Monday, November 10, 2008

आताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो...

आताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो
लाचारीने फिरवून कार्डे सहीस मागवतो

शर्ट नको मज कुठलाही अन पँट नको आहे
बक्कल कुठले मुळात मजला बेल्ट नको आहे
बायकोसंगे परवा माझ्या करार मी केला
सर्व खरेदी तिला करावी, काही नको मजला
बायकोजीच्या पुंगीवर मी नवरोबा डुलतो!

आता आता खरेदीस मज बायको पाठवते
काउंटर बघता लुंगी नाही, साडी आठवते!
आता कुठल्या दिलखुष गप्पा काउंटरवाल्यांशी
आता नाही शॉपिंग उरले पूर्वीगत हौशी
बिलंदरीने दिसतील त्या त्या साड्या मी बघतो!

कळून येता कार्ड लिमिटची इवलिशी त्रिज्या
उडून जाती अत्तरापरी शॉपिंगच्या मौजा
दारी फिरकत नाही कोणी नवा कार्डवाला
राखण करीत बसतो येथे जुना कार्डवाला
कर्जांनाही आता माझा कंटाळा येतो!

आताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो
लाचारीने फिरवून कार्डे सहीस मागवतो


[विडंबन] कवी - प्रसाद शिरगांवकर
मूळ गीत: आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो
मूळ गीतकार: संदीप खरे

No comments:

Post a Comment