वय सोळावं सरलं की
सगळं हिरवं दिसू लागत
स्वतःभोवती गिरकी घेत
मनात फुलपाखरू वसू लागत
वसंताच्या बागेमध्ये
चाफा केवडे फुलू लागतात
फुलां भोवती पिंगा घालण्या
भवरे ही जमू लागतात
न बोलता प्रत्येकाला
सार काही कळू लागत
वय सोळावं सरलं की.....
पुनवेच्या रात्रीला
सागराला भरती येते
क्षितिजावर आकाशाला
भेटायला धरती येते
प्रेमाची ही आगळी भाषा
प्रत्येकजण बोलू लागत
वय सोळावं सरलं की.....
पहिला वाहिला पाऊस अन
पहिली वाहिली प्रीत असते
प्रत्येकाच्या ओठांवरती
धुंद एक गीत असते
ओलाचिंब मन तेव्हा
वाऱ्यावर झुलू लागत
वय सोळावं सरलं की.....
हिरव्या हिरव्या पानांमध्ये
सळसळणारे वारे असते
तुझ्या डोळ्यांच्या नजरबंदीत
शब्दांवाचून सारे असते
स्पर्शामधून एक नवं
गाणं मनी रुजू लागत
वय सोळावं सरलं की....
कवी - अनिरुद्ध अभ्यंकर
No comments:
Post a Comment