Wednesday, June 25, 2008

कर्ज

आज चुकवून सारी देणी मोकळा मी जाहलो
ताठ मानेने जाण्या पहा मोकळा मी जाहलो

दिसताच मी फिरवून नजरा लोक झाले चालते
निर्धास्त व्हा, अद्यापही भिकेस ना मी लागलो

रंग सरड्यासम बदलते रक्त तुमचे मतलबी
उकळत्या रक्तास माझ्या आटवून मी चाललो

तुम्हीच होता कापला हळुवार हातांनी खिसा
स्पर्श सारे चोरटे आता ओळखू मी लागलो

नाही दिलासा आज कोठे तरीही मस्तीत मी
मिंधेपणाच्या जगण्यास ठोकरून मी चाललो

द्रव्य लाविले पणाला, कुलशील नव्हते सोडले
जुगार अब्रुचा खेळणारा धर्म ना मी जाहलो

कशास येणे फिरुन येथे, वनवास बरवा ह्यापरि
व्यापार हरलो भावनांचा, नादार मी चाललो

ओलांडणे न वेस अंतिम कर्ज मागे ठेवूनी
फेडून आज सव्याज सर्व अपमान मी चाललो

मानवली नाही, लोकहो, गावची तुमच्या हवा
प्रत्येक घरच्या तक्षकाला परीक्षित मी भासलो

कवी - मिलिंद फ़णसे

No comments:

Post a Comment