मी मोर्चा नेला नाही...मी संपही केला नाही
मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही
भवताली संगर चाले तो विस्फारून बघताना
कुणी पोटातून चिडताना,कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होऊनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखील मज कुणी उचलले नाही
नेमस्त झाड मी आहे,मूळ-फांद्या जिथल्या तेथे
पावसाळ्यात हिरवा झालो,थंडीत झाडली पाने
पण पोटातून कुठलीही खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही
धुतलेला सात्विक सदरा,तुटलेली एकच गुंडी
टकलावर अजूनी रूळते अदृश्य, लांबशी शेंडी
मी पंतोजींना भ्यालो,मी देवालाही भ्यालो
मी मनातसुद्धा माझ्या कधी दंगा केला नाही
मज जन्म फळाचा मिळता मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो
मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही!आंबाही झालो नाही!
कवी - संदीप खरे
amit thank u .....
ReplyDeletegood collection