Friday, November 30, 2007

सत्र - विडंबन

ढोसण्याचे सत्र होते
मद्यपी सर्वत्र होते

सुरमईचा गंध आला
तंदुरी इतरत्र होते

पापडांच्या कुरकुरीला
वेफ़रांचे छत्र होते

बाटल्या बरसून गेल्या
'वारुणी' नक्षत्र होते

शेवटी संत्रेच माझे
द्राक्ष ते सावत्र होते

"मी बुवा पाणीच प्यालो!"
(बरळणे एकत्र होते)

कवी - चक्रपाणी चिटणीस.

No comments:

Post a Comment