अशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.
Friday, December 28, 2007
ग़ज़ल
करुनी मला शिशिरही, बघ, नापसंत गेले
चित्कारतो न हल्ली क्षितिजास पाहुनी मी
सांगून सत्य त्याचे मज बुध्दिमंत गेले
साकेत ना मिळाला, साकी तरी मिळाली
पेल्यात वारुणीच्या मग खेद-खंत गेले
माडी म्हणू नका, ही आहे पवित्र वास्तू
पावन करून तिजला मुल्ला-महंत गेले
आहे अटळ, मनुष्या, उतरंड रौरवाची
काही मरून गेले, काही जिवंत गेले
कवी - मिलिंद फणसे
Thursday, December 27, 2007
झाड वयात आलेले
नेत्र अनिमिष झाले
दृष्ट लावू नका कोणी
झाड वयात आलेले
जाग हळू पानी आली
सारे जग धुंद झाले
यौवनाचा भार साहे
झाड वयात आलेले
कशा परी लपविते
सोनसळी हा बहर
नेत्री सा वते तुझे
झाड वयात आलेले
नको भिती या ग्रीष्माची
नको बावरु असा तू
ऊन जपेल जपेल
झाड वयात आलेले
कळी कळी फ़ुलारली
पान पान हे लाजले
फांदीतून उमटले
सूर गोड ते गोजिरे
काय विपरीत झाले
काय विपरीत झाले
झाड वयात हे आले
झाड वयात हे आले
कवी - जयश्री अंबासकर
Wednesday, December 26, 2007
वेदनांची मांडतो आरास मी!
वेदनांची मांडतो आरास मी!
पाहतो ते ते खरे मी मानतो
केवढे जपतो उराशी भास मी...
वेळ जो लागायचा तो लागतो
मोजतो आहे उगाचच श्वास मी
लोपले सरकारही...पाऊसही
घेतला हाती अता गळफास मी
जायचे होते तिला, गेलीच ती
थांबवू शकलो कधी मधुमास मी?
नेत नाही ती मला कोणाकडे
जे नको ते बोलतो हमखास मी!
का अचंबा वाटतो गुण पाहुनी
आजवर केला कुठे अभ्यास मी!
ओळखू आली सख्या गणिते तुझी
ऐकला जेंव्हा तुझा इतिहास मी!
कवी - प्रसाद
Saturday, December 22, 2007
मी फुलांची रास झालो
श्रावणाचा मास झालो.
पाहुनी 'मधमस्त' भृंगा,
यौवनाची आस झालो.
जाहलो मी रुक्ष ऐसा,
बौद्धीकाचा तास झालो.
ने सवे वाऱ्या मला तु,
मृत्तिकेचा वास झालो.
ऐकता दु:खे तुझी मी,
कोरडा नि:श्वास झालो.
ती म्हणाली 'प्रिय' मजला!
एवढा मी 'खास' झालो?
रे फसावे मृगजळांनी,
मी असा आभास झालो
मी तुझा ताईत होतो!
नी आता मी फास झालो?
पाहुनी आकाशगंगा,
तारकांचा ध्यास झालो.
साधण्या समतोल आता,
मी तुळेची रास झालो.
कवी - मानस
Friday, December 21, 2007
वय सोळावं सरलं की....
वय सोळावं सरलं की
सगळं हिरवं दिसू लागत
स्वतःभोवती गिरकी घेत
मनात फुलपाखरू वसू लागत
वसंताच्या बागेमध्ये
चाफा केवडे फुलू लागतात
फुलां भोवती पिंगा घालण्या
भवरे ही जमू लागतात
न बोलता प्रत्येकाला
सार काही कळू लागत
वय सोळावं सरलं की.....
पुनवेच्या रात्रीला
सागराला भरती येते
क्षितिजावर आकाशाला
भेटायला धरती येते
प्रेमाची ही आगळी भाषा
प्रत्येकजण बोलू लागत
वय सोळावं सरलं की.....
पहिला वाहिला पाऊस अन
पहिली वाहिली प्रीत असते
प्रत्येकाच्या ओठांवरती
धुंद एक गीत असते
ओलाचिंब मन तेव्हा
वाऱ्यावर झुलू लागत
वय सोळावं सरलं की.....
हिरव्या हिरव्या पानांमध्ये
सळसळणारे वारे असते
तुझ्या डोळ्यांच्या नजरबंदीत
शब्दांवाचून सारे असते
स्पर्शामधून एक नवं
गाणं मनी रुजू लागत
वय सोळावं सरलं की....
कवी - अनिरुद्ध अभ्यंकर
Thursday, December 20, 2007
तेव्हा...
हासली जरा अन, झालो मीच ठार तेव्हा
अंगांग तापलेले, आली समोर जेव्हा
अवचित स्पर्श होता पडलो मी गार तेव्हा
उरात मोगरयाचा भरला सुगंध जेव्हा
घेताच श्वास एक झिंगलो मी फ़ार तेव्हा
स्वप्नातली परी ती आली कुशीत जेव्हा
काढले स्वतःला मी चिमटे हजार तेव्हा
नुकतीच पहिलेली स्वप्ने अनेक जेव्हा
मानुन स्वप्न सत्य नाचलो मी यार तेव्हा
अंगणात दिसली भलत्याच ती रे जेव्हा
मी एकटाची जगलो मानुन हार तेव्हा
Wednesday, December 19, 2007
बगळ्यांची माळ फुले
भेट आपुली स्मरशी काय तूं मनात ॥धृ.॥
छेडिति पानांत बीन थेंब पावसाचे,
ओल्या रानांत खुले उन अभ्रकाचें,
मनकवडा घन घुमतो दूर डोंगरांत
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरांत ॥१॥
त्या गांठी, त्या गोष्टी नारळिच्या खाली,
पौर्णिमाच तव नयनीं भर दिवसा झालीं,
रिमझिमतें अमृत ते कुठुनि अंतरांत
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरांत ॥२॥
हातांसह सोन्याची सांज गुंफतांना,
बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनी मोजतांना,
कमळापरि मिटति दिवस उमलुनी तळ्यांत,
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरांत ॥३॥
तूं गेलिस तोडुनि ती माळ, सर्व धागे,
फडफडणें पंखांचें शुभ्र उरें मागें,
सलते ती तडफड का कधिं तुझ्या उरांत
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरांत ॥४॥
कवी - वा. रा. कांत
Tuesday, December 18, 2007
प्रेम
मी म्हणालो, 'का? तुम्हाला ह्रदय नाही??'
एकदा तूही भिडव डोळे जगाशी
रोज झुकणे पाप आहे, विनय नाही
ध्वस्तले कित्येक आडोसे मनाचे
थांबला पण आसवांचा प्रलय नाही
आजही आहे अबाधित व्यसन माझे
राहिली तुजलाच माझी सवय नाही
गारद्यांचा काय मी द्यावा भरवसा
शब्द त्यांचा शब्द आहे, अभय नाही
माणसांनी निवड केली श्वापदांची
लोकशाहीचा मुळी हा विजय नाही
स्वाभिमानाचेच केवळ तेज आहे
भोवती माझ्या निराळे वलय नाही
सोडली मैफ़िल अता मी काजव्यांची
यापुढे गावात त्यांच्या उदय नाही..
कवी - वैभव जोशी
Monday, December 17, 2007
तो पुन्हा एकदा आला होता
माझ्या विश्वासाला तडा द्यायला
पटलं होतं मला
मन केव्हाच विसरलंय त्याला
आणि शिकलेही होते मी
दु:ख लपवून हसायला
तो पुन्हा एकदा आला होता
हसणं आणि खुलण्यातला
फरक समजावयला.
सारे दरवाजे मी
बंद केले होते
ओठांनाही मोठे कुलुप लावले होते
तो पुन्हा एकदा आला होता
ते सारे दरवाजे उघडायला
नाहीच उघडले तरी
थोड्या चिरा पाडायला.
त्याचे-माझे मित्र-मैत्रिणी
केव्हाच दूर गेले होते
अनोळखी लोकांशी नवीन
बंध जोडले होते
तो पुन्हा एकदा आला होता
जुन्या आठवणी काढायला
कोण आता कुठे असतो
हे मलाच विचारायला.
पण तो आला आणि कळलं
की काय हरवलं होतं
कितीही बांधलं तरी
मन तुझ्यामागेच धावत होतं
खूप बोलून घेतलंय, खूप हसून घेतलंय
सारे दरवाजे मोकळे करून
घर प्रकाशाने भरून घेतलंय.
तो आता निघून गेलाय
माझ्यासाठी मोठ्ठं काम सोडून
पुन्हा बांध बांधायचेत
आणि पुन्हा ओठ कसायचेत
मनाला समजून सांगायचंय
पटेपर्य़ंत बोलत राहायचंय
की मी त्याला विसरलेय
मी पुन्हा एकदा
त्याच्यावाचून जगायला शिकतेय.
Friday, December 14, 2007
गजरा
कधी कुंतली, कधी मनगटी सजून गजरा
जरी रात्रभर फुलून गेला थकून गजरा
तनू गंधिता करून गेला पिचून गजरा
इथे इंगळी मदनज्वराची डसे जिवाला
तिथे आग पेटवून गेला निजून गजरा
जरी ती नको नको म्हणे पण खरे नव्हे ते
जुमानू नको विरोध, जा विस्कटून गजरा
नव्याने तुला पटेल ओळख कळी-कळीची
नव्याने पुन्हा बघून जा उलगडून गजरा
तसा मत्सरी स्वभाव नाही जरी कळ्यांचा
परी स्त्रीसुलभ तपास घेतो कसून गजरा
जरा टाकता कटाक्ष मी वेगळ्या फुलावर
कसा रात्रभर अबोल होतो रुसून गजरा
असे काय बोललास गुंजारवात त्याला
पहा, भृंग, लाजण्यात गेला गढून गजरा
कवी - मिलिंद फणसे
Thursday, December 13, 2007
ती
लाघवी जखमा उरी पेरायची ती......
मी कसे सांगू तुम्हाला अक्षरांनी
बंद ओठांनी उखाणे घ्यायची ती.......
ऐकता चाहूल माझ्या पावलांची
पापण्यांची तोरणे बांधायची ती......
प्रीतीचा सांगू नका मज कायदा
कायदे खोटे कसे सांगायची ती......
कवयत्री - नीता भिसे
Wednesday, December 12, 2007
तू नभातले तारे माळलेस का तेंव्हा?
माझीयाचं स्वप्नांना गाळलेस का तेंव्हा?
आज का तुला माझे एव्हढे रडू आले
तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेंव्हा?
हे तुझे मला आता पाहणे सुरू झाले
एक पानही माझे चाळलेस का तेंव्हा?
चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती
ओठ नेमके माझे टाळलेस का तेंव्हा?
गझलकार - सुरेश भट
Tuesday, December 11, 2007
उदासबोध
उदासबोध (दासबोधाचे विडंबन) - समास पहिला.
आज हयात असते रामदास । तर भोवती बघुन हरामदास ।
अन्तरी जाहले असते उदास । लागोन चिन्ता ॥ १ ॥
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । ऐसा गल्लीगल्लीत गुंड आहे ।
त्यांचेवरी संरक्षण छत्र आहे । पोलीस पुढाऱ्यांचे ॥ २ ॥
या सत्याचा लागता शोध । कुठुन सुचला असता दासबोध ?
लिहिला असता उदासबोध । श्रीसमर्थांनी ॥ ३ ॥
भ्रष्टाचारे पोखरला देश । दीन जनांसी अपार क्लेश ।
दुर्जना यश । सज्जना अपेश सर्वत्र दिसे ॥ ४ ॥
नीतीचा डोळा काणा । प्रत्येक माणूस दीनवाणा ।
सर्व फ़ोलपटे नाही दाणा । पीक ऐसे ॥ ५ ॥
देवतांसी उचलून धरती । वेडेविद्रे नाच करती ।
भसाड ओसाड आरती । झोकून दारू ॥ ६ ॥
कबीर सांगे अल्लाची महती । मुंगीच्या पायी घुंगुर वाजती ।
तरी ते अल्लाशी ऐकु येती । ऐसे म्हणे ॥ ७ ॥
येथे अल्लासी बहिरा मानती । ठणाणा ध्वनीक्षेपक आणती ।
त्यातुन कर्कश बांग हाणती। अल्लासाठी ॥ ८ ॥
कंडम बरगड्यांच्या जनतेवरी । बिल्डर, स्मगलर, गुन्ड राज्य करी ।
प्रत्येक नेता खिसे भरी । हाती धरून तयांसी ॥ ९ ॥
दुष्काळ खणी, भुई फाटे । शोष पडून विहीर आटे ।
काळा कडु गहिवर दाटे । गळ्यात भविष्याच्या ॥ १० ॥
सत्या सामोरे पहाण्यासाठी । त्राण असावे लागे गाठी ।
भेकड पळपुट्याचे पाठी । हिजडा लागे ॥ ११ ॥
ग्रंथ नाम उदासबोध । कवी जनतेचा संवाद ।
काळा कडु आतला विषाद । हलका केला। ॥ १२ ॥
कवी - मंगेश पाडगावकर.
Monday, December 10, 2007
कवीची 'विरामचिन्हे' ('विरामचिन्हे' चे विडंबन)
जे जे दृष्टित ये तयावर 'करू का काव्य?' वाटे मला,
तारा, चंद्र, फुले, मुले किति तरी वस्तू लिहाया पुढे,
तेव्हा 'स्वल्पविराम' मात्र दिसतो स्वच्छंद चोहीकडे !
झाले काव्य लिहून - यास कुठल्या धाडू परी मासिका?
याते छापिल कोण? लावू वशिला कोठे? कसा नेमका?
रद्दीमाजि पडेल का? परत वा साभार हे येईल?
सारे लेखन तेधवा करितसे मी 'प्रश्नचिन्हा' कुल!
अर्धांगी पुढती करून कविता नावे तिच्या धाडिली,
अर्धे काम खलास होइल अशी साक्षी मनी वाटली !
कैसा हा फसणार डाव? कविता छापून तेव्हाच ये !
केला 'अर्धविराम' तेथ; गमले तेथून हालू नये !
झाली मासिकसृष्टि सर्व मजला कालांतरे मोकळी,
केले मी मग काव्यगायन सुरू स्वच्छंद ज्या त्या स्थळी !
माझे 'गायन' ऐकताच पळती तात्काळ श्रोतेजन !
त्या काळी मग होतसे सहजची 'उद्गार' वाची मन !
डेंग्यू, प्लेग, मलेरिया, ज्वर तसे अन् इन्फ्लुएन्झा जरी
ही एकेक समर्थ आज असती न्याया स्मशानांतरी -
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे परी साधला,
देवा, 'पूर्णविराम', त्या कविस या देशी न का आजला?
कवी - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे
Friday, December 7, 2007
'विरामचिन्हे'
जो जो दृष्टित ये पदार्थ सहजी वाटे हवासा मला!
बाल्याची पहिली अशी बदलती दृष्टी सदा बागडे,
तेव्हा 'स्वल्पविराम' मात्र दिसती स्वच्छंद चोहीकडे!
आहे काय जगात? काय तिकडे? हे कोण? कोठे असे?
सांगा ईश्वर कोण? त्यापलिकडे ते काय? केंव्हा? कसे?
जे ते पाहुनि यापरी भकतसे, दृक् संशये टाकित,
सारा जीवनलेख मी करितसे तै 'प्रश्नचिन्हां'कित.
अर्धांगी पुढती करी वश मना श्रुंगारदेवी नटे,
अर्धे जीवन सार्थ होइल इथे साक्षी मनाची पटे;
प्रेमाने मग एकजीव बनता भूमीवरी स्वर्ग ये !
केला 'अर्धविराम' तेथ; गमले येथून हालू नये !
झाली व्यापक दृष्टि; चित्त फिरले साश्चर्य विश्वांतरी,
दिक्कालादि अनंतरूप बघता मी होत वेड्यापरी !
सूक्ष्मस्थूलहि सारखी भ्रमविती; लागे मुळी अंत न,
त्याकाळी मग जाहले सहजची 'उद्गार'वाची मन !
आशा, प्रेम, नवीन वैभव, तशी कीर्तिप्रभा, सद्यश -
ही एकेक समर्थ आज नसती चित्ता कराया वश !
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे असे जाहला,
देवा! 'पूर्णविराम' त्या तव पदी दे शीघ्र आता मला !
कवी - राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज
Thursday, December 6, 2007
घरटे
आठवणींचे निखारे, पुन्हा एकदा फुलले तर ?
उडेल एखादी ठिणगी चुकार,
सोड हट्ट फुंकण्याचा जुनी राख
काड्या-काड्यांचे घरटे माझे,
होईल उगा जळून खाक
आता नाही सहन होत,
घरटे जाळणा-या आगीची झळ
थकलेले पंख माझे,
आता कुठे "फिनिक्स"चे बळ !
हा जन्म तर गेला वाया,
पुढल्या जन्मी नक्की भेटू
काड्या-काड्या जमा करून,
पुन्हा एकदा घरटे थाटू
कवी - योगेश तळेकर
Wednesday, December 5, 2007
मी वाट पहातेय
जागा होण्याची मी वाट पाहतेय
की तुझी सहनशक्ती संपण्याची
मी वाट पहातेय..?
अन्यायाला सीमा असते, पण
कळलय का तुला की अन्याय होतोय..?
तुझा स्व जागृत होण्याची
मी वाट पाहतेय
सवयच झालीये तुला
लक्तर होऊन जगण्याची
तुझी सवय सुटायची
मी वाट पाहतेय
खुप झाला अंधार
बरीच लांबली ही रात्र
दिवस उजाडायची
मी वाट पाहतेय...
मी वाट पाहतेय...
Tuesday, December 4, 2007
राजहंस
जाणतो समीर धुंद, तेच गीत तीच प्रीत
वाजते मधूर बीन, घालते कुणास साद?
तोच चांद तीच रात, तोच छंद तोच नाद
धुंद फूल, धुंद पान, चांदणे कशात दंग?
नाचले खुशीत भृंग, डोलला पहा तरंग
"ये मिठीत सोड रीत", आळवून मालकंस
बोलवी सखीस खास, डौलदार राजहंस !!!
Monday, December 3, 2007
तू तेव्हा तशी
तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी
तू बहराच्या, बाहूंची
तू ऐलराधा, तू पैल संध्या
चाफेकळी प्रेमाची
तू नवी जुनी, तू कधी कुणी
खारीच्या गं डोळयांची
तू हिरवी कच्ची, तू पोक्त सच्ची
तू खट्टी मिठ्ठी ओठांची
कवी - आरती प्रभू [चिं. त्र्यं. खानोलकर]