कविता शोध

माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.

आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/


Thursday, January 29, 2009

तव नयनांचे दल हलले गं...

तव नयनांचे दल हलले गं
पानावरच्या दवबिंदूपरी
जग सारे डळमळले गं
तव नयनांचे दल हलले गं

वारे गळले तारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
गिरि ढासळले, सुर कोसळले
ऋषी मुनी योगी चळले गं
तव नयनांचे दल हलले गं

ऋतुचक्राचे आस उडाले
आकाशातुन शब्द उडाले
आवर आवर अपुले भाले
मीन जळी तळमळले गं
तव नयनांचे दल हलले गं

ह्रुदयी माझ्या चकमक झडली
दो नयनांची किमया घडली
नजर तुझी धरणीला भिडली
पुनरपी जग सावरले गं
तव नयनांचे दल हलले गं


कवी - बा. भ. बोरकर

1 comment:

Vinay Kulkarni said...

मुकुंद रणभोर यांचे या कवितेचे रसग्रहण वाचनात आले ते येथे देतोय... #एक_दिवस_एक_गाणं

तुम्ही कधी तुमच्या मैत्रिणीला किंवा मित्राला बस स्टॉप वर सोडायला उभे राहिला आहेत का?
कधी बस सुटे पर्यंत थांबला आहेत का?
बस सुटल्यावर नजरेआड होण्याच्या आधी तिने किंवा त्याने तुमच्याकडे एक निमिष वळून पाहिलं आहे का?
एकदा पापण्यांची उघडझाप केली आहे का?

एकदा कधीतरी हे अनुभव, अनुभवलं नसेल तर. मला जेव्हा पहिल्यांदा असा अनुभव आला तेव्हापासून आजपर्यंत जितक्या वेळा मला हा अनुभव आला आहे तितक्या वेळा सर्वप्रथम काय होत असेल तर बोरकरांची एक कविता आठवली आहे. आपण काय कवी नाही, इतकी प्रतिभा आपल्याकडे नाही त्यामुळे कवीचे शब्द नेहमी आधी आठवतात. शब्द आहेत 'तव नयनांचे दल हलले गं! पानावरच्या दवबिंदूपरी त्रिभुवन हे डळमळले गं!' हिवाळा सुरु झाला कि मोगऱ्याचं फुल सकाळी सकाळी बघायचं, सूर्य उगवला आहे पण अजून वर आलेला नाही अशा वेळी. मोगऱ्याच्या फुलावर ते दवबिंदू उतरलेले असतात. आणि त्याचं अस्तित्व किती वाऱ्याची झुळूक येईपर्यंत किंवा सूर्य वर येईपर्यंतच! एका वाऱ्याच्या झुळुकेनी त्या दवबिंदूंची काय अवस्था होते ती कधी पाहिलीये का! तर तिच्या एका छोट्याच्या हालचालीमुळे काय अवस्था होऊ शकते ते लक्षात येईल. 'तव नयनांचे दल हलले गं, पानावरच्या दवबिंदूपरी त्रिभुवन हे डळमळले गं!' सलील कुलकर्णीने 'संधीप्रकाशात' नावाचा जो अल्बम केला आहे त्यात त्याच्या आवडत्या आठ कवितांना चाली लावून त्यांनी गाणी केली आहेत. त्यात बोरकरांची हि कविता सुद्धा आहे. चाल अतिशय साधीच आहे, मागे बासरी, तबला, सतार इतकंच आहे. पण चालीकडे लक्ष जाऊ नये इतके शब्द जबरदस्त आहेत. अर्थात साधी असली तरी चाल चांगली आहे.

पण बस मधून निघून जाणाऱ्या त्या जीवाला इकडे काय काय आकांत झालेला असतो ते माहिती नसतं. 'तारे गळले, वारे ढळले, दिग्गज पंचाननसे वळले'. पंचानन म्हणजे फक्त पंचमहाभूत नाही. पंचानन हे शंकराचे नाव आहे. एकदा शंकर साधनेला ध्यानस्थ बसलेले असताना एक लावण्यवती त्यांच्या दर्शनाला आली. ध्यानस्थ योग्याची पूजा करण्यासाठी म्हणून ती आली होती. तिने शंकराची पूजा केली आणि प्रदक्षिणा मारण्यासाठी ती वळली. ती ज्या ज्या दिशेला गेली त्या त्या दिशेला तिला पाहण्यासाठी शंकराला तोंड निर्माण झालं. असं पाच दिशांना शंकराला तोंड आलं म्हणून तो पंचानन. तुझ्या एका पापणीच्या हालचालीमुळे 'दिग्गज' असं पंचानन सुद्धा वळून पाहू लागलं, पण हे तिला माहितीच नाही. ती पूजा करण्यात मग्न आहे किंवा बस मधून निघून गेली आहे. पण आकांत इतक्यावर थांबत नाही. 'तारे गळले, वारे ढळले, दिग्गज पंचाननसे वळले, गिरी ढासळले, सूर कोसळले, ऋषी, मुनी, योगी चळले गं!' पण हे सगळ कशामुळे? 'तव नयनांचे दल हलले गं!' म्हणून!

हि झाली पृथ्ववरची अवस्था, तिकडे ब्रह्मांडात सुद्धा परिस्थिती वेगळी नाही. 'ऋतू चक्राचे आस उडाले, आभाळातून शब्द निघाले' तिकडे पृथ्वीवर आकांत झाला आहे तो सर्वांना दिसतो आहे हो, पण 'आवर आवर अपुले भाले, मीन जळी टळमळले गं!' जखम करण्यासाठी पापण्यांना भाला म्हणण्याची रीत नवीन नाही, पण त्याच्या आघातामुळे तिकडे जळात काय हाहाकार उभा राहिलाय तो तुला कळत नाहीये, त्यामुळे 'आवर आवर अपुले भाले, मीन जळी तळमळले गं!'

तुझ्या एका पापणीच्या हालचालीमुळे पृथ्वीवर आकांत झाला, आकाशात तर झालाच पण जळात सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही, तर इकडे माझी अवस्था काय झाली असेल? 'हृदयी माझ्या चकमक झडली' ते पाहून 'नजर तुझी धरणीला भिडली' भाऊसाहेब पाटणकर यांनी मराठी कविता आणि उर्दू कविता यांच्यातील एक फरक आवर्जून सांगितला आहे. तिकडचा शायर हा तिच्या एका आघाताने बार्बाद होतो, आणि तिकडची 'ती' सुद्धा निष्ठुर आहे. आपल्याकडची 'ती' निष्ठुर नाही. 'ती'च्या सारखी 'ती' आहे. माझी अवस्था पाहून ती सुद्धा साद देते, जेव्हा 'हृदयी माझ्या चकमक झडली, तेव्हा 'नजर तुझी' धरणीला भिडली. कदाचित मी तिच्याकडे पाहतो आहे हे तिला लक्षात आल्यावर ती लाजली असेल, आणि लाजून तिने नजर चोरली असेल, म्हणून 'नजर तुझी धरणीला भिडली' त्यानंतर काय होतं?

दो हृदयांची किमया घडली
पुनरपि जग सावरलें ग !

तुझ्या एका पापणीमुळे त्रिभुवनात आकांत उडाला होता, ते तुझ्या एका नजरेच्या तालावर पुन्हा 'सावरले गं....

मुकुल रणभोर