कविता शोध

माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.

आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/


Tuesday, March 31, 2009

दोष असती जगतात...

दोष असती जगतात किती याचे
नसे मजला सामर्थ्य गणायाचे,
दोष माझा परि हाच मला वाटे
दोष बघता सत्प्रेम कसे आटे?

दोष असती जगतात, असायचे
मला त्यांशी तरि काय करायाचे?
प्रेमगंगेच्या शुद्ध सिंचनेही
शुद्ध होई न जो -दोष असा नाही.

गड्या पुर्णा! मज आस तुझी नाही
सख्या न्युना, ये मार मिठी देही
प्रीति माझ्या ह्रदयात करी वास
न्युनतेला पुर्णत्व द्यावयास !


कवी - बालकवी

Thursday, March 26, 2009

कषाय-पेय-पात्र-पतित मक्षिकेप्रत

कषाय-पेय-पात्र-पतित मक्षिकेप्रत
(अर्थात - चहाच्या कपात पडलेल्या माशीस... :) )

अयि नरांग-मल-शोणित-भक्षिके,
जनु-विनाशक-जंतु-सुरक्षिके!
असु-परीक्षित-हारक-तक्षिके,
'क्या हुवा अफसोस!' मक्षिके.

या प्रभातसमयास मंगल,
चमकती दंवमौक्तिक निर्मल,
गात पक्षिगण हा गगनी फिरे,
पण दशा तव काय अर-अरे!

ओसरीवरुनि या तव मैत्रिणी,
गात स्वैर फिरतात सुलक्षणी;
परि तुला न बघती मुळि ढुंकुनी,
'संकटी जगि कुणा न असे कुणी!'

मंडई नव्हति का तुज मोकळी,
की मिठाई 'मघुरा-भुवनांतली',
नव्हति का 'उपहार-गृहे' खुली,
म्हणुनि आलिस शहरातिल बोळ ते,
मनुजवस्तित आलीस का इथे!

करीत 'दत्तु-भट' काय तपासणी
म्हणुनि घाबरुनी आलीस तू झणी!
शर्कराकण येथिल सांडले
सेवुनी न तुज सौख्य जाहले?

की 'यमी' करिंचे गुळखोबरे,
शमवी भूक न काय तुझी बरे?
पेय बोलुनिचालुनि घातकी,
बुडविते बघ भारतियास की !

या अशा व्यसनात विलायती,
अडकता फळ दारुण शेवटी !
नर जसा बुडतो भवडोही
तेवि खालिवर जासि अयाई!

काडी वाचवि जरी बुडत्याला,
काडीचा न परि आश्रय गे तुला!
स्थिति तुझी करुणास्पद ही अशी.
बघु तरी उघड्या नयनी कशी?

अंगि तेवि भरले भयकापरे,
आणि त्यात निवला न चहा बरे!
हाय! सोडुनि जाशिल ना अम्हा,
छे, सले नुसती मनी कल्पना?

समिप पाउसकाळहि पातला,
आणि तू निघुनि जाशिच आजला!
अहह, आम्रफल-मोसम येईल,
अम्हि असू परि तू नसशील!

फेकु सालटि चोखुनि चोखुनि,
तुजविना पण जातिल वाळुनी
तुजविना कवि-मुखे दिसतील की,
भृंगहीन कमळांसम ती फिकी,

कौन्सिलात, सभासद आणी,
मारतील कवणा तुजवाचुनी?
राजकारण रोज नवे नवे,
राष्ट्रभक्त करण्यास तयार हे.

शिंकुनि अहह! देइल त्यापुढे,
त्या इशारत कोण तरी गडे?
यापरी नव-तरंग मनात
येउनी ह्रदय होय कंपित.

पेयपृष्ठि उठली इतुक्यात,
मंद-श्वास,-लहरीसह लाट!

फड फड फड पंखा हालवी ती तराया,
तडफड बहु केली जाहले कष्ट वाया,
मिटवुनि इवलेसे पाय, ती शांत झाली,
अहह, तडक आणि खालती खोल गेली!

टाकुनी लांब सुस्कार, उमाळा दाबुनी उरी,
चहा तो शांत चित्ताने प्राशिला वरचेवरी.


कवी - केशवकुमार

Wednesday, March 25, 2009

कणा

‘ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.

माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा!


कवी - कुसुमाग्रज

Tuesday, March 24, 2009

कवी आणि कारकून

बोले हासुनि कारकून कुठला गर्वे कवीला असे
'माझे साम्य तुझ्यामधे दिसतसे-आहोत बंधू जसे!
दोघेही दिनरात्र ना खरडतो काहीतरी आपण,
जन्माचे पडलेत की ठळक हे बोटास काळे वण!

'माझे अक्षर का कुणास उमगे-आला जरी तो खुदा
ब्रह्याच्याहि पित्यास का समजणे काव्यार्थ तूझा कदा!
येती कागद जे समीप करणे त्यांची मला नक्कल
तूही ना नकला अशाच करिसी-लागे न ज्या अक्कल!

आणे, पै, रुपये हिशेब करितो-ज्यांचे न हो दर्शन,
नाही पाहियली तरी करिसि ना ताराफुले वर्णन?
पोटाचे रडगान मी रडतसे वेळी अवेळी जसे
चाले संतत काव्यरोदन तुझे तीन्ही त्रिकाळी तसे!'

'मित्रा, हे सगळे खरे,' कवि वदे, 'तुझ्याप्रमाणे पण-
माझ्या मूर्खपणास ना दरमहा देई कुणी वेतन!'


कवी - केशवकुमार

Friday, March 20, 2009

येणारा दिवस मला हेटाळत हसणारच...

येणारा दिवस मला हेटाळत हसणारच
जाणारा दिवस मला जाताना डसणारच |

वरवरच्या बोलण्यात गेली बघ रात्र सरून
मावळता चंद्र तुझे नाव मला पुसणारच |

देताना हृदय तुला केला मी हा विचार-
'घेणारा घेणारच! देणारा फसणारच ' |

हारूनही लाखवार माझी झाली न हार
मी माझ्या स्वप्नांना फिरफिरून पिसणारच |

माझे घर वार्‍याचे अन् पायच पार्‍याचे
मी जगास रस्त्यावर गाताना दिसणारच |

काही भलतेच लोक तेव्हा करतील शोक
तेव्हाही मी त्यांच्या आसवांत नसणारच |


गझलकार - सुरेश भट

Thursday, March 19, 2009

वणवण

रुणझुणत राहिलो, किणकिणत राहिलो,
जन्मभर मी तुला 'ये' म्हणत राहिलो|

सांत्वनांना तरी हृदय होते कुठे?
रोज माझेच मी मन चिणत राहिलो|

ऐकणारे तिथे दगड होते जरी,
मीच वेड्यापरी गुणगुणत राहिलो|

शेवटी राहिले घर सुनेच्या सुने...
उंबऱ्यावरच मी तणतणत राहिलो|

ऐनवेळी उभे गाव झाले मुके;
मीच रस्त्यावरी खणखणत राहिलो|

विझत होते जरी दीप भवतालचे,
आतल्या आत मी मिणमिणत राहिलो|

दूर गेल्या पुन्हा जवळच्या सावल्या
मी जसाच्या तसा रणरणत राहिलो|

मज न ताराच तो गवसला नेमका...
अंबरापार मी वणवणत राहिलो|


गझलकार - सुरेश भट

Wednesday, March 18, 2009

लावण्य

असे काहीतरी आगळे लावण्य केव्हा कधीकाळी दिसून जाते
वेगळ्या सौंदर्य-पर्युत्सुक जीवा जन्मांतरीचे सांगत नाते

नसते निव्वळ गात्रांची चारुता त्याहून अधिक असते काही
ठाव त्याचा कधी लागत नाही आणि आठवण बुजत नाही

रुप रेखेत बांधलेले तरी मोकळी खेळते त्यातून आभा
डोळ्याआडाच्या दीपज्योतीहून निराळी भासते प्रकाशप्रभा

आधीच पाहिले पाहिले वाटते पहिलेच होते दर्शन जरी
स्मरणाच्या सीमेपलिकडले कुठले मीलन जाणवते तरी

पुन्हा तहानेले होतात प्राण मन जिव्हाळा धाडून देते
जागच्या जागी राहून हृदय प्रीतीचा वर्षाव करून घेते !


कवी - अनिल

Tuesday, March 17, 2009

केवढे हे क्रौर्य!

क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी;
किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.

म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला;
करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,
करो जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!

अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना;
तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी,
क्षणैक बसले तो शिरे बाण माझ्या उरीं.

निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय,
म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला,
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!

म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां
म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा;
स्मरा मजबरोबरी परि दयाघना इश्वरा.

असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी;
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक;
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!


कवी - ना. वा. टिळक.

Monday, March 16, 2009

या झोपडीत माझ्या

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥

महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥

पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥


संत तुकडोजी महाराज

Friday, March 13, 2009

मावळत्या दिनकरा

मावळत्या दिनकरा अर्घ्य तुज
जोडुनि दोन्ही करा |

जो तो वंदन करी उगवत्या,
जो तो पाठ फिरवि मावळत्या,
रीत जगाची ही रे सवित्या
स्वार्थपरायणपरा |

उपकाराची कुणा आठवण ?
‘शिते तोवरी भूते’ अशी म्हण;
जगात भरले तोंडपूजेपण,
धरी पाठिवर शरा |

आसक्त परि तू केलीस वणवण,
दिलेस जीवन, हे नारायण,
मनी न धरिले सानथोरपण,
समदर्शी तू खरा |

प्रभु-सचिवा विरही मुखधूसर
होति दयामृदु नयनिष्ठुर कर
टाकुनि कारभार चंद्रावर
चाललास तू खरा |


कवी - भा.रा.तांबे

Thursday, March 12, 2009

एखाद्याचें नशीब

काही गोड फुलें सदा विहरती स्वगागनांच्या शिरीं,
काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरीं;
काही जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि तें,
एखादे फुटकें नशीब म्हणुनी प्रेतास शृंगारितें ।

कोणी पर्वत आपुल्या शिरिं धरि हैमप्रभा शीतला,
कोणाच्या उदरामधून निघती मोठया नद्या निर्मला;
कोणाला वनदेवता वरितसे मोदांत जी नाहते,
एकाद्यामधुनी परंतु जळती ज्वालानदी वाहते !

झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,
स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळ्या पानांवरी नाचती;
सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते,
एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !

चाले खेळ असा जगांत; बहुधा सौख्यांत सारे जरी,
एखादा पडतो तसाच चुकुनी दुःखार्णवीं यापरी
पाही कोण अशा हताश हृदया ? जो तो असे आपला,
देवा ! तूं तरि टाकिं अश्रु वरुनी, त्यासाठीं तो तापला !


कवी - गोविंदाग्रज

Wednesday, March 11, 2009

खाली डोकं, वर पाय!

जेव्हा तिला वाटत असतं, तुम्ही जवळ यावं
जवळ यावं याचा अर्थ, तुम्ही जवळ घ्यावं !
अशा क्षणी चष्मा पुसत, तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला,
व्यामिश्र अनुभूती, शब्दांनी तोलत बसला !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

जेव्हा ती लाजत म्हणते, “आज आपण पावसात जायचं”
याचा अर्थ चिंब भिजून, तिला घट्ट जवळ घ्यायचं,
भिजल्यामुळे खोकला होणार, हे तुम्ही आधीच ताडलंत,
भिजणं टाळून खिशातून, खोकल्याचं औषध काढलंत !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

तिला असतो गुंफायचा, याच क्षणी श्वासात श्वास,
अनंततेवर काळाच्या, तुमचा असतो दृढ विश्वास,
तुम्ही म्हणता थांब जरा,
आणि होता लांब जरा,
तुम्ही चिंतन करीत म्हणता, “दोन श्वासांमध्ये जे अंतर असतं,
काळाच्या पकडीत ते कधीसुद्धा मिळत नसतं !”
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

भाषेच्या ज्ञानाने तर, तुम्ही महामंडित असता,
व्याकरणाचे बारकावे, त्याचे तुम्ही पंडित असता,
ती ओठ जवळ आणते, व्याकरणात तुम्ही शिरता,
ओठ हे सर्वनाम? त्याचा तुम्ही विचार करता !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !


कवी - मंगेश पाडगावकर

Tuesday, March 10, 2009

दर्जेदार

ती कुणाची झुंज होती? तो कसा जोहार होता?
जो निखारा वेचला मी तो निखारा गार होता!

हा कसा आता उन्हाचा निर्दयी पाऊस आला?
मी मघाशी पाहिलेला मेघ काळाशार होता!

गांजले ज्यांनी मला ते शेवटी माझेच होते...
हा कळीचा दंश होता! तो फुलांचा वार होता!

ह्या करंट्यांनी स्वतःचे फोडले आधीच डोळे..
(त्यांचियासाठी उद्याचा सूर्य अत्याचार होता!)

स्वागतासाठीच माझ्या भुंकले ते आदराने
थुंकले तोंडावरी तो केवढा सत्कार होता!

गाडल्या त्यांनी पिढ्या अन् ठेवला नाही पुरावा
ह्या स्मशानाच्या धन्यांचा देव ताबेदार होता!

लागला आहे अताशा वेदनेचा शौक त्यांना
(एरवी, त्यांचा सुखाचा चोरटा व्यापार होता!)

चोरली माझ्या घराची राखही त्याने परंतू
मी न केला ओरडा... तो चोर अब्रूदार होता!

पाहिला नाही जरी मी चेहरा मारेकर्‍याचा
लोकहो, माझा तरीही खून दर्जेदार होता!


गझलकार - सुरेश भट

Monday, March 9, 2009

अनय

नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात;
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून,
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून
तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे
धुंदमदिर निळे तळे.

त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा अळता लावलेली तुझी पावले
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता
पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न्‌ कण
प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना.

कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दु:खाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.
तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं
त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.
राधे, पुरुष असाही असतो!


कवयित्री - अरुणा ढेरे

Tuesday, March 3, 2009

सलाम

सलाम
सबको सलाम
ज्याच्या हातात दंडा
त्याला सलाम,
लाथेच्या भयाने
डावा हात गांडीवर ठेवून
उजव्या हाताने सलाम,
बघणाऱ्याला सलाम,
न बघणाऱ्याला सलाम,
विकत घेणाऱ्याला सलाम,
विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला सलाम,
सलाम, भाई, सबको सलाम.

वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम,
शेंदूर थापलेल्या दगडाला सलाम,
लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम,
देवळांतल्या देवांच्या धाकाला सलाम,
देवांचे आणि धर्मांचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम,
रिकाम्या हातातून उद काढणाऱ्या बडेबुवाला सलाम,
शनीला सलाम,
मंगळाला सलाम,
भीतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम,
आईवर आयुष्यभर गुरगुरणाऱ्या बापाला सलाम,
बापावर गुरगुरणाऱ्या साहेबाला सलाम,
साहेबाची टरकावणाऱ्या
त्याच्या साहेबाला सलाम,
सलाम, प्यारे भाईयों और बेहेनों,
सबको सलाम.

ज्याच्या हातात वृत्तपत्र
त्याला सलाम,
भाषणांचे, सभांचे
फोटोसकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम,
वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम,
त्यांची वेसण धरणाऱ्या
राज्यकर्त्यांना सलाम,
ज्याच्या समोर माइक्रोफोन
त्याला सलाम,
त्यातून न थांबता बोलतो
त्याला सलाम,
लाखोंच्या गर्दीला सलाम,
गर्दी झुलवणाऱ्या
जादूगारांना सलाम,
भाईयों और बेहेनों सबको सलाम.

नाक्यावरच्या दादाला सलाम,
हातभट़्टीवाल्याला सलाम,
स्मगलरला सलाम,
मटकेवाल्याला सलाम,
त्यांनी पेरलेल्या हफ्त्यांना सलाम,
लोकशाहीलाबी सलाम,
ठोकरशाहीलाही सलाम,
सत्तेचा ट्रक चालविणाऱ्यांना सलाम,
ट्रकखाली चिरडलेल्या
गांडुळांना, कुत्र्यांना सलाम,
ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम,
विमानातून बॉंम्ब फेकणाऱ्यांना सलाम,
शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापाऱ्यांना सलाम,
काळाबाजारवाल्यांना सलाम,
त्यांना फाशी देण्याची घोषणा करणाऱ्यांना सलाम;
गटारातल्या पाण्याने इंजेक्शने भरणाऱ्यांना सलाम,
तिरडीचे समान विकणाऱ्यांना सलम,
तिरडी उचलणाऱ्या खांद्यांना सलाम,
मौत सस्ती करणाऱ्या सर्वांना सलाम,
सलाम, प्यारे दोस्तों, सबको सलाम.

बिळांना सलाम,
बिळांतल्या उंदरांना सलाम,
घरातल्या झुरळांना सलाम,
खाटेतल्या ढेकणांना सलाम,
गजकर्णी भिंतींना सलाम,
पिचलेल्या बायकोला सलाम,
दीड खोलीतल्या पोर्वड्याला सलाम,
गाडीत चेंगरणाऱ्या गर्दीला सलाम,
किडक्या धान्याला सलाम,
भोके पडलेल्या पिवळ्या गन्जिफ्रोकला सलाम,
धंद्याच्या मालकाला सलाम,
युनियनच्या लिडरला सलाम,
संपाला सलाम,
उपासमारीला सलाम,
सर्व रंगाच्या सर्व झेंड्यांना सलाम,
चाळीचाळीतून तुंबलेल्या
संडासातल्या लेंड्यांना सलाम,
मानगूट पकडणाऱ्या
प्रत्येक हाताला सलाम,
सलाम, भाईयों और बेहेनों, सबको सलाम.

या माझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम,
या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम,
सर्व बिलंदर घोषणांना सलाम,
जातिभेदांच्या उकिरड्यांना सलाम,
या उकिउरडयांतून सत्तेचे पीक काढणाऱ्यांना सलाम,
उपनिषदे आणि वेदांना सलाम,
साखरकारखान्यांच्या दादांना सलाम,
त्यांच्या शेकडो लॉऱ्यांना सलाम,
निवडणुकींना सलाम,
निवडणुकफंडाला सलाम,
अदृश्य बुक्क्यांना सलाम,
मतांच्या आंधळ्या शिक्क्यांना सलाम,
ससा हाती असलेल्या पारध्यांना सलाम,
त्यांच्या तैनातीतल्या गारद्यांना सलाम,
दलितांवर अत्याचार करणाऱ्यांना सलाम,
या बातम्या वाचणाऱ्या सर्व षंढांना सलाम,
सलाम, भाईयों और भैनों, सबको सलाम.

सत्ता संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हटले
तर डोके फोडतील ,
हलकट लाचारांचा देश म्हटले
तर रस्त्यावर झोडतील,
खरीदले जाणाऱ्यांचा देश म्हटले
तर वाटा रोखतील,
देवाधर्माविषयी, नेत्यांविषयी वाईट बोललो
तर नाक्यावर गाठून ठोकतील,
शोषण करणाऱ्यांचा देश म्हटले
तर नोकरीवरून काढतील;
म्हणून आधी माझ्या नपुंसकत्वाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच
या माझा
परमपवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम,
या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.
सलाम
प्यारे भाईयों और बेहेनों, सबको सलाम,

अनेक हात असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकिन माफ़ करना भाईयों,
हात तर दोनच
आणि त्यातला डावा
लाथेच्या भयाने
ठेवलेला गांडीवर
म्हणून फक्त
उजव्या हाताने सलाम,
सलाम, सबको सलाम
भाईयों और बेहेनों, सबको सलाम.


कवी - मंगेश पाडगावकर.

Monday, March 2, 2009

सिद्धांत आसवांचा

आरंभही मी जीवनाचा, रडण्यातुनी केला सुरू
अंतावरी रहील वाटे, कार्य हे माझे सुरू

आता जसा निःशंक रडण्या, सरसावलो थोडा पुढे
आले स्वये भगवान, आणि टाकली गीता पुढे

याही जरी जन्मात आम्हा देइल ना कोणी रडू
मी तरी सांगा अता कोठे रडू, केव्हा रडू

बोललो रडलास तूही, हरवता सीता तुझी
रडता अम्ही आम्हापुढे, टाकसी गीता तुझी?

ओशाळला ऐकून आली, सारी स्मृती त्याला पुन्हा
भगवानही मी काय सांगू, माझ्या पुढे रडला पुन्हा

आसवे आम्हीच पुसली, नयनातली आम्ही स्वये
प्रार्थुनी म्हणतो कसा, सांगू नको कोणास हे

बोललो कि व्यर्थ आहे, परमेश्वरा शंका तुझी
राखायची आहे मलाही, परमेश्वरा अब्रू तुझी

रडण्यातही सौंदर्य माझ्या, ना जरी बघते कुणी
भगवन अरे, ही शायरीही ऐकली नसती कुणी

सिद्धांत ऐसा आसवांचा, त्यालाच मी सांगितला
होता जसा युद्धात त्याने, कुंतीसुता सांगितला

बोलला, साक्षात अविध्यानाथ आम्ही पहिला
पार्थाहुनीही मूर्ख आम्ही, अद्याप नव्हता पाहिला.


कवी - भाऊसाहेब पाटणकर