Thursday, May 29, 2008

बिकट वाट वहिवाट नसावी...

बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरुं नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलुं नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको
नास्तिकपणिं तुं शिरुनि जनाचा बोल आपण घेउ नको
आल्या अतिथा मुठभर द्याया मागेंपुढतीं पाहुं नको
मायबापांवर रुसूं नको
दुर्मुखलेला असूं नको
व्यवहारामंधी फसूं नको
कधीं रिकामा बसूं नको
परी उलाढाली भलभलत्या, पोटासाठी करुं नको ॥१॥

वर्म काढुनी शरमायाला, उणे कुणाला बोलुं नको
बुडवाया दुसयाचा ठेवा, करुनी हेवा, झटूं नको
मी मोठा शाहणा, धनाढ्यही , गर्वभार हा वाहुं नको
एकाहुनि चढ एक जगामंधी, थोरपणाला मिरवु नको
हिमायतीच्या बळे गोरगरीबांना तूं गुरकावु नको
दो दिवसांची जाइल सत्ता, अपेश माथा घेउ नको
विडा पैजेचा उचलुं नको
उणी कुणाचे डुलवु नको
उगिच भीक तूं मागुं नको
स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामिन राहुं नको ॥२॥

उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करुं नको
वरी खुशामत शाहण्याची परि मूर्खाची ती मैत्री नको
कष्टाची बरी भाजीभाकरी, तूपसाखरे चोरुं नको
दिली स्थिती देवाने तींतच मानी सुख, कधिं विटूं नको
असल्या गांठी धनसंचय, कर सत्कार्यी व्यय, हटूं नको
आतां तुज गुज गोष्ट सांगतो, सत्कर्मा तूं टाकुं नको
सुविचारा कातरुं नको
सत्संगत अंतरुं नको
द्वैताला अनुसरुं नको
हरिभजना विस्मरुं नको
सत्कीर्ती नौबतिचा डंका गाजे मग शंकाच नको ॥३॥

कवी - अनंतफंदी

Wednesday, May 28, 2008

मन

मन वढाय वढाय
उभ्या पिकातल ढोर
किती हाकलं हाकलं
फिरी येते पिकावर

मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात
आता व्हत भुइवर
गेल गेल आभायात

मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन
उंडारल उंडारल
जस वारा वाहादन

मन जह्यरी जह्यरी
याच न्यार रे तन्तर
आरे इचू साप बरा
त्याले उतारे मन्तर

मन एव्हड एव्हड
जस खसखसच दान
मन केवढ केवढ
आभायतबि मावेन

देवा आस कस मन
आस कस रे घडल
कुठे जागेपनी तुले
अस सपन पडल

कवयित्री - बहिणाबाई चौधरी

Tuesday, May 27, 2008

पराभव

सुर्यास काजव्यांनी पराभूत केले
वा सांज सावल्यांनी पराभूत केले

वैरी कुणी दिसेना रणी झुंजताना
माझ्याच सोयर्‍यांनी पराभूत केले

पापास दंड नाही पुराव्याअभावी
नीतीस कायद्यांनी पराभूत केले

भेटीत हार माझी न झाली कधीही
नुसत्याच वायद्यांनी पराभूत केले

संन्यास घेत होतो, परावृत्त केले
त्या एक चेहर्‍यानी पराभूत केले

नाही जुमानली मी कुणाचीच आज्ञा
पण मूक आसवांनी पराभूत केले

माझे मला कळेना जगावे कसे ते
ह्या पेटल्या मढ्यानी पराभूत केले

ओलीस ठेवले वेदमंत्रास त्यांनी
धर्मास कर्मठांनी पराभूत केले

डोही उपासनेच्या बुडी घेत होतो
नाठाळ यौवनाने पराभूत केले

याहून काय मोठी गुरूदक्षिणा की
उस्ताद शागिर्दानी पराभूत केले

अकरा अक्षौहिणी सैन्य दुर्योधनाचे
नि:शस्त्र सारथ्यानी पराभूत केले


कवी - मिलिंद फणसे

Monday, May 26, 2008

लढाई

कमरेस पाकळीच्या तलवार पाहतो मी
काट्यास हिंडतांना बेकार पाहतो मी

जी काल बाग होती, ती आज युध्दभूमी
पुष्पावरी फुलांचा एल्गार पाहतो मी

'नाराज' हात डावा,उजवा 'तयार' नाही!
हतबल 'इथे तिथे' हे 'सरकार' पाहतो मी

भीषण अशी लढाई,उरला गुलाब नाही
तो बंद अत्तराचा बाजार पाहतो मी

इतिहास या युगाचा सांगेल कोण आता?
फुलपाखरा! तुझाही 'जोहार' पाहतो मी

कवी - जयंत

Friday, May 23, 2008

पितात सारे गोड हिवाळा

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा

डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती

गंजदार पांढर्‍या नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुर्‍या शांततेचा निशिगंध

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा


कवी - बा. सी. मर्ढेकर

Thursday, May 22, 2008

दिसली नसतीस तर...

रतनअबोलीची वेणी माळलेली
आणि निळ्याजांभळ्या वस्रालंकारात
संध्येसारखी बहरलेली तू
तळ्याकाठच्या केवड्याच्या बनात
आपल्याशीच हसताना मला दिसली नसतीस
तर आज माझ्या जीवनाच्या अस्ताचलावर
हा भुलावणा सप्तरंगी सोहळा
असा सर्वांगानी फुलारलाच नसता

आपल्याच नादात तू
पाठ फिरवून परत जाताना
तुझी पैंजणपावले जीवघेण्या लयीत
तशी पडत राहिली नसती
तर माझ्या आनंदविभोर शद्बातून
कातरवेलची कातरता
आज अशी झिणझिणत राहिलीच नसती

अबोलकेपणाच्या गूढ गाढाईने
जाईजुईच्या सांद्र-मंद्र सुगंधाचा लळा
सहज चुकार स्पर्शाने तू मला लावला नसतास
तर उमलत्या फुलपाखरांची
आणि मुक्या भाबड्या जनावरांची
आर्जवी हळुवार भाषा
इतक्या स्पष्टपणाने मला कळलीच नसती

तू कशामुळे माझी जिवलग झालीस
ते खरेच मला आता आठवत नाही;
पण मला तोडताना
समुद्रकाठच्या सुरुच्या बनात
मिट्ट काळोखातून चंद्रकोर उगवेपर्यंत
तू मुसमुसत राहिलीस
हे मात्र मी अजून विसरु शकलेलो नाही
त्या वेळची तुझी ती आसवे
अजून माझ्या कंठाशी तुडुंबलेली आहेत
तू तेव्हा तशी मुसमुसली नसतीस
तर माझ्या शृंगाराचा अशोक
आज करुणेच्या आरक्त फुलांनी
असा डवरलाच नसता

तू तेव्हा आकाशाएवढी विशाल
आणि अवसेच्या गर्भासारखी दारुण
निराशा मला देऊन गेली नसतीस
तर स्वतःच्याच जीवन शोकांतिकेचा
मनमुराद रस चाखून
निःसंग अवधूतासारखा
मी या मध्यरात्रीच्या चांदण्यात
असा हिंडत राहिलोच नसतो

तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीसः
माझी सशरीर नियती होतीस
तसे नसते तर आज जो काय मी झालो आहे
तो झालोच नसतो


कवी - बा. भ. बोरकर

Wednesday, May 21, 2008

माणुसकीची गाणी !

कालबाह्य कविता कशास या लिहिल्या मी ?
मी कशास लिहिली माणुसकीची गाणी ?
कलदारपणाच्या व्यर्थ लागलो मागे....
माझ्याजवळीही होती खोटी नाणी !!

मी गात बैसलो स्तोत्रे उदात्ततेची
दडवले मनाचे कंगोरे मी कोते
मी आनंदाचे रंग उधळले सारे...
... लपवले रंग, जे काळे-करडे होते !

लावला दिवा मी कशास हा आशेचा ?
वाटली न का मी माझी घोर निराशा ?
भांडणे मिटवली...मंत्र `सलोखा` माझा
मी रस्त्यावरती केला का न तमाशा ?

घेतली कशाला खरेपणाची बाजू ?
बिनधास्त बोललो नाही का मी खोटे ?
फायदाच माझा नसता का मग झाला ?
मी करून माझे किती घेतले तोटे !!

मी दुःख फाटके माझे शिवले नाही...
उसवू न दिली मी दुनियेची पासोडी
जमवीत राहिलो तथाकथित मी पुण्ये...
मी करावयाची होती पापे थोडी...!!

हे सारे मजला सहजच जमले असते...
पण कधी न केले, जे मज पटले नाही
जे पुस्तक मजला वाचायाचे नव्हते...
मी कधीच त्याचे पान उलटले नाही !

मी ओबडधोबडपणा टाळला सारा
सजवून वेदना कलाकुसर मी केली !
ह्रदयात आग जी माझ्या भडकत होती...
बनवून चांदणे जगापुढे मी नेली !

निष्कलंक राहो कविकुळ माझ्याकडुनी
मज सवंगतेची कधी न होवो बाधा...
मी शब्दांचा कृष्ण-कन्हैया व्हावे...
कवितेने व्हावे आशयउन्नत राधा !!

लावली इथे मी पणती मिणमिणणारी...
ही करी तुम्हीही घ्यावी, आग्रह नाही !
मी कालविसंगत सूर लावला आहे...
ही धून तुम्हीही गावी, आग्रह नाही !

कालबाह्य कविता लिहीन याहीपुढती...
मी लिहीन रोजच माणुसकीची गाणी
कलदारपणाचा होवो लाभ, न होवो..
वटवणार नाही कधीच खोटी नाणी...!!


कवी - प्रदीप कुलकर्णी

Tuesday, May 20, 2008

जे कधी न जमले मजला

जे कधी न जमले मजला, इतरांना जमले होते...
मज साधे घर नसताना, त्यांचे तर इमले होते !

मी वाट तुझी बघताना, नुसतेच न शिणले डोळे;
प्रत्येक वळण वाटेचे, कंटाळुन दमले होते !

त्या घेराव्यातच मजला, जी झाली धक्काबुक्की..
माझ्यावर ते कुसुमांचे, हारांतुन हमले होते !

तांबडे फुटेतो तू-मी, त्या रात्री जागत असता,
विझण्याचे विसरुन तारे, चमकण्यात रमले होते !

एकांती ऐकू आली, मज बालपणीची गाणी,
पाखरू मनाचे माझ्या, वळचणीस घुमले होते !

होकार घेउनी जेव्हा, आलीस अंगणी माझ्या,
नवसाच्या प्राजक्ताचे, झाडच घमघमले होते !

मी गझल गुणगुणत माझी, रस्त्याने चालत होतो..
आकाश मजपुढे तेव्हा, अदबीने नमले होते !


कवी - वा.न.सरदेसाई

Monday, May 19, 2008

दुष्मनी त्यांची अशी हळुवार आहे

दुष्मनी त्यांची अशी हळुवार आहे
दादही त्यांची जणू तलवार आहे!

मस्तकी घेऊन मजला नाचती ते
हे कशाचे प्रेम, हा व्यवहार आहे

खोडल्या मी पत्रिकेच्या चौकटीही
(मरण का याने असे टळणार आहे?)

जो सुखाने बघत आहे मरण माझे
प्रेत त्याचेही कधी जळणार आहे

अक्षरांची मांडुनी सोपी गणीते
काव्य का त्यांना असे कळणार आहे?

तो भला माणूस जो यांचा पुजारी
मी खरे बोलून घुसमटणार आहे

पाहिला मी सूर्यही अंधारताना
काजवा यांचा कसा टिकणार आहे?

बंद कानांच्याच फौजा भोवताली
(काव्य माझे भाबडा यलगार आहे!)

व्यर्थ आसू मी अता ढाळू कशाला?
वेळ माझीही कधी असणार आहे!


Friday, May 16, 2008

गुंड लोकांचे...

भक्त झाले लोक सगळे गुंड लोकांचे
भोवताली भव्य पुतळे गुंड लोकांचे

रोजची चतकोर पत्रे सभ्य लोकांची
अन पहा हे भव्य मथळे गुंड लोकांचे!

पांढर्‍या कपड्यांतली ही पाहुनी 'ध्याने'
चाहते होतात बगळे गुंड लोकांचे...

दंगली करतात त्यांना दंड देताना
न्यायमूर्ती नाव वगळे गुंड लोकांचे

जाळले संसार थोडे, मोडले थोडे
एवढ्याने भाग्य उजळे गुंड लोकांचे

दोस्तहो तलवार नाही, लेखण्या परजा
लेखणीने तख्त निखळे गुंड लोकांचे...


Thursday, May 15, 2008

तो आणि ती

ती तिच्या सख्यांची लाडकी
तोही आपल्या वर्तुळात लोकप्रिय

तो हळुवारशा कविता करतो,
मैफिली दोस्तांच्या गाजवतो.
तिचाही गळा म्हणे गोड आहे,
भावगीतांचं तिला वेड आहे.

तो आहे अभिजात रसिक,
मोठ्या मनाचा, विचारी.... अन बरंच काही
तिची विशेषणं - मनमिळाऊ, समजूतदार
शांत, करारी..... अन असंच काही

तो वक्तशीर, व्यवस्थित
ती टापटिपीची, नियमित
कार्यालयं नेटकी त्यांची,
मात्र घडी विस्कटलीय प्रपंचाची..

छान-छान सगळं घराबाहेर....
ते जिथे येतात एकत्र
त्या घरात मात्र, दिवस-रात्र
रुक्ष, गद्य नूर खेळाचा,
देता-घेता घरचे अहेर
हरवलाय सूर वाद्यमेळाचा
त्याचा झालाय कप तुटक्या कानाचा,
तिच्या संसाराच्या भांड्याला आलाय पोचा..

आपापल्या भ्रमणकक्षेत, चारचौघांत
दोघे फिरतात एकाच परिघांत
आणि ह्या एकेकाळच्या अनुरुप दोघांत
एक इवलासा दुवा, कावराबावरा, टकमक पहात..

त्याच्या बाजूने निघून जातात
वाटोळं झालेल्या घरच्या त्रिकोणात
दोन समांतर रेषा दोघांच्या ,
एकमेकांना त्या कधी भेटायच्या ?


कवी - सतिश वाघमारे

Wednesday, May 14, 2008

वेळच नसतो...

मनाप्रमाणे जगण्यासाठी वेळच नसतो
मला, स्वप्नही बघण्यासाठी वेळच नसतो...

वसंत येतो, श्रावण येतो अनेकदा; पण
फुलण्यासाठी, भिजण्यासाठी वेळच नसतो...

ओळख असलेलेच भेटती लोक मला, पण
बघून 'त्यांना' हसण्यासाठी वेळच नसतो...

प्रेम कुणीही का माझ्यावर करीत नाही?
प्रेम कुणा का करण्यासाठी वेळच नसतो?

नशिबी असते जे-जे, घडते ते-ते तेव्हा
नशिबी माझ्या 'घडण्यासाठी' वेळच नसतो...

'अजब' चालली कशाला पुढे इतकी दुनिया?
कुणास मागे वळण्यासाठी वेळच नसतो...

कवी - अजब.

Tuesday, May 13, 2008

का ?

ओणवी झालीस तू हलकेच अन्
देह माझा चांदण्याने झाकला...
आंधळा अंधार मी...माझ्यावरी -
- पौर्णिमेचा चंद्र का हा वाकला ?

व्यर्थ वणवणशील तू माझ्यासवे
भान याचेही तुला नाही जरा...
मी असा वारा...कुठेही हिंडतो...
शोधसी माझ्यात का तू आसरा ?

जन्म हा साराच काटेरी जरी
स्पर्श तू केलास अन् झाली फुले...
आग आहे अंतरी; बाहेर ही -
- पारिजाताची डहाळी का झुले ?

वेळ भेटीची चुकीची आपली...
वाट आहे वेगळी माझी-तुझी
जाणिवांना आपल्या सारे दिसे...
प्रीत का ही आंधळी माझी-तुझी ?

मीच माझ्यातून निसटू पाहतो
आणि तू माझ्यात मिसळू पाहसी...
खूप झाले...अर्पिली काही पळे...
जन्म का साराच उधळू पाहसी ?

जाळती आतून-बाहेरून या ...
काहिलीच्या, तल्खलीच्या वेदना
फाटक्या माझ्या जिण्याला ही अशी -
लाभली का भर्जरी संवेदना ?


कवी - प्रदीप कुलकर्णी

Monday, May 12, 2008

मरून पडलेला पांडुरंग

वक्तशीर मुलगा
पाठीवर दप्तर घेऊन
शाळेत वेळेवर पोहोचतो
तसा येऊन पोहोचला पाऊस,
एखादं आदिम तत्त्वज्ञान रूजवावं
तसं शेतकऱ्यानं बी पेरून दिलं
जमिनीच्या पोटात

मग भुरभुर वारा सुटला...
छोट्या स्टेशनवर न थांबता
एक्सप्रेस गाडी
धाड धाड निघून गेल्याप्रमाणे
काळे ढग नुस्तेच तरंगत गेले,
वाटचुकल्या भ्रमिष्ट माणसासारखा
अचानक पाऊस बेपत्ता झाला

बियाच्या पोपटी अंकुरानं
जमिनीला धडका मारून
वर येण्यासाठी रचलेले मनसुभे
दिवसागणिक वाळून गेले,
जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप
दवाखान्यातल्या व्हरांड्यात
विमनस्क फेऱ्या मारतो
तसा शेतकरी धुऱ्यावर उभा

लांबवर टाळ मृदंगाच्या गजरात
पंढरपुराकडे निघालेली दिंडी
आणि इथं काळ्या शेतात
मरून पडलेला हिरवा पांडुरंग!

कवी - दासू वैद्य

Friday, May 9, 2008

हल्लीच्या पोरी...

"इश्श…" म्हणुन मान खाली
घालतच नाहीत,
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

"नविन ड्रेस का ग?" विचारले तर
ह्यांना येतो संशय
"नाही रे जुनाच आहे", म्हणुन
बदलतात विषय
नकट्या नाकावर लटका राग
दिसतच नाही
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

मी घा-या डोळ्यांचे कौतुक करावे
मग तिनेही खुदकन हसावे
कशाचे काय…आजकाल गालांना
खळ्या कशा पडतच नाही
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

उद्या घोड्यावर होऊन स्वार
येईल एक उमदा तरूण
होशिल का माझी राणी विचारेल
हात हातात घेऊन
गोड गॊड स्वप्ने यांना आता
पडतच नाही
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

पोर लग्नाची झाली म्हणुन,
घरी आई-बाप काळजीत
"माझा नवरा मी कधीच शोधलाय"
त्या डीक्लअर करतील ऎटित
घरून होकारासाठी कधी
थांबतच नाहीत
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत...

[from a forwarded e-mail...]

Thursday, May 8, 2008

पुन्हा गंध आला...

पुन्हा गंध आला तुझ्या मोगर्‍याला,
पुन्हा जाग आली इथे चांदण्याला...

अशी रात्र जागी झाली पुन्हा की,
पुन्हा जोर आला तुझ्या मागण्याला...

न कळे कसा तोल गेलाच माझा,
पुन्हा धुंदी आली तुझ्या वागण्याला...

जरी संपलेली रात्र वादळांची,
पुन्हा कोण आला तुझ्या आसर्‍याला...

फूले ही पसरली शेजेवरी मी,
पुन्हा अर्थ आला तुझ्या माळण्याला...

मला जाणले तू असे छान राणी,
पुन्हा दाद घे ही तुझ्या वाचण्याला...

कवी - महेश घाटपांडे

Wednesday, May 7, 2008

कळा ज्या लागल्या जीवा...

कळा ज्या लागल्या जीवा मला कीं ईश्वरा ठाव्या !
कुणाला काय हो त्यांचे ? कुणाला काय सांगाव्या ?

उरीं या हात ठेवोनी उरींचा शूल का जाई ?
समुद्रीं चौंकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही,

जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू !
हमामा गर्जनेचा हो, न नेत्रीं एकही बिंदू.

नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा
भुतांची झुंज ही मागे, धडाडे चौंकडे दावा.

नदी लंघोनी जे गेले तयांची हाक ये कानीं,
इथे हे ओढिती मागे मला बांधोनी पाशांनी.

कशी साहूं पुढे मागे जिवाला ओढ जी लागे?
तटातट काळिजाचे हे तुटाया लागती धागे.

पुढे जाऊं ? वळूं मागे ? करूं मी काय रे देवा ?
खडे मारी कुणी, कोणी हसे, कोणी करी हेवा !


कवी - भास्कर रामचंद्र तांबे

Tuesday, May 6, 2008

बोलायाचे कितीक आहे... [होते कुरूप वेडे]

माझ्यापाशी सुरेख वारा आणि भोवती अक्षरधारा,
बोलायाचे कितीक आहे पण ओठातुन झिरपत नाही.

फुरफुरणारे बाहू माझे प्रचंड शक्ती आणि उसासे,
तोडायाचे बंधन जे जे आवेशातुन उतरत नाही.

थरथरणा-‍या स्वरात माझ्या कंपुन उठतिल भाव - भावना,
स्वच्छंदी गाण्यात परंतू तान मोकळी येतच नाही.

दहा दिशांच्या रिंगणातुनी क्षितीजसुद्धा उल्लंघिन मी,
एकवटाया सारे बळ परि मनगट ते सरसावत नाही.

रंग उषेचे हातामधुनी उधळीत जाईन पानोपानी,
घेतो मी कुंचला तसा अन् विचार तेव्हा रंगत नाही.

मी वेडा आनंदासाठी धुंद मोकळ्या श्वासासाठी,
मन्मनात जे आता आहे अंतरातुनी बरसत नाही.

उगाच फिरतो पृथ्वीवरती शोधित जातो उजाड नाती,
मी माझ्याशी ठेऊन नाते माझ्याशीही बोलत नाही.


पुरुषोत्तम करंडकासाठी [साल आठवत नाही त्याबद्दल क्षमस्व] COEP ने सादर केलेल्या "होते कुरूप वेडे" या एकांकिकेमधुन...