होता डोंगरपायथ्यास पडला धोंडा भला थोरला
वर्षें कैकहि तरी न तो हाले मुळीं आपुला
आनंदी फुलवेल एक जवळी होती सुखें राहत
बाळे सांजसकाळ हासत तीचीं तैशीच कोमेजत
थट्टेखोर फुलें हंसूनि ती वदलीं धोंड्यास त्या एकदा
"धोंडा केवळ तू ! अरे, न जगती काही तुझा फायदा !"
संतापून तयांस फत्तर म्हणे " कां हीं वॄथा बोलणी
सारी सुंदरता इथेंच तुमची जाईल रे वाळुनी !"
धोंडयाच्या परि काळजास भिडले ते शब्द जाऊनिया
काळाठिक्कर यामुळें हळुहळू तो लागला व्हावया
पुष्पांच्या कवळ्या मनांतहि सले ते फत्तराचें वच
गेली तोंडकळा सुकून, पडली तीं पांढरी फारच !
कोणी त्या स्थलि शिल्पकार मग तो ये हिंडता हिंडता
त्याच्या स्फुर्तिस फत्तरांत दिसली काहीतरी दिव्यता
त्याची दिव्यकलाकरांगुलि न जों त्या फत्तरा लागली
श्रीसौंदर्यमनोरमा प्रगटुनी साक्षात् उभी राहिली
वेडा पीर असाच गुंगत कुणी एकाकी ये त्या स्थळा
ती मूर्ती बघतांच तो तर खुळा नाचावया लागला
त्यानें ती खुडुनी फुलें भरभरा पायीं तिच्या वाहिली
तों, त्यांची फुलुनी कळी खद्खदा सारीं हसूं लागली
लावण्यकॄति ती वनांत अजुनी आहे उभी हांसत
पुष्पेंही बसलींत तीं बिलगुनी पायी तिच्या खेळत
कवी - केशवकुमार
No comments:
Post a Comment