कविता शोध

माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.

आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/


Tuesday, August 5, 2008

सून

परवा हे रात्री बोलून गेले
कधी नव्हे ते गोड-गोड हसत,
"आपल्याला सून हवी तुझ्यासारखी
अगदी समजूतदार, शांत!"
बोलून ते झोपून गेले,
अन घोरायलाही लागले.

मी आपली गप्प, त्यांच्याकडे बघत
आतला आनंद सरावानं लपवत..
'उशीरा का होईना.. !' म्हणत,
नकळत होते स्वतःशीच हुरळत.

पण...बराच वेळ जागल्यावर
आले सवयीनं भानावर
विचार केला बोलण्यावर
म्हटलं घ्यावं का ते मनावर?

खरंच का ह्यांना आवडलंय,
आपलं आजवरचं वागणं
का ह्यांना अजून एक हवंय
बिनआवाजाचं खेळणं?

मुलगा आपल्या दोघांचा,
आहे म्हणायला मातृमुखी
बाकी वळणावर त्यांच्या,
सारी लक्षणं सारखी...

बाप-लेकांचे शब्द झेलणं
झालंय मला नेहेमीचं,
काम नाहीये पण हे
नवख्या पोरी-सोरीचं.

दुसर्याची लेक, आशेनं
आपल्याघरी येईल
माझं झालं ते झालं...
पण तिचं काय होईल ?


कवी -

No comments: