मी फुलांची रास झालो,
श्रावणाचा मास झालो.
पाहुनी 'मधमस्त' भृंगा,
यौवनाची आस झालो.
जाहलो मी रुक्ष ऐसा,
बौद्धीकाचा तास झालो.
ने सवे वाऱ्या मला तु,
मृत्तिकेचा वास झालो.
ऐकता दु:खे तुझी मी,
कोरडा नि:श्वास झालो.
ती म्हणाली 'प्रिय' मजला!
एवढा मी 'खास' झालो?
रे फसावे मृगजळांनी,
मी असा आभास झालो
मी तुझा ताईत होतो!
नी आता मी फास झालो?
पाहुनी आकाशगंगा,
तारकांचा ध्यास झालो.
साधण्या समतोल आता,
मी तुळेची रास झालो.
कवी - मानस
No comments:
Post a Comment