रंगरंगुल्या, सानसानुल्या
गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे सांग लागला
सांग तुझा रे तुझा लळा
मित्रासंगे माळावरती
पतंग उडवित फिरताना
तुला पाहिले गवतावरती
झुलता झुलता हसताना
विसरुनी गेलो पतंग नभिचा
विसरून गेलो मित्राला
पाहुन तुजला हरवुन गेलो
अशा तुझ्या रे रंगकळा
हिरवी नाजुक रेशिम पाती
दोन बाजुला सळसळती
नीळ निळुली एक पाकळी
पराग पिवळे झगमगती
मलाही वाटे लहान होऊन
तुझ्याहुनही लहान रे
तुझ्या संगती सडा रहावे
विसरून शाळा, घर सारे
कवयित्री - इंदिरा संत
No comments:
Post a Comment