Thursday, June 26, 2008

चार दिवस

फार काही मागत नाही, घेऊ नका आडकाठी
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी

नसेन पुत्र मी कुणाचा
आज्ञाधारक अन् शहाणा
नसेन भाऊ, दादा, भाचा
केवळ अलाणा-फलाणा
जरा मोकळा राहू द्या, येऊ नका माझ्या पाठी
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी

नसेन पती अर्धांगीचा
बैल जुंपलेलो घाणा
नसेन वडील मी मुलींचा
पायी झिजल्या वहाणा
जाईन गणिकेच्या कोठी अथवा संन्याश्यांच्या मठी
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी

नसेन मित्र मी दोस्तांचा
म्हणू दे माणूसघाणा
नको कोणत्याही पेशाचा
धंदेवाईक बहाणा
मनीषा ही एक आहे, जवळ आली आता साठी
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी

साखळदंड दायीत्वाचा
तुटे ना कितीही ताणा
अर्ज करता मी रजेचा
करता किती हो ठणाणा
मुक्त श्वास घेईन मी, सोडा सार्‍या निरगाठीं
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी

भार उतरू दे डोईचा
पाठीचा वाकला कणा
देई यत्न लिहिण्याचा
सृजनाच्या सुखद वेणा
फावला तो वेळ मिळता करीन लेखनकामाठी
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी

व्यापार चारच दिवसांचा
लाख मोलाचा पण जाणा
आयुष्याच्या भैरवीचा
वाजू लागला तराणा
हिशोब मांडीत बसले चित्रगुप्ताचे तलाठी
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी

कवी - मिलिंद फ़णसे

No comments:

Post a Comment