अशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.
Friday, November 30, 2007
सत्र - विडंबन
मद्यपी सर्वत्र होते
सुरमईचा गंध आला
तंदुरी इतरत्र होते
पापडांच्या कुरकुरीला
वेफ़रांचे छत्र होते
बाटल्या बरसून गेल्या
'वारुणी' नक्षत्र होते
शेवटी संत्रेच माझे
द्राक्ष ते सावत्र होते
"मी बुवा पाणीच प्यालो!"
(बरळणे एकत्र होते)
कवी - चक्रपाणी चिटणीस.
Thursday, November 29, 2007
सत्र - गझल
चांदणे सर्वत्र होते
मोगऱ्याचा गंध होता
मात्र कोरे पत्र होते
विलगली दोन्ही शरीरे
श्वास का एकत्र होते ?
शेवटी परकेच आले
सोयरे इतरत्र होते
सख्य ना झाले कुणाशी
ह्रदयही सावत्र होते
जीवनाची कोठडी अन्
मृत्युचे वर छत्र होते..
कवी - वैभव जोशी .
Wednesday, November 28, 2007
आम्ही कोण?
देवाचे, दिधले असे जग तये आम्हांस खेळावया ॥
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया ।
दिक्कालातूनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके ॥ १ ॥
सारेही बडिवार येथिल पाहा! आम्हापुढे ते फिके ।
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूप्रती द्यावया ॥
सौन्दर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजी या ।
फोले पाखडिता तुम्ही, निवडतो ते सत्त्व आम्ही निके ! ॥ २ ॥
शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे ? ।
पृथ्वीला सुरलोकसाम्य झटती आणावया कोण ते ? ॥
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे ।
ते आम्हीच, शरण्य मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते ! ॥ ३ ॥
आम्हाला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे ।
आम्हाला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे ! ॥
कवी - कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत
Tuesday, November 27, 2007
अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाला टांगला
पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला
खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखरांची कारागिरी
जरा देख रे मानसा
तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं
कवयित्री - संत बहिणाबाई चौधरी
Friday, November 23, 2007
राधा ही बावरी
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी ।
हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना
चिंब चिंब देहवरुनी श्रावणधारा झरताना
हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई
हा उनाड वारा गुज प्रितीचे कानी सांगून जाई
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी ।
आज इथे या तरुतळी सूर वेणूचे खुणावती
तुजसामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई
हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयांचे पाही
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी ।
कवी - अशोक पत्की
Thursday, November 22, 2007
माझ्या मना बन दगड
अन्नाशिवाय, कपड्याशिवाय
ज्ञानाशिवाय, मानाशिवाय
कुडकुडणारे हे जीव
पाहू नको, डोळे शिव !
नको पाहू जिणे भकास,
ऐन रात्री होतील भास
छातीमधे अडेल श्वास,
विसर यांना दाब कढ
माझ्या मना बन दगड !
हा रस्ता अटळ आहे !
ऐकू नको हा आक्रोश
तुझ्या गळ्याला पडेल शोष
कानांवरती हात धर
त्यांतूनही येतील स्वर
म्हणून म्हणतो ओत शिसे
संभाळ, संभाळ, लागेल पिसे !
रडणा-या रडशील किती ?
झुरणा-या झुरशील किती ?
पिचणा-या पिचशील किती ?
ऐकू नको असला टाहो
माझ्या मना दगड हो !
हा रस्ता अटळ आहे !
येथेच असतात निशाचर
जागोजाग रस्त्यावर
असतात नाचत काळोखात;
हसतात विचकून काळे दात
आणि म्हणतात, कर हिंमत
आत्मा विक उचल किंमत !
माणूस मिथ्या, सोने सत्य
स्मरा त्याला स्मरा नित्य !
भिशील ऐकून असले वेद
बन दगड नको खेद !
बन दगड आजपासून
काय अडेल तुझ्यावाचून
गालावरचे खारे पाणी
पिऊन काय जगेल कोणी ?
काय तुझे हे निःश्वास
मरणा-याला देतील श्वास ?
आणिक दुःख छातीफोडे
देईल त्यांना सुख थोडे ?
आहे तेवढे दुःखच फार
माझ्या मना कर विचार
कर विचार हास रगड
माझ्या मना बन दगड
हा रस्ता अटळ आहे !
अटळ आहे घाण सारी
अटळ आहे ही शिसारी
एक वेळ अशी येईल
घाणीचेच खत होईल
अन्यायाची सारी शिते
उठतील पुन्हा, होतील भुते
या सोन्याचे बनतील सूळ
सुळी जाईल सारे कूळ
ऐका टापा! ऐका आवाज !
लाल धूळ उडते आज
त्याच्यामागून येईल स्वार
या दगडावर लावील धार !
इतके यश तुला रगड
माझ्या मना बन दगड
कवी - विंदा करंदीकर
Wednesday, November 21, 2007
रेशमाच्या रेघांनी - अजुन एक विडंबन
(चाल - रेशमाच्या रेघांनी)
रेशमियाच्या गाण्यांनी
भुंकणाऱ्या प्राण्यांनी
कर्ण माझा कसा की हो फोडीला
हात नका लावू त्याच्या सीडीला.
नवी कोरी कॉपी सुफ़ी साजाची
'टोपी' चढवली रिमिक्स बाजाची
बाजाची हो बाजाची
माईक आडवा ऐटीमध्ये, तोंडाजवळ ओढीला
हात नका लावू त्याच्या सीडीला.
गात जाई प्रत्येक गाणे नाकात
रसिकांच्या उठते तिडिक डोक्यात
डोक्यात हो डोक्यात
चुंबनखोर इम्रानहाश्मी, आणिक असतो जोडीला
हात नका लावू त्याच्या सीडीला.
कृपा त्याच्यावर सल्लूमियाँची
बाजारात चलती आज कचऱ्याची
कचऱ्याची हो कचऱ्याची
काय म्हणू देवा देवा, जनतेच्या आवडीला
हात नका लावू त्याच्या सीडीला.
फायदा एक दिसतो त्याच्या गाण्यात
गाढवही गाते वाटे सुरात
सुरात हो सुरात
न्यूनगंड कित्येकांचा, दूरदेशी धाडीला
हात नका लावू त्याच्या सीडीला।
कवी - मिलिंद छत्रे
[माहितीबद्दल धन्यवाद, मिलिंद]
Tuesday, November 20, 2007
कविता चिकार झाल्या !
इतक्यात फार झाल्या
थोड्या सुमार झाल्या
बांकी टुकार झाल्या
केव्हा 'उकार' झाल्या
केव्हा 'अकार' झाल्या
केली तयार यमके
झाल्या, तयार झाल्या
फुसक्याच कल्पनांच्या
फुसकाच बार झाल्या
त्या जन्मल्याच कोठे?
उदरात ठार झाल्या
मुंग्या नभी उडाल्या
त्या काय घार झाल्या?
मेंढ्या चरून गेल्या
लेंड्या शिवार झाल्या
वावा! लयीत बेंबें?
(शेळ्या हुशार झाल्या!)
चिडल्या जिभेत कुल्फ्या
मग गप्पगार झाल्या
Monday, November 19, 2007
मी मोर्चा नेला नाही
मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही
भवताली संगर चाले तो विस्फारून बघताना
कुणी पोटातून चिडताना,कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होऊनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखील मज कुणी उचलले नाही
नेमस्त झाड मी आहे,मूळ-फांद्या जिथल्या तेथे
पावसाळ्यात हिरवा झालो,थंडीत झाडली पाने
पण पोटातून कुठलीही खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही
धुतलेला सात्विक सदरा,तुटलेली एकच गुंडी
टकलावर अजूनी रूळते अदृश्य, लांबशी शेंडी
मी पंतोजींना भ्यालो,मी देवालाही भ्यालो
मी मनातसुद्धा माझ्या कधी दंगा केला नाही
मज जन्म फळाचा मिळता मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो
मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही!आंबाही झालो नाही!
कवी - संदीप खरे
Friday, November 16, 2007
भारनियमन!
रात्र असता वीज नसता दीप उजळू लागले
जाहले इतुकेच होते भारनियमन जाहले!!
वायरींवर टाकलेले चोरटे ते आकडे
वीजचोरांना तुम्ही रे आधी का नच पाहिले?
एवढा भलताच आहे नियमनाचा काळही
रोजचा स्वयंपाक करणे भार वाटू लागले!!
लाख उपकरणे घराशी मन तरीही हळहळे
काल जे जे घेतले ते आज पडूनी राहिले!!
गोजिऱ्या सासूसुनांच्या साजिऱ्या त्या मालिका
पाहणे मी थांबले अन "हे" हसाया लागले!!
भर पहाटे फॅनची मी दृष्ट काढून टाकली
थांबला जागीच तो अन मी गरगराया लागले!!
Thursday, November 15, 2007
शापित
दीपही प्रत्येक विझला, ठेवला ज्यावर हवाला
तामसांचे राज्य उलथू पाहतो नाठाळ तारा
कृष्णविवरा घाल वेढा बंडखोरांच्या नभाला
दाटते डोळ्यांत काळी संभ्रमांची मेघमाला
मांदियाळी आसवांची छेद देते काजळाला
गस्त घाली भोवताली भुंकणाऱ्यांची शिबंदी
वास मृगयेचा अशाने येत आहे संगराला
जन्म घेती आजही ती देवकीची सात पोरं
तीच आहे कंससत्ता, तीच आहे बंदिशाला
प्राशिले तू नीळकंठा एकदा केवळ हलाहल
रोजचे मंथन अम्हाला, वासुकीचा रोज प्याला
माणसांनी पेटण्याचे दिवस ते सरले कधीचे
गूल शब्दांचे निरर्थक घासणे आता कशाला
का चिरंजीवित्व भृंगा कांक्षिता आशीर्वचांने
काय महती अमृताची जीविताच्या शापिताला
कवी - मिलिंद फणसे
Wednesday, November 14, 2007
चेहरा
तिऱ्हाईत भासतो मग, ओळखीचा चेहरा!
माझे फाटले; अन् रिक्त हे डोळे तुझे,
का तो आपलासा, वाटणारा चेहरा?
आलात सवडीने, सुखांनो हाय पण,
आहे फुलांनी, आज माझा चेहरा!
आज माझ्या, दर्पणा उजळू नको,
व्रणांनी ग्रासलेला, आज माझा चेहरा!
चढवु कोठला नी कलप लावु कोणता?
मांडतो बाजार आहे, माणसाचा चेहरा!
आहे सल अनामिक, गूढगर्भी अंतरी,
त्या मज दिसावा, वेदनेचा चेहरा!
असूया झळकते, पण सर्व ह्या नजरांतुनी,
माझा घेतसे, उफ!, तो गुलाबी चेहरा!
देह हे, अन दडपणाची नांगरे,
दिसतो नेहमी,मजला स्वत:चा चेहरा!
तु हो मनाचा, अन स्वत:ला शोध रे,
तेव्हाच मित्रा, तुज स्वत:चा चेहरा!
कवी - मानस
Tuesday, November 13, 2007
मैत्रिणीचं लग्न
आवडणा-या मैत्रिणीचं लग्न जेव्हा ठरलं
म्हणाली, चांगल्या नव-यासाठी नवस करायला गेलो होतो
चांगला नवराच हवा होता तर आम्ही काय मेलो होतो ?
टेंपररी नोकरीमुळे नाही विचारायचा धीर झाला
नेहमीप्रमाणे नंतर कळलं की आता फार उशीर झाला
आता प्रत्येक संध्याकाळी हिचं फक्त नवरा पुराण
दुस-या पुरुषाची स्तुती एकून झालो आम्ही पुरते हैराण
मग शेवटी एके दिवशी आम्हाला त्याचं दर्शन झालं
विचार नुसता करत राहिलो की ह्याच्यात हिने काय पाहिलं
एक पर्मनंट नोकरी, लग्नासाठी पुरेशी असू शकते?
Security ची एकच भावना सगळ्यात मोठी ठरू शकते?
शेवटी accept केलं आम्ही, नशीबाची आहे चालच तिरकी
प्रेमासारख्या नाजुक बाबतीत ही दैवाने आमची घेतली फिरकी
लग्नानंतर दोन वर्षांनी मग रस्त्यात नव-याबरोबर ती भेटली
हसायलाही पैसे पडतात ह्याची आम्हाला खात्रीच पटली
प्रेमाचं आम्ही विसरून गेलो पण मैत्रीही आता शाबूत नसते
कारण आपल्या काही क्षणांची मैत्रीण,
ही अनंतकाळची तिच्या नव-याची पत्नी असते.
Tuesday, November 6, 2007
दिवाळी
अंधारावर विजय...दिवाळी !
नवतेजाचा प्रलय...दिवाळी !
प्रसन्नतेचा उदय...दिवाळी !
मांगल्याचे वलय...दिवाळी !
दुःख-व्यथांचा विलय...दिवाळी !
आनंदाचा समय...दिवाळी !
हवाहवासा विषय...दिवाळी !
दोन दिव्यांचा प्रणय...दिवाळी !
सर्व सणांचे ह्रदय...दिवाळी !
कवी - प्रदीप कुलकर्णी
लोकहो धावा
मी तुला 'वा वा' म्हणावे, तू मला 'वा वा'!
'रा' स 'रा' अन 'टा' स 'टा' हे जोडता आम्ही
स्वर्गलोकातून वाजे आमचा पावा
जो न देई दाद आम्हा तो कवी कैसा
(एकटा पाडून त्याची पायरी दावा..)
घोळक्यामध्ये कवींच्या कोण हा आला?
ऐकतो नाही कसा, याला धरा, चावा!
जीव रक्षाया तुम्हा ही 'आखरी' संधी...
हे कवी चालून आले, लोकहो धावा!
Monday, November 5, 2007
हमाली
कालचा कार्यकर्ता पुन्हा बने मवाली
विरल्या हवेत फ़सव्या घोषणा कधीच्या
पुनश्च लोक आता ईश्वराच्या हवाली
ल्यालें राजवस्त्रें ते गावगुंड सारे
जनता- जनार्दनाला ही लक्तरें मिळाली
उजवें अथवा डावें , भगवें वा निधर्मी
कोणी पुसें न आता दीनांची खुशाली
आपल्या दु:खाचा वाहतो भार जो तो
चुकली कुणास येथे ही रोजची हमाली
Friday, November 2, 2007
वय निघून गेले
रंगावर भुलण्याचे वय निघून गेले
गेले ते उडुन रंग
उरले हे फिकट संग
हात पुढे करण्याचे वय निघून गेले
कळते पाहून हेच
हे नुसते चेहरेच
चेहऱ्यांत जगण्याचे वय निघून गेले
रोज नवे एक नाव
रोज नवे एक गाव
नावगाव पुसण्याचे वय निघून गेले
रिमझिमतो रातंदिन
स्मरणांचा अमृतघन
पावसात भिजण्याचे वय निघून गेले
ह्रद्याचे तारुणपण
ओसरले नाही पण
झंकारत झुरण्याचे वय निघुन गेले
एकटाच मज बघून
चांदरात ये अजून
चांदण्यात फिरण्याचे वय निघून गेले
आला जर जवळ अंत
कां हा आला वसंत?
हाय,फुले टिपण्याचे वय निघून गेले
कवी - सुरेश भट.
Thursday, November 1, 2007
तो बहिर्यांची जमवुन मैफल - गझल
अंधाच्या वस्तीत आरसे व्यर्थ वाटतो आहे
मावळतो ना धर्मच! तेथे मी पहाटतो आहे
कुणास प्रेषित, ख्रिस्त, महंमद, बुध्द वाटतो आहे
बह्मांडाचे बोनसाय मी करीन शंका नाही
नित नेमाने मी नजरेने क्षितिज छाटतो आहे
गावकुसावर बरसलाच ना श्रावण औंदालाही
इथेच येवुन कसा नेमका मेघ आटतो आहे
गरिबांची तर बातच सोडा, महागाईच्या पायी
सुखी माणसाचाही सदरा आज फाटतो आहे
जमीन झाली विकून आता, निविदा काढुन कोणी
गुंठ्यावारी चंद्राचेही बिंब हाटतो आहे
प्रदूषणाने बिघडुन गेले संतुलन विश्वाचे
काल छापुनी आला मथळा "सूर्य बाटतो आहे"
बघू कोणती नवी वेदना वरते आता मजला
स्वतः स्वतःचे खुले स्वयंवर रोज थाटतो आहे
उन्हात बांधिन घर सूर्याचे रातकिडा किरकिरला
नियतीचे प्रारब्ध अतांशी मी ललाटतो आहे
उत्क्रांतीवादाचे चक्रच फिरवुन उलटे पुन्हा
माणसास माकड करण्याचा घाट घाटतो आहे
मी आत्म्याचा पतंग करूनी उंच उडविला गगनी
पाहू आता पेच लढवुनी कोण काटतो आहे?
कवी - घनश्याम धेंडे.