सारेच हे उमाळे आधीच योजलेले
सारेच हे जिव्हाळे आधीच बेतलेले!
सांभाळतात सारे आपापली दुकाने;
माझेच हे दिवाळे काढून लोक गेले!
मी हा भिकारडा अन् माझी भिकार दु:खे;
त्यांचे हुशार अश्रू आधीच गाजलेले!
माझी जगायची आहे कुठे तयारी ?
त्यांच्या नकोत युक्त्या जे जन्मताच मेले!
माझ्या शिळ्या भुकेची उष्टी कशास चर्चा?
जे घालतात भिक्षा तेही उभे भुकेले
आता कुणाकुणाचे मी घाव आठवावे?
येतात जे दिलासे तेही उगाळलेले!
गीत - सुरेश भट
No comments:
Post a Comment