Wednesday, December 19, 2007

बगळ्यांची माळ फुले

बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरांत
भेट आपुली स्मरशी काय तूं मनात ॥धृ.॥

छेडिति पानांत बीन थेंब पावसाचे,
ओल्या रानांत खुले उन अभ्रकाचें,
मनकवडा घन घुमतो दूर डोंगरांत
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरांत ॥१॥

त्या गांठी, त्या गोष्टी नारळिच्या खाली,
पौर्णिमाच तव नयनीं भर दिवसा झालीं,
रिमझिमतें अमृत ते कुठुनि अंतरांत
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरांत ॥२॥

हातांसह सोन्याची सांज गुंफतांना,
बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनी मोजतांना,
कमळापरि मिटति दिवस उमलुनी तळ्यांत,
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरांत ॥३॥

तूं गेलिस तोडुनि ती माळ, सर्व धागे,
फडफडणें पंखांचें शुभ्र उरें मागें,
सलते ती तडफड का कधिं तुझ्या उरांत
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरांत ॥४॥


कवी - वा. रा. कांत

1 comment:

  1. काही शब्द चुकले आहेत
    … तरी कृपया त्या चुका दुरुस्त कराव्यात
    …. धन्यवाद

    ReplyDelete