Thursday, March 27, 2008

कोण जाणे कोण हे जवळून गेले?

कोण जाणे कोण हे जवळून गेले?
चांदणे रक्तामध्ये मिसळून गेले!

जिंकला होता जरी मी डाव तेव्हा,
दान जे पडले मला उधळून गेले!

भेटण्यासाठी कुणी आलेच नाही...
लोक आलेले मला चघळून गेले!

हे खरे की, मी जरा चुकलोच तेव्हा,
लोकही वाटेल ते बरळून गेले!

लागली चाहूल एकांती कुणाची?
कोण माझ्या लोचनी तरळून गेले?

काय माझ्या मालकीचे अर्थ होते?
शब्द माझे भाबडे हुरळून गेले!

या दुपारी मी कुणाला हाक मारु?
ओळखीचे चेहरे वितळून गेले!

कोणता कैदी इथे कैदेत आहे?
रंग भिंतींचे कसे उजळून गेले!

पाठमोरा मी जरी झालो,तरीही
सूर्य येणारे मला कवळून गेले!


गझलकार - सुरेश भट

Wednesday, March 26, 2008

इथे न कोणी

तुझ्यासारखे , तुझ्याप्रमाणे इथे न कोणी
तुझे आमच्यापरी दिवाणे इथे न कोणी


दुरावा नको, नकोच आता सलज्ज सबबी
पुरे, लाडके, तुझे बहाणे, इथे न कोणी

असे औटकाळ यौवनाची मिरासदारी
वसंतात का उगी रहाणे ? इथे न कोणी !

नवा खेळ हा, नवीन अनुभव मिळून घेऊ
मध्ये रोखण्या जुने-पुराणे इथे न कोणी

फुलू देत बेलगाम ज्वाळा तनामनाच्या
पुरे धुमसणे, विझून जाणे, इथे न कोणी !

निशा घालवू नकोस तू बोलण्यात वाया
किती घ्यायचे तरी उखाणे, इथे न कोणी !

बघायास तुज निरभ्र झाले अधीर डोळे
कशाला असे सचैल न्हाणे, इथे न कोणी


Tuesday, March 25, 2008

सुडोकू

रिते हे रकाने भरावे कसे?
सुखाचे सुडोकू सुटावे कसे?

इथे हा असा अन तिथे तो तसा
कुठे कोण हे ओळखावे कसे?

ठरावीक जागा हरेकास हे
खुळ्या आकड्यांना कळावे कसे!

रकान्यांत काही कुणी ना बसे
मनी आकड्यांच्या दुरावे कसे?

छुपे आकडे हे दिसू लागता
असे लेखणीने रुसावे कसे!

जरी आकड्यांनी उतू चौकटी
मनी शून्य माझ्या उरावे कसे

अनंतास जाण्या, नको चौकटी
'प्रसादा' तुला हे कळावे कसे!


Wednesday, March 19, 2008

आजही

पेटली ह्रदयात होळी आजही
घेरुनी आली उदासी आजही

कोणत्या जन्मातला संबंध हा
बांधला जातो तुझ्याशी आजही

मी कितीसा वागलो तेंव्हा खरे
चाचणी घेतो मनाची आजही

जन्मलो होतो इथे केंव्हातरी
चालली आहे भ्रमंती आजही

आजही बघतात स्वप्ने तारका
रंगते हातात मेंदी आजही.....

कवी - अनंत ढवळे

Tuesday, March 18, 2008

एकटाच मी

नाही कुणीच आसपास...एकटाच मी !
वाटे किती किती उदास...एकटाच मी !

मागे-पुढे कुणी न सोबतीसही कुणी...
माझा सुना सुना प्रवास...एकटाच मी !

माझी कुठेतरी असेल सावली इथे...
शोधा, करा करा तपास...एकटाच मी !!

माझ्या मनात बाग एक रोज बहरते...
हे माळरान...अन् भकास एकटाच मी !

माझ्याच आठवांत दंग दंग मी असा...
माझेच सोबतीस भास...एकटाच मी !

होतो भ्रमात... मी नसेन एकटा कधी -
झाला अता पुरा निरास...एकटाच मी !

येऊ नका कुणीच भेटण्यासही मला...
देऊ नका उगीच त्रास...एकटाच मी !

नाही मला कुणीच सोबती-सवंगडी
आहे तुझा खरा कयास...एकटाच मी !

नाही कधीच त्या फुलास मी विचारले...
देशील का मला सुवास...एकटाच मी !

कवी - प्रदीप कुलकर्णी

Monday, March 17, 2008

आनंदाने

हसता-हसता सरून जावे आनंदाने
मागे केवळ उरून जावे आनंदाने

डोळ्यांमधले सर्व चेहरे जिवंत व्हावे
अकस्मात घर भरून जावे आनंदाने

जिथे जिथे जाशील तू तुझ्या मागेमागे
बोट सुखाचे धरून जावे आनंदाने

पुन्हा मनाने अवखळ पोरासमान व्हावे
घरात यावे, घरून जावे आनंदाने

घरास जेव्हा पाय लावणे अशक्य व्हावे
नुसते दारावरून जावे आनंदाने

मिळालीच तर अशी देखणी व्यथा मिळावी
जिला पाहुनी झुरून जावे आनंदाने

सल कुठलाही जपून कोणा स्मरण्यापेक्षा
हेच बरे विस्मरून जावे आनंदाने

दोन घडींच्या भेटीसाठी यावे आणिक
जन्मासाठी ठरून जावे आनंदाने

जाण्याची घटका आली की अवतीभवती
जिवलग गोळा करून जावे आनंदाने

कवी - चित्तरंजन भट

Friday, March 14, 2008

एकदा आहे तुला भेटायचे

एकदा आहे तुला भेटायचे
खूप काही राहिले बोलायचे

दूर असताना मला छळतात हे
नाव भासांचे तुला सांगायचे

हे पहाटेच्या दवाला सांग तू
आज स्पर्शाने तुझ्या उमलायचे

बासरीचे सूर तू छेडू नको
थांबणे माझे पुन्हा लांबायचे

कोणती भाषा तुझ्या डोळ्यात ही
पाश शब्दांचे कसे उधळायचे

दोन घटकेचीच होती साथ ती
का मला आजन्म तू अठवायचे

दूर जाता आसवे डोळ्यात का
हे तुला नाही कधी समजायचे

आठवांच्या कोंडमाऱ्यातून या
श्वास घेणे हे मला विसरायचे

एकदा मी ही असे खेळेन रे
जीवना आहे तुला हरवायचे

वाट आहे पाहते कोणी तुझी
हे तुला मरणा कसे उमजायचे

बोलवाया एकदा येईल तो
सोडुनी हा खेळ मागे जायचे

कवी - विश्वास

Thursday, March 13, 2008

नाही आज सुचत काही

झाले आहे काय कळेना...नाही आज सुचत काही !
पाणी डोळ्यांतील खळेना...नाही आज सुचत काही !

वाटेना वाईट कशाचे.. होई दुःख न कसलेही ...
थोडेही का रक्त जळेना...नाही आज सुचत काही !

आयुष्याने रोज छळावे...याची खूप सवय होती...
तेही बेटे आज छळेना...नाही आज सुचत काही !!

दारोदारी घालवला, जो आला तो दिवस, परंतू -
बेचैनीची रात्र ढळेना...नाही आज सुचत काही !

कोठेही का जीव रमेना....कोठे का मज करमेना ?
ही एकाकी वेळ टळेना...नाही आज सुचत काही !

हाकांचा कोलाहल आता झाला फारच भवताली...
माघारी कोणीच वळेना...नाही आज सुचत काही !

अंधारी ही वाट किती मी चालू...पायच उचलेना -
का माझा रस्ता उजळेना...नाही आज सुचत काही !

गेलो होतो दूर परंतू आलो आज परत य़ेथे...
मी कोठे का दूर पळेना...नाही आज सुचत काही !

ज्ञानेशाच्या शब्दकळेचे व्हावे वारस ...पण साधी -
- ही शब्दांची भिंत चळेना...नाही आज सुचत काही !!

कवी - प्रदीप कुलकर्णी

Wednesday, March 12, 2008

जिथल्या तिथेच सारे

येती विचार, जाती विचार...जिथल्या तिथेच सारे !
मेंदू बधीर, मन थंडगार...जिथल्या तिथेच सारे !

हेही करीन, तेही करीन, म्हणतो मनोमनी मी...
स्वप्नेच फक्त माझी हजार...जिथल्या तिथेच सारे !

मज डावलून, संधी हसून गेली अनेक वेळा...
मीही कधीच नव्हतो तयार...जिथल्या तिथेच सारे !

होईन शूर, जाईन दूर, ठरले कितीकितीदा...
माझे मलाच उघडे न दार...जिथल्या तिथेच सारे !

ठरवून भेट, केव्हा न थेट झाली तुझी नि माझी...
भेटीवरून चर्चाच फार...जिथल्या तिथेच सारे !

डोळे मिटून, गेली निघून काळापल्याड आई...
ती वेळ, काळ, तारीख, वार...जिथल्या तिथेच सारे...!!

हा व्यर्थ खेळ, साराच वेळ गेला असाच वाया...
झाली न जीत, झाली न हार...जिथल्या तिथेच सारे !

नुसताच गर्व, बदलून सर्व म्हणतोस टाकले तू...
माऱू नकोस बाताच यार...जिथल्या तिथेच सारे !

नाही अजून, नाही अजून देहापल्याड गेलो...
माझे विचार, माझे विकार...जिथल्या तिथेच सारे !

तो यामुळेच, जिथल्या तिथेच थांबून राहिलेला...
दुसऱ्यांवरीच त्याची मदार...जिथल्या तिथेच सारे !

वाटेल हेच, राहो असेच...पण राहणार नाही -
- ती वाट, ती नदी, झाड, पार...जिथल्या तिथेच सारे!



गझलकार - प्रदीप कुलकर्णी

Tuesday, March 11, 2008

पांढरपेशी कविता

क्षितीज खादी कुरतडताना इमारतींच्या गच्च्या
फिरते वणवण ऊन खडीच्या रस्त्यांवरती कच्च्या

मिचमिचणारा प्रकाश शहरी जागा चोवीस तास
खिडकीमधल्या चंद्रालाही चाळीशीचा त्रास

गंधभारला धूर झिरपतो हवेत जर्जर ओल्या
मेंदू बुरसट, हृदये कोंदट हवेशीर पण खोल्या

गणती नाही किती चिरडली झुरळे पायाखाली
दरवाज्याच्या फटीत मेल्या असतील लाखो पाली

चादर गुधडत लोळत पडली कळकट मळकट गादी
फुटक्या फरश्या मोजत बसली चामखिळींची लादी

शौचकूपांच्यासभोती फुलल्या उठवळ बागा
कुंपणही मागत आहे त्याच्या हक्काची जागा

जुनाट खुर्ची दुवे सांगते गतकाळाचे काही
आजकालच्या प्लायवूडची ती पुण्याई नाही!

दर्प सांगती अभिमानाने उच्छ्वासांच्या जाती
श्वासांशी मेकडे जोडती स्वच्छ सुसंस्कृत नाती

करपट ढेकर येता - येतो चार शिव्यांचा खलिता
नको! नको ही त्यात आणखी पांढरपेशी कविता!


कवी - नीलहंस

Monday, March 10, 2008

मी खिन्न गीत गाता...

मी खिन्न गीत गाता त्या कोण रोधिताहे?
आता मना कळे की आनंद येत आहे

मी व्यर्थ या विराण्या छेडीत,गात आलो
चित्तातल्या झर्‍याचा उलटा स्वभाव आहे

या कातळामधूनी, गर्भातूनी मनाच्या
आनंद अमृताचा वर्षाव होत आहे

सृष्टीच मोर झाली, उत्फुल्ल हे पिसारे
डोळे मिटून घेणे हे पाप होत आहे

वारा फिरे सुखाचा अन् चांदणे दिगंती
'मी या जगात आहे', हे हेच सौख्य आहे


कवी - मा. शंकर वैद्य

Friday, March 7, 2008

तमाशा

एकटेपण मागता का?
अन स्वतःला टाळता का?

हरवलेला सूर्य शोधा
चांदण्या कुरवाळता का?

"झूठ आहे सर्वकाही"
झूठ हेही मानता का?

मार्ग चुकला! व्यर्थ आता
या दिव्याला राखता का?

जा बघ्यांनो, हा तमाशा -
संपला; रेंगाळता का?

कवी -

Thursday, March 6, 2008

निळसर झाले अंग

मज श्यामसुंदरा, तुझा लागला रंग !
गोरेपण गेले निळसर झाले अंग !

ऐकते जसा मी तव मुरलीचा सूर
दाटते अंतरी निळे निळे काहूर
तू समीप माझ्या...जरी कितीही दूर
विसरुनी स्वतःला तुझ्यात होते दंग !

मी जिथे जिथे, तू तिथे तिथे असतोस...
मजकडे पाहुनी मंद मंद हसतोस...
तू कालिंदीच्या जळातही दिसतोस..
उठतात मनावर निळे निळेच तरंग !

स्वप्नात खुणावे मला निळे आकाश
वेढिती तुझे मज निळे निळे करपाश
ये, ये घनश्यामा, अता नको अवकाश...
ये सार्थ कराया नाव तुझे श्रीरंग !

तू अजून माझा जरी कुणी नाहीस...
हा जीव परी तुजसाठी कासावीस !
मी तुला वाहिले मनमोराचे पीस...
दे तुझा एकदा निळा निळा मज संग !

कवी - प्रदीप कुलकर्णी

Wednesday, March 5, 2008

प्रश्न ऐसे..

प्रश्न ऐसे जीवनाने फेकले
पुस्तकांनी हात पुरते टेकले

चांदण्याचे अन फुलांचे मामले
त्यातही कां हात माझे शेकले?

पाहुनी आसू तुझे, कळले मला
यापुढे आसू न माझे एकले

"काजव्यांना लाभली सत्ता कशी?"
हारलेले 'सूर्य' रडले, भेकले

गायली बेसूर जेंव्हा माणसे
गर्दभांनी सूर सच्चे रेकले

कवी - जयंत

Tuesday, March 4, 2008

डिजीटल दु:ख..

मी इश्यूंसवे ती रात्र जेव्हा जागली,
मला माझीच कीव याया लागली ।


दु:खे किती डीजीटल नाना परीची,
आयटीत मज भोगाया लागली ।

किती मी त्या लेट्नाईट्स मारल्या,
ती मला ‘ उल्लु ‘ म्हणाया लागली ।

जमले कधी मला न वेळ पाळणे,
बायको लग्नाआधी वैतागली ।

सेन्ड रिसीव्ह करून थकले हात माझे,
सॅलरीची मेल का रागावली ।

पुन्हा पडले स्वप्न जॉब सोडण्याचे,
पुन्हा ती सी.व्ही. बघाया लागली ।

नियतीचा कोड सारा गंडलेला,
नशीबी एरर दिसाया लागली ।

विसरले ते ओठ मुग्ध हासणे,
स्माईली खोटी हसाया लागली ।

मी विसरलो भाषा सर्व बोलण्याच्या,
मित्रहो मज ‘जावा’ कळाया लागली ।

सवय झाली रोज आता जागण्याची ,
दुपारी मज झोप याया लागली ।

इश्यूंमुळे बॉस पुन्हा भडकला,
शिव्यांची मग तोफ त्याने डागली ।

ले ऑफ ची पुन्हा पसरली अफवा,
मंडळी ऍसेंट चाळाया लागली ।

झाडले चारचौघांत जेव्हा बॉसने,
कंपनी मज ओळखाया लागली ।

सॅलरीची फिगर उमगली जेव्हा,
ती रोज माझ्याशी हसाया लागली ।

एवढी दु;खे पचवली मी ‘मुक्या’ने,
पण आयटी मज जड जाया लागली ।


कवी -