Tuesday, June 15, 2010

फटका

बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको
नास्तिकपणि तुं शिरुनि जनाचा बोल आपणा घेउ नको
आल्या अतिथा मुठभर द्याया मागेपुढती पाहु नको
मायबापांवर रुसूं नको
दुर्मुखलेला असूं नको
व्यवहारमधि फसूं नको
कधी रिकामा बसू नको
परी उलाढाली भलभलत्या, पोटासाठी करु नको ॥ १ ॥

वर्म काढुनी शरमायाला, उणे कुणाला बोलुं नको
बुडवाया दुसऱ्याचा ठेवा, करुनी हेवा, झटू नको
मी मोठा शाहणा, धनाढ्यहि, गर्वभार हा वाहू नको
एकाहून चढ एक जगामंधि, थोरपणाला मिरवू नको
हिमायतीच्या बळे गरिबगुरीबाला तू गुरकावू नको
दो दिवसाची जाइल सत्ता, अपेश माथा घेउ नको
विडा पैजेचा उचलु नको
उणी कुणाचे डुलवु नको
उगिच भीक तूं मागू नको
स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामिन राहू नको ॥ २ ॥

उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करु नको
वरी खुशामत शाहण्याची परि मूर्खाची ती मैत्री नको
कष्टाची बरी भाजिभाकरी, तूपसाखरे चोरू नको
दिली स्थिती देवाने तीतच मानी सुख, कधिं विटू नको
असल्या गाठी धनसंचय, कर सत्कार्यी व्यय, हटू नको
आता तुज गुज गोष्ट सांगतो, सत्कर्मा तूं टाकु नको
सुविचारा कातरू नको
सत्संगत अंतरू नको
द्वैताला अनुसरू नको
हरिभजना विस्मरू नको
सत्कीर्ती नौबतिचा डंका गाजे मग शंकाच नको ॥ ३ ॥

कवी - अनंत फंदी

(ही कविता टाकायची राहून गेली होती, आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद प्राची.)

3 comments:

  1. khup avadle,thodich vachle hote purna vachayla delyabadal dhanyavad.....

    ReplyDelete
  2. Khup awadati kavita ahe hi, itkya diwasanni vachayal milali, dhanyavaad.
    Prachi T

    ReplyDelete
  3. फटका ही कविता मला दहावीत असतांना होती १६ वर्षापूर्वी त्या वेळेस कळली नाही खरंतर मी वाचली नाही पण आता कविता कळली .....आभारी आहे

    ReplyDelete