Thursday, November 6, 2008

विचारीन पांढर्‍या छडीला...

ती स्वप्नाळु भिरभिरणारी नजर सापडेना
विचारीन पांढर्‍या छडीला अगर सापडेना

प्राक्तनामधे लिहिले नियतीने जे जे ते
खोडुन काढिल असा एकही रबर सापडेना

पुस्तकापरी येता-जाता मला चाळती
घालायाला परी कुणाला कव्हर सापडेना

दाखवायचे कुठुन मुलांनी विचारले तर
गोष्टीमधले आटपाट ते नगर सापडेना

शब्द विखारी असा बोलते गोड वैखरी
जरी छाटली तरी आतले जहर सापडेना

काढायची कशी जळमटे आयुष्याची
कुठे कुठे लागली शोधुनी कसर सापडेना

पुरातत्ववेद्यांनी हा निष्कर्ष काढला
"वर्णभेद उतरंडी विरहित शहर सापडेना''

लिहून झाली पुरी ग़ज़ल 'घनश्याम' जरीही
रसिकांना वाटते तरी का बहर सापडेना


कवी - घनश्याम धेंडे

No comments:

Post a Comment