब पाटणकर

Friday, February 27, 2009

चूक

क्षणोक्षणी चुका घडतात,
आणि श्रेय हरवून बसतात.
आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला
फार काही शिकवत असतात.
कणभर चुकीलाही
आभाळाएवढी सजा असते,
चुक आणि शिक्षा यांची कधी
ताळेबंदी मांडायची नसते
एक कृती, एक शब्द
एकच निमिष हुकतं-हुकतं
उभ्या जन्माच्या चुकामुकीला
तेवढं एक निमित्त पुरतं
अखेर हे सारं घडतं केवळ आपण काही शिकण्यासाठी
आपण मात्र शिकत असतो
पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी!


कवी - सुधीर मोघे

Thursday, February 26, 2009

हसलो म्हणजे...

हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही
हसलो म्हणजे दु:खी नव्हतो ऐसे नाही

हसलो म्हणजे फक्त स्वत:च्या फजितीवर
निर्लज्यागत दिधली होती स्वत:च टाळी;
हसलो कारण शक्यच नव्हते दुसरे काही
डोळ्यामधे पाणी नव्हते ऐसे नाही.

हसतो कारण तुच कधि होतीस म्हणाली
याहुन तव चेहरयाला काही शोभत नाही;
हसतो कारण तुला विसरणे जितके अवघड
तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही.

हसतो कारण दुसऱ्यानाही बरे वाटते
हसतो कारण तुला सुद्धा ते 'खरे' वाटते;
हसलो म्हणजे फक्त दाखवली फुले कागदी
आतुन आलो होतो बहरुन ऐसे नाही.

हसतो कारण जरी बत्तिशी कुरुप आहे
खाण्याची अन् दाखवण्याची एकच आहे;
हसतो कारण सत्याची मज भिती नाही
हसतो कारण हसण्यावाचुन सुटका नाही.


कवी - संदीप खरे

Wednesday, February 25, 2009

सब घोडे बारा टक्के!

जितकी डोकी तितकी मते
जितकी शिते तितकी भूते;
कोणी मवाळ कोणी जहाल
कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी ढीले कोणी घट्ट;
कोणी कच्चे कोणी पक्के
सब घोडे बारा टक्के!

गोड गोड जुन्या थापा
(तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग
जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार?
आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्या मधे
पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के
सब घोडे बारा टक्के!

जिकडे सत्ता तिकडे पोळी
जिकडे सत्य तिकडे गोळी;
(जिकडे टक्के तिकडे टोळी)
ज्याचा पैसा त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता;
पुन्हा पुन्हा जुनाच स्वार
मंद घोडा जुना स्वार;
याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!

सब घोडे! चंदी कमी;
कोण देईल त्यांची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी;
कोण देईल माझा हरी?
कोणी तरी देईन म्हणा
मीच फसविन माझ्या मना!
भुकेपेक्षा भ्रम बरा;
कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्र्या कोणी छक्के;
सब घोडे बारा टक्के!


कवी - विंदा करंदीकर

Tuesday, February 24, 2009

मी

कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची;
कधी वाढता वाढता व्योम व्यापी
कधी धावतो विश्व चुंबावयाला
कधी आपणाला स्वहस्तेच शापी

कधी याचितो सत कधी स्वप्न याची
कधी धावतो काळ टाकुन मागे
कधी वर्षतो अमृताच्या सरी अन
कधी मृत्युच्यी भाबडी भीक मागे

कधी दैन्यवाणा, निराधर होई
कधी गुढ, गंभीर, आत्मप्रकाशी
कधी गर्जतो सागराच्या बळाने;
कधी कापतो बोलता आपणाशी!

कधी आपणा सर्व पिंडात शोधी;
कधी पाहतो आत्मरुपात सारे;
कधी मोजीतो आपणाला अनंते
अणुरुप होती जिथे सुर्य, तारे

टळेना अहंकार साध्या कृतीचा;
गळेना महापुच्छ स्वार्थी स्मृतीचे;
कधी घेतसे सोंग ते सत्य वाटे!
कधी सत्य ते वाटते सोंग साचे!

कधी संयमी, संशयात्मा, विरागी
कधी आततायी, कधी मत्तकामी
असा मी... तसा मी... कसा मी कळेना;
स्वतःच्या घरी दुरचा पाहुणा मी!


कवी - विंदा करंदीकर

Monday, February 23, 2009

आलाप

मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते!
कुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते!

वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही!
उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते?

कुठेतरी पाहिले तुला मी, जरी तुझे नाव आठवेना...
करू तरी काय? हाय, तेंव्हा खरेच डोळे नशेत होते!

असूनही बेचिराख जेंव्हा जगायचे श्रेय जिंकले मी,
कितीतरी लोक आसवांची प्रमाणपत्रेच घेत होते!

जरी जिवाला नकोनकोशी हयात हासून काढली मी
निदान जे दु:ख सोसले, ते सुखात होते! मजेत होते!

बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो?
धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते!

मला विचारू नकोस आता, कुठून हे शब्द आणले मी?
तुझेच आलाप काल रात्री उसासणार्‍या हवेत होते!


गझलकार - सुरेश भट

Friday, February 20, 2009

यार हो

सूर्य केव्हाच अंधारला यार हो
या, नवा सूर्य आणू चला यार हो

हे नवे फक्त आले पहारेकरी
कैदखाना नवा कोठला यार हो

ते सुखासीन संताप गेले कुठे
हाय, जो तो मुका बैसला यार हो

चालण्याची नको एवढी कौतुके
थांबणेही अघोरी कला यार हो

जे न बोलायचे तेच मी बोलतो
मीच माणूस नाही भला यार हो

सोडली मी जरी स्वप्नभूमी तरी
जीवनाची टळेना बला यार हो

हासण्याची मिळाली अनुज्ञा कधी?
हुंदकाही नसे आपला यार हो

ओळखीचा निघे रोज मारेकरी
ओळखीचाच धोका मला यार हो

लोक रस्त्यावरी यावया लागले
दूर नाही अता फैसला यार हो

आज घालू नका हार माझ्या गळा
(मी कुणाचा गळा कापला यार हो)


गझलकार - सुरेश भट

Thursday, February 19, 2009

जाणता राजा

निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥

परोपकाराचिये राशी । उदंड घडती जयासी ।
तयाचे गुणमहत्त्वासी । तुळणा कैची ॥

यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
नीतिवंत पुण्यवंत । जाणता राजा ॥

आचारशीळ विचारशीळ । दानशीळ धर्मशीळ ।
सर्वज्ञपणे सुशीळ । सकळां ठायी ॥

नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागीं ॥

धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥

तीर्थेक्षेत्रे मोडिली । ब्राह्मणस्थाने भ्रष्ट जाली ।
सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥

देव-धर्म-गोब्राह्मण । करावया संरक्षण ।
हृदयस्थ जाला नारायण । प्रेरणा केली ॥

उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याज्ञिक वैदिक ।
धूर्त तार्किक सभानायक । तुमच्या ठायी ॥

या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्रधर्म राहिला काही । तुम्हां कारणे ॥

आणिकही धर्मकृत्ये चालती । आश्रित होऊन कित्येक राहती ।
धन्य धन्य तुमची कीर्ती । विश्वीं विस्तारिली ॥

कित्येक दुष्ट संहारिले । कित्येकांसी धाक सुटले ।
कित्येकांस आश्रय जाले । शिवकल्याण राजा ॥

तुमचे देशी वास्तव्य केले । परंतु वर्तमान नाही घेतले ।
ऋणानुबंधे विस्मरण जाले । काय नेणो ॥

सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती । सांगणे काय तुम्हाप्रती ।
धर्मसंस्थापनेची कीर्ती । सांभाळिली पाहिजे ॥

उदंड राजकारण तटले । तेणे चित्त विभागले ।
प्रसंग नसता लिहिले । क्षमा केली पाहिजे ॥


समर्थ रामदासांनी छत्रपतींस लिहीलेल्या पत्रातून...

Wednesday, February 18, 2009

साफसाफ

कुठलेच फूल आता मजला पसंत नाही
कळते मला अरे हा माझा वसंत नाही

हा कालच्या विषाचा दिसतो नवीन प्याला
समजू नकोस माझ्या फसण्यास अंत नाही

जमवूनही तुझ्याशी माझेतुझे जमेना
इतका तुझ्याप्रमाणे मी शोभिवंत नाही

मी सोडणार नाही हे गाव आपल्यांचे
सारीच माणसे अन् कोणीच संत नाही

थकुनी किती प्रवासी पडले धुळीत मागे..
रस्त्यास वाहणार्‍या कसलीच खंत नाही

मजला दिलेस कां तू वरदान विस्तवाचे?
दुनिये, अता रडाया मजला उसंत नाही

दारात दु:खितांच्या मी शब्द मागणारा
(तितकी अजून माझी कीर्ती दिगंत नाही)

मी रंग पाहिला ह्या मुर्दाड मैफलीचा..
कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही!


गझलकार - सुरेश भट.

Tuesday, February 17, 2009

जानवी

सांगा कुणीतरी या आकाशखाजव्यांना-
"मातीच मोक्ष देई कंगाल नागव्यांना!"

आहे जरी उभा मी निष्पर्ण माळरानी
या स्वप्नपाखरांच्या रोखू कसा थव्यांना?

आली नव्या जगाची आली पहाट आली
आता उन्हात आणू पाळीव काजव्यांना!

येती जरी समोरी सारे नकोनकोसे
मीही नकोनकोसा झालो हव्याहव्यांना

साधाच मी भिकारी, माझी रितीच झोळी
गावात मान त्यांच्या श्रीमंत जोगव्यांना!

प्रत्येक आतड्याचा मी पीळ होत आहे
ते मात्र गाठ देती त्यांच्याच जानव्यांना!


गझलकार - सुरेश भट.

Monday, February 16, 2009

मनातलीचे श्लोक

प्रिये ये निघोनी घनांच्या कडेने
मला एकटेसे आता वाटताहे,
कुणालाच जे सांगता येत नाही
असे काहीसे मन्मनी दाटताहे.

असे वाटते की तुझ्या पास यावे
तुझ्या सौम्य नेत्रातले नीर व्हावे,
परंतू मला वेळ बांधुन नेते
कधी मुक्तता हे कुणाला ना ठावे.

नको वाटते वाट ह्या पावलांना
नको हालचाली... तनाच्या... मनाच्या,
नकोसे शुभारंभ ध्येया - भियाचे
नकोशाच गप्पा आता सांगतेच्या...

असे वाटते की कधी कोणी नव्हतो
न आहे, न वाहे उरातुन श्वास,
उरा - अंतरातुन यांत्रिकतेने
फिरे फक्त वारा... किंवा तो ही भास!

न ठावे किती वेळ चालेल खेळ
न ठावे किती चावी या माकडाची,
जशी ओढती माळ तैशीच मोजू
भली लांब जपमाळ फुटक्या क्षणांची.

सये पाय दगडी नि दगडीच माथा
अशा देवळातून जाऊन येतो,
न देई कुणा घेतल्यावीण त्याला
नमस्कार नेमस्त देउन येतो.

दिसे जे कवीला न दिसते रवीला
सांगून गेले कुणीसे शहाणे,
मला तू न दिसशी परंतू तयांच्या
नशिबी कसे सांग तुजला पहाणे.

असे वाटणे ही अशी सांज त्यात
दुरावा स्वत:शी तुझ्याशी दुरावा,
किती फाटतो जीव सग्ळ्यात ह्यात
मिठीतुन देईन सगळा पुरावा.


कवी - संदीप खरे

Friday, February 13, 2009

प्रेमात पडलं की असंच व्हायचं

माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं

तिचं बोलणं, तिचं हसणं
जवळपास नसूनही जवळ असणं;
जिवणीशी खेळ करीत खोटं रुसणं
अचानक स्वप्नात दिसणं !

खटयाळ पावसात चिंब न्हायचं
माझं काय, तुमचं काय
प्रेमात पडलं की असच व्हायचं

केसांची बट तिने हळूच मागं सारली ...
डावा हात होता की उजवा हात होता?

आपण सारखं आठवतो,
प्रत्येक क्षण,
मनात आपल्या साठवतो

ती रुमाल विसरुन गेली !
विसरुन गेली की ठेवून गेली?
आपण सारखं आठवतो,
प्रत्येक क्षण मनात आपल्या साठवतो

आठवणींचं चांदण
असं झेलून घ्यायचं !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं

तिची वाट बघत आपण उभे असतो ...
ठरलेली वेळ कधीच टळलेली !
येरझारा घालणंसुद्धा
शक्य नसतं रस्त्यावर,
सगळ्यांची नजर असते आपल्यावरच खिळलेली

माणसं येतात, माणसं जातात
आपल्याकडे संशयाने रोखून बघतात

उभे असतो आपण
आपले मोजीत श्वासः
एक तास ! चक्क अगदी एक तास !!

अशी आपली तपश्चर्या
आपलं त्राण तगवते
अखेर ती उगवते !

इतकी सहज! इतकी शांत !
चलबिचल मुळीच नाही,
ठरलेल्या वेळेआधीच
आली होती जशी काही !

मग तिचा मंजुळ प्रश्नः
"अय्या! तुम्ही आलात पण?"
आणि आपलं गोड उत्तरः
"नुकताच गं, तुझ्याआधी काही क्षण!"

काळावर मात अशी
तिच्यासोबत भुलत जायचं;
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं


एकच वचन
कितीदा देतो आपण
एकच शपथ कितीदा घेतो आपण ?

तरीसुद्धा आपले शब्द
प्रत्येक वेळी नवे असतात;
पुन्हा पुन्हा येऊनही
पुन्हा पुन्हा हवे असतात

साधंसुधं बोलताना
ती उगीच लाजू लगते,
फुलांची नाजूक गत
आपल्या मनात वाजू लागते

उत्सुक उत्सुक सरींनी
आभाळ आपल्या मनावर झरुन जातं;
भिजलेल्या मातीसारखं
आपलं असणं सुगंधाने भरुन जातं

भरलेल्या ढगासारखं
मनाचं भरलेपण उधळून द्यायचं;
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं


कवी - मंगेश पाडगावकर

Thursday, February 12, 2009

मी तिला विचारलं

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटलं ,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…

तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घडलं ?
त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं…

तुमचं लग्न ठरवून झालं ?
कोवळेपण हरवून झालं ?
देणार काय ? घेणार काय ?
हुंडा किती ,बिंडा किती ?
याचा मान , त्याचा पान
सगळा मामला रोख होता ,
व्यवहार भलताच चोख होता..
हे सगळं तुम्हाला सांगून तरी कळणार कसं
असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं…

ते सगळं जाऊ द्या, मला माझं गाणं गाऊ द्या..
मी तिला विचारलं ,
तिनं लाजून होय म्हटलं ,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….

त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,
इराण्याच्या हॉटेलात,
चहासोबत मस्कापाव मागवला
तेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,
देवच तेव्हा असे वाली ,खिशातलं पाकीट खाली
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत
जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….

मग एक दिवस,
चंद्र, सूर्य, तारे, वारे,
सगळं मनात साठवलं,
आणि थरथरणार्‍या हातांनी ,
तिला प्रेमपत्रं पाठवलं
आधीच माझं अक्षर कापरं
त्या दिवशी अधिकचं कापलं
रक्ताचं तर सोडाच राव
हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं
पत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,
पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं
पत्रं तिला पोचलं तरीसुद्धा
तुम्हाला सांगतो,
पोष्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,
माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे

मनाच्या फ़ांदीवर,
गुणी पाखरु येऊन बसलं

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटलं
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं……

पुढे मग तिच्याशीच लग्नं झालं,मुलं झाली,
संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली
मी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली…

तसा प्रत्येकजण नेक असतो,
फ़रक मात्र एक असतो
कोणता फ़रक?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं


कवी - मंगेश पाडगांवकर

Wednesday, February 11, 2009

कसे सरतील सये

कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
गुलाबाची फ़ुलं दोन रोज राती डोळ्‌यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...

पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुझे उरे
ओठ वर हसे हसे उरातुन वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे
आता जरा अळीमिळी तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावुन हसशील ना
गुलाबाची फ़ुलं दोन ...

कोण तुझ्या सौधातून ऊभे असे सामसूम
चिडीचुप सुनसान दिवा
आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच
नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण आठवांचे ओले सण
रोज रोज निजपर भरतील ना,
गुलाबाची फ़ुलं दोन ...

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी
जडेसर काचभर तडा
तूचतूच तुझीतुझी तुझ्यातुझ्या तुझेतुझे
सारासारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतून आणि मग काट्यातून
जातानाही पायभर मखमल ना
गुलाबाची फ़ुलं दोन ...

आता नाही बोलायाचे जरा जरा जगायाचे
माळूनिया आबोलीची फ़ुले
देहभर हलू देत विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झुले
जरा घन झुरू दे ना वारा गुदमरू दे ना
तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना

गुलाबाची फ़ुलं दोन रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...


कवी - संदीप खरे

Tuesday, February 10, 2009

नसतेस घरी तू जेंव्हा

नसतेस घरी तू जेंव्हा
जीव तुटका तुटका होतो,
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो.

नभ फाटून वीज पडावी
कल्लॊळ तसा ऒढवतो,
ही धरा दिशाहीन होते
अन चंद्र पोरका होतो.

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे,
खिडकीशी थबकून वारा
तव गंधावाचून जातो.

तव मिठीत विरघळणाऱ्या
मज स्मरती लाघव वेळा,
श्वासाविन हृदय अडावे
मी तसाच अगतिक होतो.

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा,
समचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो.

ना अजुन झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो,
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो.


कवी - संदीप खरे

Monday, February 9, 2009

आठवतं तुला ?

आठवतं तुला त्या भेटीत
रिमझिम सरींनी छेडलं होतं,
भर दुपारी मला जणू
चांदण्याने वेढलं होतं.

आठवतं तुला त्या भेटीत
श्रावण धुंद बहरला होता,
ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने
ओला देह शहारला होता.

आठवतं तुला त्या भेटीत
दोघे व्याकुळ झालो होतो,
तुझा गंध वेचता वेचता
मीही बकुळ झालो होतो.

आठवतं तुला त्या भेटीत
भावनांनी कविता रचली होती,
माझ्या डोळ्यात तू अन
तुझ्या डोळ्यात मी वाचली होती.

आठवतं तुला त्या भेटीत
आणखी काय घडलं होतं?
मला स्मरत नाही पुढचं
बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं.


कवी - अभिजीत दाते.

Friday, February 6, 2009

पाऊस

तुझ्यामाझ्यासवे कधी गायचा पाऊसही,
तुला बोलावता पोचायचा पाऊसही

पडे ना पापणी पाहून ओलेती तुला,
कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही

तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला,
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही

मला पाहून ओला विरघळे रूसवा तुझा,
कशा युक्त्या मला शिकवायचा पाऊसही

कशी भर पावसातही आग माझी व्हायची,
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही

आता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खुणा,
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही


कवी - संदीप खरे.

Thursday, February 5, 2009

तुमचं काय गेलं ?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?

तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला
नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला,
लाल लाल गुलाबाचे फूल होऊन पेटला
भेटला तर भेटू दे की पेटला तर पेटू दे की !
तुमच डोकं कशासाठी इतकं गरम झालं ?


त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?

एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली
पाऊस होता तरी
भिजत त्याच्या घरी गेली,
घरात तेव्हां कोणीच नव्हतं
म्हणून त्याचं फ़ावलं
तिला जवळ घेऊन
त्याने चक्क दार लावलं,
लावलं तर लावू दे की फावलं तर फावू दे की
तुमच्या आमच्या पूर्वजांनी वेगळं काय केलं ?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?

घरात जागा नसते हल्ली
त्यांच चालणारच टॅक्सीत प्रकरण,
ते थोडेच बसणार आहेत
घोकत पाणिनीचं व्याकरण,
गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच !
कुणीतरी कोणाला जवळ ओढून घेणारच
घेतले तर घेऊ दे की व्हायचे ते होऊ दे की
तुमच्या घरचं बोचकं त्याने थोडंच उचलून नेलं ?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?


कवी - मंगेश पाडगावकर

Wednesday, February 4, 2009

प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

काय म्हणता ?
या ओळी चिल्लर वटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?

असल्या तर असू दे,
फसल्या तर फसू दे !

तरीसुद्धा
तरीसुद्धा,

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

मराठीतून इश्श म्हणून
प्रेम करता येतं;
उर्दुमधे इश्क म्हणून
प्रेम करता येत;
व्याकरणात चुकलात तरी
प्रेम करता येतं;
कोन्वेंटमधे शिकलात तरी
प्रेम करता येतं !

सोळा वर्ष सरली की
अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे
झोपाळे झुलू लगतात !

आठवतं ना ?
तुमची आमची सोळा जेव्हा,
सरली होती,
होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन
नाचलो होतो,
होडी सकट बूडता बूडता
वाचलो होतो !

बुडलो असतो तरीसुद्धा चाललं असतं;
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !

तुम्हाला ते कळलं होतं,
मलासुद्धा कळलं होतं !

कारण
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

प्रेमबीम झूट असतं
म्हणणारी माणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं
मानणारी माणसं भेटतात !

असाच एक जण चक्क मला म्हणाला,
“आम्ही कधी बायकोला
फिरायला नेलं नाही;
पाच मुलं झाली तरी
प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही !

आमचं काही नडलं का?
प्रेमाशिवाय अडलं का?”

त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हटलं,
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं !”

तिच्यासोबत पावसात
कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्धं अर्धं
खाल्लं असेल गोडीने !

भर दुपारी उन्हात कधी
तिच्यासोबत तासन् तास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने
तिच्या कुशीत शिरला असाल !

प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !

दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं !
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !


कवी - मंगेश पाडगावकर

Tuesday, February 3, 2009

ती फुलराणी

हिरवे हिरवेगार गालिचे - हरित तृणाच्या मखमालीचे;
त्या सुंदर मखमालीवरती - फुलराणी ही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणात - अव्याज-मने होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रूलीला - अवगत नव्हत्या कुमारिकेला,
आईच्या मांडीवर बसुनी - झोके घ्यावे, गावी गाणी;
याहुनि ठावे काय तियेला - साध्या भोळ्या फुलराणीला ?

पुरा विनोदी संध्यावात - डोलडोलवी हिरवे शेत;
तोच एकदा हासत आला - चुंबून म्हणे फुलराणीला-
"छानी माझी सोनुकली ती - कुणाकडे ग पाहत होती ?
कोण बरे त्या संध्येतून - हळुच पाहते डोकावून ?
तो रविकर का गोजिरवाणा - आवडला अमुच्या राणींना ?"
लाजलाजली या वचनांनी - साधी भोळी ती फुलराणी !

आन्दोली संध्येच्या बसुनी - झोके झोके घेते रजनी;
त्या रजनीचे नेत्र विलोल - नभी चमकती ते ग्रहगोल !
जादूटोणा त्यांनी केला - चैन पडेना फुलराणीला;
निजली शेते, निजले रान, - निजले प्राणी थोर लहान.
अजून जागी फुलराणि ही - आज कशी ताळ्यावर नाही ?
लागेना डोळ्याशी डोळा - काय जाहले फुलराणीला ?

या कुंजातुन त्या कुंजातुन - इवल्याश्या या दिवट्या लावुन,
मध्यरात्रिच्या निवान्त समयी - खेळ खेळते वनदेवी ही.
त्या देवीला ओव्या सुंदर - निर्झर गातो; त्या तालावर -
झुलुनि राहिले सगळे रान - स्वप्नसंगमी दंग होउन!
प्रणयचिंतनी विलीनवृत्ति - कुमारिका ही डोलत होती;
डुलता डुलता गुंग होउनी - स्वप्ने पाही मग फुलराणी -

"कुणी कुणाला आकाशात - प्रणयगायने होते गात;
हळुच मागुनी आले कोण - कुणी कुणा दे चुंबनदान !"
प्रणयखेळ हे पाहुनि चित्ति - विरहार्ता फुलराणी होती;
तो व्योमीच्या प्रेमदेवता - वाऱ्यावरती फिरता फिरता -
हळूच आल्या उतरुन खाली - फुलराणीसह करण्या केली.
परस्परांना खुणवुनि नयनी - त्या वदल्या ही अमुची राणी !

स्वर्गभूमीचा जुळ्वित हात - नाचनाचतो प्रभातवात;
खेळुनि दमल्या त्या ग्रहमाला - हळुहळु लागति लपावयाला
आकाशीची गंभीर शान्ती - मंदमंद ये अवनीवरती;
विरू लागले संशयजाल, - संपत ये विरहाचा काल.
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनि - हर्षनिर्भरा नटली अवनी;
स्वप्नसंगमी रंगत होती - तरीहि अजुनी फुलराणी ती!

तेजोमय नव मंडप केला, - लख्ख पांढरा दहा दिशाला,
जिकडे तिकडे उधळित मोती - दिव्य वर्हाडी गगनी येती;
लाल सुवर्णी झगे घालुनी - हासत हासत आले कोणी;
कुणी बांधिला गुलाबि फेटा - झकमणारा सुंदर मोठा!
आकाशी चंडोल चालला - हा वाङनिश्चय करावयाला;
हे थाटाचे लग्न कुणाचे - साध्या भोळ्या फुलराणीचे !

गाउ लागले मंगलपाठ - सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवि सनई मारुतराणा - कोकिळ घे तानावर ताना!
नाचु लागले भारद्वाज, - वाजविती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर - नवरी ही फुलराणी सुंदर !
लग्न लागते! सावध सारे! सावध पक्षी ! सावध वारे !
दवमय हा अंतपट फिटला - भेटे रविकर फुलराणीला !

वधूवरांना दिव्य रवांनी, - कुणी गाइली मंगल गाणी;
त्यात कुणीसे गुंफित होते - परस्परांचे प्रेम ! अहा ते !
आणिक तेथिल वनदेवीही - दिव्य आपुल्या उच्छवासाही
लिहीत होत्या वातावरणी - फुलराणीची गोड कहाणी !
गुंतत गुंतत कवि त्या ठायी - स्फुर्तीसह विहराया जाई;
त्याने तर अभिषेकच केला - नवगीतांनी फुलराणीला !


कवी - बालकवी

Monday, February 2, 2009

देतां घेतां

पुस्तकांतली खूण कराया
दिले एकदा पीस पांढरे;
पिसाहुनि सुकुमार कांहिसे
देतां घेतां त्यांत थरारे.

मेजावरचे वजन छानसे
म्हणुन दिला नाजूक शिंपला;
देतां घेतां उमटे कांही
मिना तयाचा त्यावर जडला.

असेच कांही द्यावे घ्यावे
दिला एकदा ताजा मरवा;
देतां घेतां त्यातं मिसळला
गंध मनांतिल त्याहुन हिरवा.


कवयित्री - इंदिरा संत

Friday, January 30, 2009

मनातल्या मनात मी...

मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो !
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो !

अशीच रोज नाहुनी
लपेट उन्ह कोवळे,
असेच चिंब केस तू
उन्हात सोड मोकळे;
तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो !

अशीच रोज अंगणी
लवून वेच तू फुले,
असेच सांग लाजुनी
कळ्यांस गूज आपुले;
तुझ्या कळ्या, तुझी फुले इथे टिपून काढतो !

अजून तू अजाण ह्या
कुंवार कर्दळीपरी,
गडे विचार जाणत्या
जुईस एकदा तरी;
'दुरून कोण हा तुझा मरंद रोज चाखतो...?'

तसा न राहिला अता
उदास एकटेपणा,
तुझीच रूपपल्लवी
जिथे तिथे करी खुणा;
पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो !


कवी - सुरेश भट

Thursday, January 29, 2009

तव नयनांचे दल हलले गं...

तव नयनांचे दल हलले गं
पानावरच्या दवबिंदूपरी
जग सारे डळमळले गं
तव नयनांचे दल हलले गं

वारे गळले तारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
गिरि ढासळले, सुर कोसळले
ऋषी मुनी योगी चळले गं
तव नयनांचे दल हलले गं

ऋतुचक्राचे आस उडाले
आकाशातुन शब्द उडाले
आवर आवर अपुले भाले
मीन जळी तळमळले गं
तव नयनांचे दल हलले गं

ह्रुदयी माझ्या चकमक झडली
दो नयनांची किमया घडली
नजर तुझी धरणीला भिडली
पुनरपी जग सावरले गं
तव नयनांचे दल हलले गं


कवी - बा. भ. बोरकर

Wednesday, January 28, 2009

ती...

नाही भेटलो मी दिवसभर तर
तीनं खुप बैचेन व्हावं,
संध्याकाळी ऑफ़िसबाहेर भेटून
मला अगदी सरप्राईज द्यावं

भेटण्यासाठी ठरलेल्या जागी
तीने माझ्या आधी यावं,
आणि मी उशिरा आलो म्हणुन
मग लटके लटकॆ रागवावं

फ़िरताना जर मी नजरेआड झालो
तर तीने कावरबावरं व्हावं,
आणि मी दिसल्यावर मात्र
अश्रू लपवत मला प्रेमान ओरडावं

माझं काही चुकलं तर
तीनं कधीही न रागवावं,
अबोला धरुन मला न रडवता
काय चुकलं ते समजवावं

जीची कल्पनाही केली इतकी
भरभरुन प्रेम देणारी ती व्यक्ती असावी,
माझी आठवण आली तीला की
तिनंही माझ्यासाठी एक कविता लिहावी...


कवी - विजय कुदळ

Friday, January 23, 2009

चल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली

चल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली
बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली

मंदावला कधीचा गगनात शुक्रतारा
अन्‌ चोरपावलांनी आला पहाटवारा
गालांवरी उषेच्या आली हळूच लाली

घे आवरून आता स्वप्नांतला पसारा
बेचैन गोकुळाने केला तुझा पुकारा
तव गीत गात सारी ही पाखरे उडाली

तुज दूर हाक मारी कालिंदिचा किनारा
कुंजांतल्या फुलांनी केला तुला इशारा
तुज शोधण्यास वेडी राधा पुन्हा निघाली


कवी - सुरेश भट

Thursday, January 22, 2009

जयहिंद आणि जयजवान

ऐसे नव्हे की भारती या बुद्ध नुसता जन्मला,
नुसताच नाही बुद्ध येथे आहे शिवाजी जन्मला

विरतेची भारती या ना कमी झाली कधी,
आमचा इतिहास नुसता इतिहास ना झाला कधी

तीच आहे हौस आम्हा व्हावया समरी शहीद,
बाजी प्रभूही आज आहे आज तो अब्दुल हमीद

बोलला इतुकेच अंती आगे बढो आगे बढो,
देउन गेला मंत्र जसा आगे बढो आगे बढो

धर्माहुनी श्रेष्ठ आपल्या देशास जो या समजला,
मानु आम्ही त्यालाच आहे धर्म काही समजला

जन्मला जो जो इथे तो वीर आहे जन्मला,
अध्यात्म ही या भारताच्या युद्धात आहे जन्मला

कुठला अरे हा पाक याचे नावही नव्हते कुठे,
कळणारही नाही म्हणावे होता कुठे गेला कुठे

हे म्हणे लढणार यांच्या दाढ्या मिश्या नुसत्या बघा,
पाहिली नसतील जर का बुजगावणी यांना बघा

पाहण्याला सैन्य त्यांचे जेव्हा आम्ही गेलो तिथे,
नव्हते कोणीच होते फ़क्त पैजामे तिथे

आहे ध्वजा नक्कीच आमुची पिंडीवरी लहरायची,
फ़क्त आहे देर त्यांनी समरी पुन्हा उतरायची

हाच आहे ध्यास आता अन्य ना बोलू आम्ही,
बोलु आम्ही जयहिंद आणि जयजवान बोलू आम्ही


कवी - भाऊसाहेब पाटणकर

Wednesday, January 21, 2009

लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

इथे सुरु होण्याआधी संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते डोळ्यांतिल पाणी
जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती

सर्व बंध तोडुनि जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती

गंध दूर ज्याचा आणिक जवळ मात्र काटे
असे फूल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडित धावे जीव तुझ्यासाठी

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला या स्वरांनी
डोळ्यांतुन माझ्यासाठी लाव दोन ज्योती

कवी - मंगेश पाडगावकर

Tuesday, January 20, 2009

दुःख घराला आले

अंधार असा घनभारी
चंद्रातुन चंद्र बुडाले
स्मरणाचा उत्सव जागून
जणु दुःख घराला आले

दाराशी मी बसलेला
दुःखावर डोळे पसरुन
क्षितिज जसे धरणीला
श्वासानी धरते उचलुन

विश्रब्ध किनारे दूर
जाऊन कुठे मिळताती
जणु ह्रिदयामागुन माझ्या
झाडांची पाने गळती

नाहीच कुणी अपुले रे
प्राणांवर नभ धरणारे
दिक्काल धुक्याच्या वेळी
हृदयाला स्पंदविणारे


कवी - ग्रेस

Monday, January 19, 2009

पाठ

सोडताना प्राण त्यांना मी कुठे बोलावले?
खातरी झाली न त्यांची... ते घरी डोकावले!

हा कसा झिम्मा विजांशी ओठ माझे खेळती...
कोणते आकाश माझ्या अंतरी पान्हावले?

ऐकली आजन्म त्यांची मी शिळी रामायणे
(शेवटी मी बोललो अन् ते किती रागावले!)

मी न स्वप्नांचे कधीही मान्य केले मागणे
दुःख माझे एकट्याचे मी कधी लाडावले?

जीवना रे, एकदाही मी न टाहो फोडला
पाहणाऱ्यांचेच डोळे शेवटी पाणावले!

वेचण्या जेव्हा निघालो माणसांची आसवे
माझियामागे भिकारी शब्द सारे धावले!

वार झेलायास केली मी खुली छाती जरी
नेमके पाठीस माझ्या चावणारे चावले!


गझलकार - सुरेश भट

Friday, January 16, 2009

सर्वस्व तुजला वाहुनी

सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी
सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहुनी?

घरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया ?
अंधार होतो बोलका, वेड्यापिशा स्वप्नांतुनी

माझ्या सभोती घालते, माझ्या जगाची भिंत मी
ठरते परी ती काच रे, दिसतोस मजला त्यातुनी

संसार मी करिते मुका, दाबून माझा हुंदका
दररोज मी जाते सती, आज्ञा तुझी ती मानुनी

वहिवाटलेली वाट ती, मी काटते दररोज रे
अन्‌ प्राक्तनावर रेलते, छाती तुझी ती मानुनी


कवी - विंदा करंदीकर

Thursday, January 15, 2009

उपकार

एक जन्म पुरतोय ईश्वरा नको तुझे उपकार पुन्हा
खूप तुझे कर्तुत्व पाहिले नको नवे अवतार पुन्हा

खोल तुझ्या बाणाचा पल्ला माझ्या हळव्या हॄदयाशी
सावज असुनी सुसखाअन्त होता कोसळतो प्रतिकार पुन्हा

एके काळी होतो राजा शब्दगणांच्या राज्याचा
कंगालांचा भरतो आहे आजकाल दरबार पुन्हा

सूडाने मी विरोधातल्या पक्षाला मतदान दिले
हातोहात कसे सावरले निलाजरे सरकार पुन्हा

दासबोध वाचून उघडले घर मी सगळ्यांच्यासाठी
आता रचतो आहे माझे रस्त्यावर घरदार पुन्हा

गहाणही सर्वस्व ठेवले सुखशांतीच्या पेढीवर
जमले तर आल्या बाजारी स्वतःसही विकणार पुन्हा

देवदूत अन अतिरेक्यांच्या मधुचंद्राची गोची का
मध्यस्थी माणूस मरावा , सावरेल संसार पुन्हा


गझलकार - सुरेश भट

Wednesday, January 14, 2009

कुंभारासारखा गुरू नाही रे जगात

कुंभारासारखा गुरू नाही रे जगात
वरी घालितो धपाटा, आत आधाराला हात

आधी तुडवी तुडवी मग हाते कुरवाळी
ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी
घट जाती थोराघरी, घट जाती राऊळात

कुणी चढून बसतो गावगौरीच्या मस्तकी
कुणी मद्यपात्र होतो रावराजांच्या हस्तकी
आव्यातली आग नाही पुन्हा आठवत

कुणी पुजेचा कलश, कुणी गोरसाचा माठ
देता आकार गुरूने ज्याची त्याला लाभे वाट
घट पावती प्रतिष्ठा गुरू राहतो अज्ञात


कवी - ग. दि. माडगूळकर

Tuesday, January 13, 2009

केळीचे सुकले बाग...

केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी
कोमेजलि कवळी पाने, असुनि निगराणी

अशी कुठे लागली आग, जळति जसे वारे
कुठे तरी पेटला वणवा, भडके बन सारे

किती दूरचि लागे झळ, आंतल्या जीवा
गाभ्यातिल जीवनरस, सुकत ओलावा

किती जरी घातले पाणी, सावली केली
केळीचे सुकले प्राण, बघुनि भवताली


कवी - अनिल

Monday, January 12, 2009

ऐसि शायरी माझी नव्हे

सांगेल काही भव्य, ऐसि शायरी माझी नव्हे
तो कविंचा मान, तितुकी पायरी माझी नव्हे

आम्ही अरे साध्याच, अपुल्या जीवना सन्मानितो
सन्मानितो हासू, तसे या आसवा सन्मानितो

जाणतो अंति ,अम्हाला मातीच आहे व्हायचे
नाहीतरी दुनियेत, दुसरे काय असते व्हायचे

मानतो देवासही, ना मानतो ऐसे नव्हे
मानतो इतुकेच की, तो आमुचा कोणी नव्हे

आहो असे बेधुंद, आमुची धुंदही साधी नव्हे
मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी आम्ही नव्हे


कवी - भाऊसाहेब पाटणकर

Friday, January 9, 2009

सूर मागू तुला मी कसा?

सूर मागू तुला मी कसा?
जीवना तू तसा, मी असा.

तू मला, मी तुला पाहिले
एकमेकांस न्याहाळिले
दुःख माझा तुझा आरसा

एकदाही मनासारखा
तू न झालास माझा सखा
खेळलो खेळ झाला जसा

खूप झाले तुझे बोलणे
खूप झाले तुझे कोपणे
मी तरीही जसाच्या तसा

रंग सारे तुझे झेलुनी
शाप सारे तुझे घेउनी
हिंडतो मीच वेडपिसा

काय मागून काही मिळे ?
का तुला गीत माझे कळे ?
व्यर्थ हा अमृताचा वसा


कवी - सुरेश भट

Thursday, January 8, 2009

पत्ते

मारतो राजास एक्का, नहिल्यास दहीला मारतो
कल्पनेचे खेळ सारे, कोणी कुणा ना मारतो

पाहता कोणात काही नाही कुठेही वेगळे
सारेच तुकडे कागदाचे, छाप नुसते वेगळे

आता जरासा रंग काही खेळास येऊ लागला
पत्यातला राजा स्वतःला राजाच मानू लागला

राणीसही जाणिव काही और होऊ लागली
लाजलि नव्हती कधी ती आज लाजू लागली

दिनतेचा खेद आता दुर्रीस होऊ लागला
पंजा म्हणे चौर्र्यास आता श्रीमंत वाटु लागला

विसरून निजरुप नुसत्या नामरुपी गुंतले
भलत्याच कुठल्या अवदसेच्या पाषात आता गुंतले

नुसता उपाधी भेद कोणी राजा नव्हे राणी नव्हे
आणखी सांगु पुढे तो खेळही अमुचा नव्हे

खेळतो दुसराच, त्याला पाहिले नाही कुणी
म्हणती तयाला इश,म्हणति अल्ला कुणी, येशू कुणी

त्याचा म्हणे हा खेळ, नुसते पत्ते आम्ही पत्यातले
एका परि पत्त्यास कळले मर्म हे पत्यातले

आहे इथे रंगेल कोणी पत्ता असा पत्यातला
आहे जरी पत्यातला तो नाही तसा पत्यातला

नामरूपाचा सतःच्या पत्ताच ना त्याला कधी
ना कशाची खंत होतो राजा कधी, दुर्री कधी

हासतो नुसताच आहे सर्वाहुनी हा वेगळा
आणखी सांगाल काहो वेदांत कोणी वेगळा


कवी - भाऊसाहेब पाटणकर

Wednesday, January 7, 2009

रोपटे

काय जे समजायचे ते शेवटी समजून गेलो,
मी तुझ्या आशेत सारी जिंदगी उधळून गेलो

चारचौघांसारखे मज बोलणे जमलेच नाही,
सांग तू आता शहाण्या, काय मी बरळून गेलो?

मी अता घेणार नाही माप श्वासांच्या गजांचे...
जन्मठेपेतून माझ्या आज मी निसटून गेलो.

का तुम्ही ठेवाल माझी याद येणाऱ्या पिढ्यांनो?
मी तुम्हासाठीच तेव्हा कोरडा बहरून गेलो

आज कैशी आपुली ही भेट ताटातूट झाली?
भेटतांना ऐन वेळी मी कुठे हरवून गेलो?

मी चुका केल्या तरीही काय हे नाही पुरेसे?
मी करोडो माणसांची अंतरे उजळून गेलो

जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला-
मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो।


गझलकार - सुरेश भट

Tuesday, January 6, 2009

आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले ?

आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले ?
माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले?

ह्रदयात विझला चंद्रमा... नयनी न उरल्या तारका...
नाही म्हणायाला तुझे हे आपुलेपण राहिले

अजुनी कुणास्तव तेवतो हा मंद प्राणाचा दिवा?
अजुनी मला फसवायला हे कुठले निमंत्रण राहिले?

ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे ...
मी मात्र थांबुन पाहतो मागे कितीजण राहिले?

कवटाळुनी बसले मज दाही दिशांचे हुंदके
माझे अता दु : खासवे काही न भांडण राहिले!

होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले.

अवघ्या विजा मी झेलल्या, सगळी उन्हे मी सोसली
रे बोल आकाशा, तुझे आता किती पण राहिले?

ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे
हे आसवांचे तेवढे अध्याप तोरण राहिले.


गझलकार - सुरेश भट

Monday, January 5, 2009

आज अचानक गाठ पडे

भलत्या वेळी भलत्या मेळी
असता मन भलतीचकडे

नयन वळविता सहज कुठेतरि
एकाएकी तूच पुढे

नसता मनिमानसी अशी ही
अवचित दृष्टिस दृष्ट भिडे

दचकुनि जागत जीव नीजेतच
क्षणभर अंतरपट उघडे

गूढ खूण तव कळुन नाकळुन
भांबावुन मागे मुरडे

निसटुनि जाई संधीचा क्षण
सदा असा संकोच नडे


कवी - अनिल

Friday, January 2, 2009

समिधाच सख्या या...

दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातुनि त्याची जीवन-सरिता,
खळखळे, अडथळे, सुके, कधी फेसाळे
परि अखंड शोधे वाट समुद्राकरिता ||

खडकाळ प्रान्त तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली,
नच रम्य राउळे, कलापूर्ण वा घाट
तीरावर तुरळक परि अंकुरती वेली ||

नव पर्णाच्या या विरल माण्डवाखाली,
होईल सावली कुणा, कुणास कहाली,
तोषेल कुणी, शापील कुणी दुर्वास,
"या जळोत समिधा-भव्य हवी वृक्षाली !"

समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,
कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा?
जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा,
तव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा ||


कवी - कुसुमाग्रज