कविता शोध

माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.

आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/


Monday, December 10, 2007

कवीची 'विरामचिन्हे' ('विरामचिन्हे' चे विडंबन)

जेव्हा काव्य लिहावयास जगती प्रारंभ मी मांडिला,
जे जे दृष्टित ये तयावर 'करू का काव्य?' वाटे मला,
तारा, चंद्र, फुले, मुले किति तरी वस्तू लिहाया पुढे,
तेव्हा 'स्वल्पविराम' मात्र दिसतो स्वच्छंद चोहीकडे !

झाले काव्य लिहून - यास कुठल्या धाडू परी मासिका?
याते छापिल कोण? लावू वशिला कोठे? कसा नेमका?
रद्दीमाजि पडेल का? परत वा साभार हे येईल?
सारे लेखन तेधवा करितसे मी 'प्रश्नचिन्हा' कुल!

अर्धांगी पुढती करून कविता नावे तिच्या धाडिली,
अर्धे काम खलास होइल अशी साक्षी मनी वाटली !
कैसा हा फसणार डाव? कविता छापून तेव्हाच ये !
केला 'अर्धविराम' तेथ; गमले तेथून हालू नये !

झाली मासिकसृष्टि सर्व मजला कालांतरे मोकळी,
केले मी मग काव्यगायन सुरू स्वच्छंद ज्या त्या स्थळी !
माझे 'गायन' ऐकताच पळती तात्काळ श्रोतेजन !
त्या काळी मग होतसे सहजची 'उद्गार' वाची मन !

डेंग्यू, प्लेग, मलेरिया, ज्वर तसे अन् इन्फ्लुएन्झा जरी
ही एकेक समर्थ आज असती न्याया स्मशानांतरी -
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे परी साधला,
देवा, 'पूर्णविराम', त्या कविस या देशी न का आजला?


कवी - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

2 comments:

Asha Joglekar said...

अत्र्याची ही कविता नव्हती वाचली. मजा आली हं. आभाऱ.

अमित said...

धन्यवाद, मलासुद्धा ही कविता अपघातानेच वाचायला मिळाली होती आणि आवडलीही होती, म्हणून मग post केली.