कविता शोध

माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.

आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/


Tuesday, June 15, 2010

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

कवी - सुरेश भट

3 comments:

anand108 said...

उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे
अजून ही उशीवरी टिपूर चांदणे पडे

उगीच वेळ सारखी विचारतोस काय तू ?
पुन्हा पुन्हा मिठीतही शहारतोस काय तू ?
पुन्हा अशी हवी तशी कुणास रात्र सापडे
उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे

अजून कुंतलात या तुझा न जीव गुंतला
अजून पाकळ्यांतला मरंदही न संपला
अजूनही कसे तुझे लबाड ओठ कोरडे
उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे

अजून थांब लागली जगास झोप आंधळी
दिसेल या नभातही हळूच रात्र सावळी
तुला मला विचारुनी फुटेल आज तांबडे
उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे

गीत: सुरेश भट
संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर: लता मंगेशकर

Sudarshangond said...

खुप छान कविता आहे

Dr. Hemant Joshi said...

धन्यवाद