Tuesday, April 29, 2008

असेच हे...

असेच हे कसेबसे
कसेतरी जगायचे,
कुठेतरी कधीतरी
असायचे... नसायचे

असेच सोससोसता
हसून हासवायचे;
असेच हासहासता
हळूच विव्हळायचे

असाच राहणार मी
जिता तुरुंग आपुला,
अशाच बाळगीन मी
सुटावयास श्रृंखला

असाच हा गिळायचा
गळ्यामधील हुंदका
कसेबसे तगायचे
धरून धीर पोरका

अशीच येथली दया
हवेत चाचपायची;
अशीच जीवनास ह्या
पुन्हा क्षमा करायची

असाच श्वास तोकडा
पुन्हा पुन्हा धरायचा
असाच जन्म फाटका
पुन्हा पुन्हा शिवायचा

असेच पेटपेटुनी
पुन्हा पुन्हा विझायचे;
हव्या हव्या क्षणासही
नको नको म्हणायचे

असेच निर्मनुष्य मी
जिथेतिथे असायचे;
मनात सूर्य वेचुनी
जनात मावळायचे

कवी - सुरेश भट

Monday, April 28, 2008

दुर्दशा

पवित्र देशा, कणखर देशा,सोन्याच्या देशा,
कशी जाहली सांग तुझी ही आज अशी दुर्दशा?
कैसे जडले तुजला देशा तीन भयंकर रोग?
पोप्युलेशन,पोल्युशन, वर करपशनाचे भोग।
राज्यकर्ते तर ह्या देशीचे बहू असती नाठाळ,
सत्तेसाठी पाहून घ्यावे त्यांचे खेळ खट्याळ।
गुंडगिरीचा प्रभाव इथे तर कायद्याचाही अभाव,
महागाईच्या विळख्यात आमुचा कसा लागावा निभाव?
विद्येच्या ह्या पाक मंदिरी काळाबाजार,
सरस्वतीच्या पुढे लक्ष्मी होई शिरजोर।
खेळाच्या मैदानी चाले सट्टाबाजार,
रणांगणीही लाजिरवाणा इथे भ्रष्टाचार।
दूष्काळ, भूकंप पूर दारिद्र हेची आंम्हाला शाप,
नोकरीतही तरूण पिढीला वशिल्याचा तो ताप।
नैतिकता अन सदाचाराने अशी बदलली कूस
कि माणूसकी नी आदर्शाचा कुठेच ना मागमूस।
एक मागणे तुजसी ईशा,बदलव ह्या देशा,
अशी उजाडो रम्य उषा अन उजळो दाही दिशा।

कवयित्री - अलका

Thursday, April 24, 2008

आपण...

काम आपले करीत जावे आपण
व्यथित कशाला उगीच व्हावे आपण?

कुणी जरी गुणगान गायले नाही;
मजेत अपुले गाणे गावे आपण...

नशिबी दुःखाचाही वाटा असतो
का नशिबाला दूषण द्यावे आपण?

इतरांसाठी कोठे आपण जगतो?
जसे करावे तसे भरावे आपण...

असेल चुकले कधी कधी कोणाचे
'त्यां'बद्दल का मत बदलावे आपण?

'अजब' जगावर प्रेम करीत जगावे
रोज मनाशी हे ठरवावे आपण...

गझलकार - अजब

Wednesday, April 23, 2008

दुनिया...

मीच वेगळा आहे की वेगळीच दुनिया?
समजत नाही मलाच की ही खुळीच दुनिया?...

नियम खरोखर किती आगळे दुनियेचे ह्या!
खरे बोलणाऱ्याला तर देते सुळीच दुनिया!...

कधी वाटते, दुनिया इतकी वाइट नाही
नासवती मोजकी इथे मंडळीच दुनिया...

डोके वर मी काढू पाहत असतो तेव्हा
तुडवत जाते मजला पायांतळीच दुनिया...

किनारे तसे दूर लोटतो नेहमीच मी
जवळ कराया जातो मी वादळीच दुनिया...

समझौता मी दुनियेशी का करतो आहे?
देऊ पाहत आहे माझा बळीच दुनिया...

असली दुनिया आवडण्याजोगी का आहे!
'अजब' नको आता मजला ही मुळीच दुनिया...


गझलकार - अजब

Tuesday, April 22, 2008

नेपथ्य

का असे निरंतर आयुष्याचे होते ?
माझेच नव्हे, हे ज्याचे त्याचे होते !

वेचता विखुरले तुकडे जगतो मरतो
हे असेच का हो स्वप्नबघ्याचे होते ?

लागते वळाया नजर सारखी मागे
तेव्हाच बारसे वार्धक्याचे होते

कुंचला कशाला दिलास तू डोळ्यांना ?
भलतेच रंगले चित्र उद्याचे होते

सोडता सुटेना मोहमार्ग माझ्याने
चोरटे प्रलोभन पण दिव्याचे होते

जर राग, लोभ अन् मोह असे स्वर्गीही

मग कशास अवडंबर पुण्याचे होते ?

वेगळा तसा पृथ्वीहुनी फार न स्वर्ग

असलेच फरक तर नेपथ्याचे होते


गझलकार -

Monday, April 21, 2008

सांज कलताना...

सांज कलताना सांज
घेतलेल्या आणाभाका...
गाव सोडून जाताना
डोळे भरलेल्या हाका..

तुझं हासणं रूसणं..
डोळा आभाळ झेलणं..
भिरभिऱ्या डोळ्यांनी गं
जिन्यातलं येणं जाणं...
रोज पायरीत चुके
माझ्या काळजाचा ठोका.

तुझ्या जाण्यानं उदास...
तुझ्या साऱ्या आठवणी...
आज पाणवठ्यावर
नाही हिंदळलं पाणी..
झुले एकटाच झुले
आमराईतला झोका..

तुझ्या दारात मांडव...
झुले आभाळी तोरण...
तुझं हळदीचं अंग...
माझं बांधलं सरण...
आसवांत वाहिल्या मी
साऱ्या साऱ्या आणाभाका...

सांज कलताना सांज
घेतलेल्या आणाभाका...

Friday, April 18, 2008

मनात माझ्या तुझीच गीते लिहून गेलो...

आता उराशी कसा धरावा किरण तरी मी
दिशादिशांचा प्रकाश मोठा बनून गेलो..
तुझ्याविना मी मुकाच येथे थिजून गेलो
मनात माझ्या तुझीच गीते लिहून गेलो...

मलाच कळते नसेच ही वाट ओळखीची ...
तरी कशी पावलांस या ओढ लागलेली?
पुन्हा पुन्हा मी इथेच येतो तुझ्याच दारी..
असाच चकवा मला तरी का छळून गेला?

कशास बांधू उगाच त्या आठवांस आता?
तयास शब्दात मोकळे मी करुन गेलो..
असाच यावा भरून डोळा कधी ढगाचा..
तसाच मीही कधी अवेळी झरून गेलो...

कुणी तुझे नाव घेतले अन् उदास झालो ..
जरी किनारे कितीक आले पुढ्यात माझ्या
तरी तयां डावलून मी का निघून आलो?
मनात माझ्या तुझीच गीते लिहून गेलो...


कवी - रंजन

Thursday, April 17, 2008

दरवळ

कुणास कळते ह्रदयाची कळ
अपुले आपण असतो केवळ.

असे कसे हे अपुले नाते...
मला घाव अन् तुला कसे वळ?

कुठून आणू उसने मागुन
पुन्हा पुन्हा मी जगण्याचे बळ.

कितीक द्यावी स्पष्टीकरणे...
कितीक आपण काढावा पळ ?

तुला भेटुनी खरेच पटले ....
उगीच नव्हती माझी तळमळ .

तुला बिलगुनी आला वारा
इथे अचानक सुटला दरवळ!


गझलकार - अमोल शिरसाट.

Wednesday, April 16, 2008

कातरवेळी

हळूच ये स्वप्नी माझ्या कधीतरी कातरवेळी
तुझ्या वियोगाच्या उठती कळा उरी कातरवेळी

नकोस रे कालिंदीच्या तटी करू छेडाछेडी
कशी प्रवेशू ओलेती पतीघरी कातरवेळी

नकोस तू पावा छेडू घरापुढे सायंकाळी
थरारते देहामधली निशाचरी कातरवेळी

कधी कटीशी झोंबे ती, कधी दिसे बाहूपाशी
अधर तुझे चुंबी वेणू निलाजरी कातरवेळी

असे उंबऱ्याचे कुंपण, करात या हिरव्या बेड्या
तरी जारकर्माच्या मी शिवेवरी कातरवेळी

कळे तुझ्या छळण्यामधली अवीट मज गोडी तेव्हा
छळे तुझे नसणे जेव्हा परोपरी कातरवेळी

तृषार्त माती गंधाळे, बने मृण्मयी मृद्गंधा
(पडूनिया गेल्या गाली पुन्हा सरी कातरवेळी...)


कवयित्री -

Tuesday, April 15, 2008

पहारा

तुला पाहिजे तसे वाग तू
भल्या बुऱ्याला लाव आग तू

उगाच खोटी भीड कशाला
हक्क आपला तिला माग तू

कुठे अचानक गायब झाले
त्या सत्याचा काढ माग तू

जमेल जेथे मैत्र जिवाचे
तिथे फुलांची लाव बाग तू

मनात नाही त्याच्या काही
नकोस त्याचा धरू राग तू

अजून नाही रात्र संपली
सक्त पहारा देत जाग तू


गझलकार - डॉ. श्रीकृष्ण राऊत
('कविता-रती' दिवाळी अंक २००६)

Monday, April 14, 2008

चुकलेच माझे

मी कशाला जन्मलो? - चुकलेच माझे
ह्या जगाशी भांडलो! - चुकलेच माझे

मान्यही केलेस तू आरोप सारे,
मीच तेव्हा लाजलो! - चुकलेच माझे

सांग आता, ती तुझी का हाक होती?
मी खुळा भांबावलो! - चुकलेच माझे

भोवतीचे चेहरे सुतकीच होते,
एकटा मी हासलो - चुकलेच माझे

चालताना ओळखीचे दार आले..
मी जरासा थांबलो! - चुकलेच माझे

पाहिजे पूजेस त्यांना प्रेत माझे!
मी जगाया लागलो! - चुकलेच माझे

वाट माझ्या चार शब्दांचीच होती..
मी न काही बोललो! - चुकलेच माझे

गझलकार - सुरेश भट

Friday, April 11, 2008

मी रोज निराळी कुठून आणू गाणी?

घर हपीस यांतच घालित घालित फेऱ्या
हार्मॉनिक हलते जीवन मागे पुढे
ही धाव पहाया माझी केविलवाणी
हे खो खो चे दोन खांब तेवढे

अनुकूलन हे ना, ही तर करडी कारा
आत कोंडले गेलो सगळे हमाल
या सुटाबुटातून भरली नोकरशाही
ओझ्याचे आम्ही ठरलो केवळ बैल

या वाटेवरुनी रोज ओढता गाडे
चिमटीत वाटते नभास आता धरू
आभास सुखाचे कर्जाळुन जाताना
ते उडून जाते इवले फुलपाखरू

हा खाटिकखाना काव्य इथे ना शोभे
ही साहित्याची इथे न वटती नाणी
चर्कातुन इथल्या पिळुन रोज निघताना
मी रोज निराळी कुठून आणू गाणी?

कवयीत्री -

Thursday, April 10, 2008

शुभेच्छा

हा प्रश्न एकदाचा लावा धसास राजे
टांगून ठेवलेले त्याला कशास राजे

छातीवरील जागी कोटात छान दिसती
फेकू नका फुलांना घेऊन वास राजे

सांगू किती नवाई ह्या धूर्त कावळ्यांची
ताटामधून नेती काढून घास राजे

सेतू तसा नवा, पण हा कोसळेल केव्हा
याचा अचूक पक्का बांधा कयास राजे

जेवण नसेल तर मग सांगा खुशाल चुटके
जनता सभेत बसली आहे उदास राजे

दुष्काळग्रस्त गावे देतात ह्या शुभेच्छा
होवो सदा सुखाचा तुमचा प्रवास राजे

गज़लकार -

Wednesday, April 9, 2008

एक थेंब ...

एक थेंब .... पानावर सजलेला..
हिरवाईच्या रंगात हिरवळलेला..

एक थेंब .. अमृतवेलावर लटकलेला,
धरती चुंबनाच्या प्रतीक्षेत तहानलेला..

एक थेंब .. कमळाच्या देठावर आधारलेला,
ओघळण्यासाठी मग लय कशाला हवीये त्याला..

एक थेंब ... तळ्यातल्या थेंबाबरोबर मिसळलेला,
आपणच तळे झालो या आनंदाने भारावलेला..

एक थेंब .. वार्‍यात उंच झेपावलेला,
गारव्याच्या शहारा मग त्याने सर्वत्र पांघरलेला..

एक थेंब ... थेंबाथेंबातून बरसलेला,
शिस्तीच आहारी मग सरींच्या मर्यादेत सांडलेला..

एक थेंब ... परिश्रमाच्या घामातला,
जिंकण्याची उमेद बाळगलेला..

एक थेंब... कळीच्या गाभार्‍यातला,
समांगाने फुलात उमलवून गेला..

एक थेंब.. ओठांच्या पाकळीतला,
गुलाबी नाजूक ओठांशी संवादलेला...

अन एक थेंब अखेर... आठवणीच्या स्पंदनातला,
ओल्या पापण्या अन ओल्या कडांतून मना ओलावलेला..

कवी - आदित्य