Thursday, November 1, 2007

तो बहिर्‍यांची जमवुन मैफल - गझल

तो बहिर्‍यांची जमवुन मैफल, दाद लाटतो आहे
अंधाच्या वस्तीत आरसे व्यर्थ वाटतो आहे

मावळतो ना धर्मच! तेथे मी पहाटतो आहे
कुणास प्रेषित, ख्रिस्त, महंमद, बुध्द वाटतो आहे

बह्मांडाचे बोनसाय मी करीन शंका नाही
नित नेमाने मी नजरेने क्षितिज छाटतो आहे

गावकुसावर बरसलाच ना श्रावण औंदालाही
इथेच येवुन कसा नेमका मेघ आटतो आहे

गरिबांची तर बातच सोडा, महागाईच्या पायी
सुखी माणसाचाही सदरा आज फाटतो आहे

जमीन झाली विकून आता, निविदा काढुन कोणी
गुंठ्यावारी चंद्राचेही बिंब हाटतो आहे

प्रदूषणाने बिघडुन गेले संतुलन विश्वाचे
काल छापुनी आला मथळा "सूर्य बाटतो आहे"

बघू कोणती नवी वेदना वरते आता मजला
स्वतः स्वतःचे खुले स्वयंवर रोज थाटतो आहे

उन्हात बांधिन घर सूर्याचे रातकिडा किरकिरला
नियतीचे प्रारब्ध अतांशी मी ललाटतो आहे

उत्क्रांतीवादाचे चक्रच फिरवुन उलटे पुन्हा
माणसास माकड करण्याचा घाट घाटतो आहे

मी आत्म्याचा पतंग करूनी उंच उडविला गगनी
पाहू आता पेच लढवुनी कोण काटतो आहे?

कवी - घनश्याम धेंडे.

2 comments: