कविता शोध

माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.

आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/


Tuesday, December 18, 2007

प्रेम

ते म्हणाले, 'प्रेम अमुचा विषय नाही!'
मी म्हणालो, 'का? तुम्हाला ह्रदय नाही??'

एकदा तूही भिडव डोळे जगाशी
रोज झुकणे पाप आहे, विनय नाही

ध्वस्तले कित्येक आडोसे मनाचे
थांबला पण आसवांचा प्रलय नाही

आजही आहे अबाधित व्यसन माझे
राहिली तुजलाच माझी सवय नाही

गारद्यांचा काय मी द्यावा भरवसा
शब्द त्यांचा शब्द आहे, अभय नाही

माणसांनी निवड केली श्वापदांची
लोकशाहीचा मुळी हा विजय नाही

स्वाभिमानाचेच केवळ तेज आहे
भोवती माझ्या निराळे वलय नाही

सोडली मैफ़िल अता मी काजव्यांची
यापुढे गावात त्यांच्या उदय नाही..

कवी - वैभव जोशी

1 comment:

आशा जोगळेकर said...

कमालीची गज़ल.
माणसांनी निवड केली श्वापदांची
लोकशाहीचा मुळी हा विजय नाही
अन्
स्वाभिमानाचेच केवळ तेज आहे
भोवती माझ्या निराळे वलय नाही
अतिशय सुंदर