Friday, June 27, 2008

कारण या जगात प्रेम करावं असं काहीच नसतं..

मनापासून प्रेम करावं... तर ...त्याचं प्रेम फसतं..

कारण या जगात प्रेम करावं असं काहीच नसतं..

प्रत्येकाच्या आयुष्यात अशीच एखादी परी असते..

त्याच्या मते ती जरा.. चारचौघींपेक्षा बरी असते..

परी ही खरी व्हावी..त्याच्या जीवनात बहार यावी..

जणू हरवलेल्या स्वप्नांनाही भल्या पहाटे जाग यावी..

प्रितीच्या पहील्या वहील्या वळणावरचं ते..

आशावादी दार असतं..

मनापासून प्रेम करावं... तर ...त्याचं प्रेम फसतं..

कारण या जगात प्रेम करावं असं काहीच नसतं..

अशाच एका सकाळी ती परी त्याला भेटते..

तिच्या विरहाची ज्योत त्याची रात्र होवून पेटते..

अशा कित्येक रात्री तिच्या श्वासांना तो वाहतो..

आठ्वणींचा चंद्र तिच्या डोळ्यांमध्ये पाहतो..

आसुसलेल्या डोळ्यांचं, विखुरलेल्या श्वासांचं..

प्रेम हेच नाव असतं..

मनापासून प्रेम करावं... तर ...त्याचं प्रेम फसतं..

कारण या जगात प्रेम करावं असं काहीच नसतं..

संथ वाहत्या पाण्यातसुद्धा आवेगाचा भास होतो..

तिच्या प्रत्येक अदेचा गुलाम त्याचा श्वास होतो..

कधी दुःखांचे तर कधी सुखाचे क्षण वेचून घेतो..

कधी भारवलेली तर कधी हरवलेली संवेदना बनून राहतो..

पाण्यातल्या तरंगांचं, इंद्रधनुंच्या रंगांचं..

मन वेडं धुंद असतं..

मनापासून प्रेम करावं... तर ...त्याचं प्रेम फसतं..

कारण या जगात प्रेम करावं असं काहीच नसतं॥

कवी - माधव कुलकर्णी

No comments:

Post a Comment