Tuesday, December 16, 2008

बाळ जातो दूर देशा

बाळ जातो दूर देशा, मन गेले वेडावून
आज सकाळपासून

हात लागेना कामाला, वृत्ती होय वेड्यावाणी
डोळ्याचे ना खळे पाणी

आज दूध जिनसा नव्या, आणा ताजा भाजीपाला
माझ्या लाडक्या लेकाला

याच्या आवडीचे चार, करू सुंदर पदार्थ
काही देऊ बरोबर

त्याचे बघा ठेवीले का, नीट बांधून सामान
काही राहिले मागून

नको जाऊ आता बाळ, कुणा बाहेर भॆटाया
किती शिणवीसी काया

वाऱ्यासारखी धावते, वेळ भराभर कशी!
गाडी थांबेल दाराशी

पत्र धाड वेळोवेळी, जप आपुल्या जीवास
नाही मायेचे माणूस

ऊंच भरारी घेऊन, घार हिंडते आकाशी
चित्त तिचे पिलापाशी

बाळा, तुझ्याकडे माझा जीव तसाच लागेल
स्वप्नी तुलाच पाहील

बाळ जातो दूर देशा; देवा, येऊन ऊमाळा
लावी पदर डोळ्याला


कवी - गोपीनाथ

No comments:

Post a Comment