अशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.
कविता शोध
आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/
Friday, February 29, 2008
काही असे घडावे...
नजरेस तू पडावे
स्वप्नात शोधिले ते
सत्यात कां दडावे?
वैरीहि तो असा की
मन ज्यावरी जडावे
मी मागता फुले,कां
सारे बहर झडावे?
मी कोण,काय होतो
की मज कुणी रडावे?
कवी - जयंत
Thursday, February 28, 2008
पानगळ
शोधू कोठे खरे सूर ते कळेना
आज्ञाधारक कधी शब्द दास होते
प्रतिभा त्यांची आता बटिक पाहवेना
आधी हुंकारही शब्दरूप होई
आता शब्दांतही अर्थ आढळेना
झाली कविता जसे डोह मृगजळाचे
जीवन आभासमय प्यावया मिळेना
अर्थानर्थातला काव्यप्रांत धूसर
शब्दारण्यातुनी मार्ग सापडेना
अमुच्या ह्या मैफिली काव्यकाजव्यांच्या
अंधाऱ्या अंतरी ज्योत पोहचेना
नाही आक्रोश ना भावचित्र हळवे
आहे कारागिरी, सत्य हे लपेना
कवितेचा बाज अन् साज ल्यायलेल्या
ओळी वारांगना ज्या हृदी वसेना
तावांची पानगळ 'भृंग' फार झाली
सरला लेखनबहर परतुनी फिरेना
कवी - मिलिंद फ़णसे
Wednesday, February 27, 2008
गोप-नीय प्रेमाचे सुनीत
जेथे टाकिन पाय मी, मज तिथे वेढा मुलींचा असे!
टाळ्या मागत, देत कोपरखळ्या वा गालगुच्चे तसे
वाटे, 'एकच भाव हा; पण किती शैलीमधे अंतर!'
भेटे चोरुन एक आणि दुसरी ओढून नेई घरी,
बोले पाच फुटांवरुन तिसरी, चौथी बसे खेटुनी,
गप्पा मारि कुणी निरर्थक, करी गंभीर चर्चा कुणी,
कोणी सोज्वळ, वा 'तयार' कुणि, ही आगाउ, ती लाजरी!
गट्टी मात्र करायला मजसवे प्रत्येक ती आतुर!
ऐश्या प्रेमळ घोळक्यास बघुनी जो ही करी चौकशी,
"साल्या, तू तर गोकुळात असशी! लाडू कधी वाटशी?"
प्रेमाचा दिसतो न त्यास वरुनी, हा 'गोपनीय' स्तर --
कोणा मी किति 'गोकुळात' दिसलो, ही बोच आहे मनी,
जी ती 'गोपि'च भेटते, न दिसते कोठे कुणी 'रुक्मिणी' !!
कवी - महेश
Tuesday, February 26, 2008
वणवा
जीव पाषाणावरी मी लावतो आहे
होय, सर्वांशी जरी ती बोलते हसुनी
स्वर्ग सूताने तरीही गाठतो आहे
तीच फुंकर घालते अन् तीच मग पुसते
"रात्रभर वणवा कशाने पेटतो आहे?"
वाहते निष्ठाफुले चरणी दुज्याच्या ती
अन् उरी निर्माल्य मी कवटाळतो आहे
व्यसन दु:खाचे मला आहे असे जडले
भंगण्यासाठीच हृदया सांधतो आहे
काय त्या हृदयास जपणे ती जिथे नाही?
रिक्त गाभारा जणू सांभाळतो आहे
मार्ग जेव्हा वेगळे झालेत दोघांचे
पारिजाताचा सडा का सांडतो आहे?
कोरडे डोळे निरोपाच्या जरी वेळी
चेहऱ्याला मेघ पण आच्छादतो आहे
गजलकार - मिलिंद फणसे
Monday, February 25, 2008
चहाडीपुराण
येईल तुम्हा नवद्रुष्टी । स्मरून नारदाला ॥ ध्रु ॥
सावज हेरावे बरोबर । आहे जे खरोखर ॥
साधे दिसते वरवर । पाहुनि सत्वर ॥ १ ॥
नजर असावी त्याच्यावर । लक्ष असावे खालीवर ॥
करतो जे भरभर । टिपावे नजरेने ॥ २ ॥
एखादा शब्द ऐकावा । शत्रू त्याचा जाणावा ॥
सोडुनी द्यावी ठिणगी । लबाडाची ॥ ३ ॥
बघा आता ठिणगीची मजा । करता करता देवपूजा ॥
सांगावी ही कथा दुजा । चविष्ट शब्दांनी ॥ ५ ॥
तुमचे नाव येता ( त्यांच्या ) ओठा ॥ लागलीच तेथुनी फुटा ॥
बसेल कमरेत सोटा । जबरदस्त ॥ ६ ॥
अंगावर जर आले संकट । परिस्थिती असेल बिकट ॥
तयारी ठेवा जाण्याची । दवाखान्यात ॥ ७ ॥
अपयशाला घाबरू नका । घेतला वसा टाकू नका ॥
मजा नक्की येईल । चहाडी करण्याची ॥ ८ ॥
सोडुनी द्या हातचे कर्म । मंजूर असेल माझा धर्म ॥
लागा कामाला लगेच । नारद म्हणे ॥ ९ ॥
कवी - राजगुडे
Friday, February 22, 2008
व्यक्तिनिरपेक्ष प्रेमाचे सुनीत
नक्की कोण तिच्या मनांत भरले होते, कुणा ना कळे!
होते 'इच्छुक' सर्व आंतुन, तरी जो तो दुज्याला पिळे!!
बोले 'सूचक काही' काल परि ती, अन् 'तो' निघे 'मी'च की!
सारे टाकत जीव हो तिजवरी माझ्याप्रमाणे जिथे,
गेली माझीच 'मूक साद' तिजला ऐकू कशी काय ती?
हे धागे गतजन्मिचे, कि मटका, की काही टेलीपथी?
साला हे मिळणे घबाड - नसता ध्यानीमनी काही ते!!
होतो आम्ही महारथी अतिरथी सारेच कंपूमधे,
सारे एकुलते, बरे मिळवते, सद्वर्तनी, देखणे!
ऐशांतून तिने मलाच वरीले?! वा! धन्य झाले जिणे!
"ए, तारा अपुल्या कश्या ग जुळल्या?" - मी बोलता ती वदे --
"ऐसी क्वालिफिकेशने जवळ, तो चाले 'कुणीही' मला
'अल्फाबेटिकली' बघून, पहिला प्रस्ताव केला तुला!!"
कवी - महेश
Thursday, February 21, 2008
अभंगाचे भाषांतर
करावया गेला। भाषांतर॥
अभंग तुक्याचे । करी विंग्रजीत।
दूध पीतपीत । वाघिणीचे ॥
तुका म्हणे आता। रहावे उगीच।
पहावी बरीच । मजा त्याची॥
इवल्या मुंगीची । होते आता ऍन्ट ।
झाली अंडरपॅन्ट । लंगोटीची ॥
झाला हा नाठाळ। कोण विदुषक?।
"ब्रिंग मी अ स्टिक"। तुका सेज ॥
कवी - विसुनाना
Wednesday, February 20, 2008
विसरली तर नसशील ना मला?
तु माझ्या इतकी जवळ आलीस,
जाता जाता मनात माझ्या
घर करुन गेलीस.........
घरामध्ये आता या,
कोणीच राहत नाही,
खिडकीतून खुणावणाऱ्या आठवणी
हल्ली मी देखील पाहत नाही........
प्रेमा मध्ये काय ओलावा
कमी होता मझ्या?
की, मनातला दुश्काळ
लांबला होता तुझ्या?
जाता जाता म्हणालीस
विसरुन जा मला,
मनं मात्र माझ विचारतं
कुठे ठेवु तुझ्या वेड्या प्रेमाला?
जपून ठेवलयं मी ते प्रेम
भेटलीस की देइन तुला......
भीती मात्र वाटते खरच
विसरली तर नसशील ना मला????
कवी - नचिकेत
Tuesday, February 19, 2008
दुकान
शायर जगात दुसरा माझ्या समान नाही.
चोरून रोज खातो उर्दू मधील लोणी;
सायीवरी मराठी माझे इमान नाही.
गेली हयात सारी वाया तुझी गड्या रे;
तू एक वाचलेला माझा दिवान नाही.
आश्चर्य हे मला की झाली न ‘अहम’बाधा;
माझ्याशिवाय आता कोणी महान नाही!
तू देणगी दिली ना जाहीर वा छुपीही;
वेड्या तुला कधीही मिळणार मान नाही.
त्यांचा बुडेल धंदा विकती न जे स्वत:ला;
तोट्यात चालणारे माझे दुकान नाही.
गझलकार - डॉ. श्रीकृष्ण राऊत
Monday, February 18, 2008
सत्यशोधन
डोळ्यात रंगलेला रजनीविलास आहे
दारात कल्पनांच्या असलो जरी भिकारी
शब्दांत मात्र माझी मोठी मिजास आहे
येथेच रोषणाई भोगून घे, नटा, तू
पडताच काळपडदा अज्ञातवास आहे
बोले इमान जैसे फटकार आसुडाचे
विश्वासघातक्यांची वाणी मिठास आहे
बांधावयास तिरडी जमली अलॊट गर्दी
हर एक मित्र त्याचा मुडदेफरास आहे
कवनात रंग माझ्या शोधू नका गुलाबी
हा सत्यशोधनाचा माझा प्रवास आहे
होते अनेक शत्रू जेव्हा जिवंत होता
आता अजातशत्रू, मयता, प्रवास आहे
येईल लेखणीला केव्हा तरी सफाई
इतकाच वर मला दे, इतकीच आस आहे
गज़लकार - मिलिंद फ़णसे
Friday, February 15, 2008
शून्य
गाडा विश्वाचा फिरतो
व्यास शून्याचा घेऊन
शून्य शून्य गिरवतो
नाही आदि नाही अंत
एक क्रम एक लय
मार्ग आखीव सरळ
चाले प्रकाश वलय
शून्य काल, अवकाश
शून्य क्षितिज,आकाश
शून्य सृजन साजिरे
शून्य रोकडा विनाश
शून्यातून जन्म घेती
शून्याकृती बुडबुडे
त्यांची शून्य सुख दुःखे
आणि शून्याची झापडे
शून्य जन्मते वाढते
मांड शून्याचा मांडते
शून्यातून शून्याचाच
शून्य अर्थही काढते
शून्य कर्म शून्य भोग
शून्य शून्याचे नशीब
शून्य पुण्य शून्य पाप
सारा शून्याचा हिशोब
शून्यातून शून्य जाता
मागे शून्यच राहील
शून्य होते शून्य आहे
पुढे शून्यच राहील
मूळ अमूर्त तत्त्वाला
कोण भेदून जाईल?
शून्य शून्याचा परीघ
कसे छेदून जाईल?
कवयित्री - अदिती
Thursday, February 14, 2008
प्रेमात पडलं की असच होणार !
स्वप्नात सुध्धा आपल्या तिच व्यापुन उरणार
येता जाता उठता बसता,
फक्त तिचीच आठवण होणार
तुमच काय, माझं काय,
प्रेमात पडलं की असच होणार ...
डोळ्यात तिच्या आपल्याला स्वप्नं नवी दिसणार,
तिच्या हास्यातुन आपल्यासाठी चांदणे सांडणार,
ऐश्वर्याचा चेहरा सुध्धा मग
तिच्यापुढे फिका वाटणार!
तुमच काय, माझं काय,
प्रेमात पडलं की असच होणार ...
तिच्या फोनची आपण दिवसभर वाट पाहणार,
मित्रांसमोर मात्र बेफिकीरी दाखवणार
न राहवुन शेवटी आपणच फोन लावणार
तुमच काय, माझं काय,
प्रेमात पडलं की असच होणार ...
Messages नि तिच्या Inbox आपला भरुन जाणार,
तिचा साधा Message पण आपण जपुन ठेवणार
प्रत्येक Senti Message पहिला तिलाच Forward होणार,
तुमच काय, माझं काय,
प्रेमात पडलं की असच होणार ... प्रेमात पडलं की असच होणार ...
Wednesday, February 13, 2008
आभार
ह्या दगडाला शिल्प बनवल्याबद्दल आभार
जागा राहीलो म्हणून मी नवी कामे करु शकलो
निद्रे आजही तू न आल्याबद्दल आभार
जुनी जखम सुकली म्हणून नव्याला जागा मिळाली
नवीचे स्वागत आणिक जुन्याबद्दल आभार
तुम्ही नसता आलात मधे, मी पाय-याच बनवल्या नसत्या
भिंतीनो, माझ्या रस्त्यात आडवे आल्याबद्दल आभार
अश्रूंप्रमाणे आईच्या कुशीत जाऊन शिरलो
मला तुझ्या नजरेतून ऊतरवल्याबद्दल आभार
आता वाटू लागलय हे सगळं जगच माझ घर
माझ्या घरात अशी आग लावल्याबद्दल आभार
दु:खात बुडाल्यावर मग आणखी बहरते कविता
असे असेल तर सर्व जगाचे त्याबद्दल आभार
आता मला चांगलीच येते मनधरणीची कला
`कुँअर' असे माझ्यावर रुसण्याबद्दल आभार
[कुँअर बेचैन यांच्या अप्रतिम गझलेचा मी जमेल तसा केलेला अनुवाद]
Tuesday, February 12, 2008
आंधळा मागतो एक डोळा, आणि देव देतो गॉगल !
'देव' हा इसम बहुतेक भारतीय असावा !
गार्हाणी नेऊन त्याच्या दारी
मारे आपण हाकाट्या पिटतोय
तक्रारीची खिडकी बंद करून
तो आत चकाट्या पिटतोय !
'प्रोजेक्ट विश्व' पेलायची लायकी
ह्याचाच शेवटी प्रश्न उरतो
देवाच्या 'वर' कुणीच नाही तर,
त्याचे 'अप्रेजल' कोण करतो ?
हे विश्व म्हणजे काय 'पीमटी' आहे ?
की कुणीही भाड्याने चालवावी !
देवाच्या हातात किल्ल्या देऊन ,
आपण आपली लाज का घालवावी ?
अश्या गोष्टी 'आऊटसोर्स' करून,
कधीच फळ मिळत नाही..
आता बसा बोंबलत, देवाला
आपला ऍक्सेंट कळत नाही !
काही देवमाणसांकडून तो
थोडी माणूसकी घेईल काय ?
विश्वविधाता वगैरे राहू देत
साधा माणूस तरी होईल काय ?
त्याच्यावर ठेवू विश्वास, पण
त्याचा आपल्यावर बसेल काय ?
'गॉड अट वर्क' ही पाटी
स्वर्गात तरी दिसेल काय ?
देवांचे देवांसाठीचे ते राज्य
तीच तर त्याची लोकशाही !
वरवर लोकांसाठी सर्व अवतार
पण तो मूळचा पडला शेषशाही !
कवी - राहूल फाटक
[मला फार आवडलेल्या हास्यकवितांपैकी ही एक]
Monday, February 11, 2008
मायबोली
जिंकून विश्व सारे, बोलेन मायबोली
एकेक अक्षरांच्या वाहुनिया पखाली
घालू सडे सुखाचे, शिंपून मायबोली
श्वासांत आज माझ्या होतात हालचाली
जेंव्हा समोर येते लाजून मायबोली
भाषेस जाळणारे सत्तांध जे मवाली
त्यांना कुशीत घेते प्रेमांध मायबोली
केला न सूर्य माझा त्यांच्या कुणी हवाली
ज्यांच्या सुरांत नाही माझीच मायबोली
माझ्या जिवास आहे, ही मूळची प्रणाली
ओठांत नेहमी या येईल मायबोली
राहो हातात काटे, ठेवू गुलाब गाली
राहो सदैव माझ्या ओठांत मायबोली
आई तुला ग माझी सांगू कशी खुशाली
दूतास आजही या समजे न मायबोली
आलो जगात या मी ऐकून मायबोली
सोडीन प्राण माझे बोलून मायबोली
कवी - प्रसाद शिरगांवकर
Friday, February 8, 2008
भीती
पण मी ते अवघड करतो
रस्ता तर सरळच असतो
मी वाकड्यात का शिरतो?...
जर साध्या साध्या गोष्टी
मज आधी कळल्या असत्या;
मी सावध झालो असतो
अन चुकाच टळल्या असत्या...
मनाप्रमाणे माझ्या
ठरवत-बदलत जातो
उशीर झाल्यानंतर
मी भानावर येतो...
जगणे तर सोपे असते
पण मी ते अवघड करतो
हे कसे कुणाला सांगू-
मी जगायला घाबरतो...
कवी - अजब [मनोगतावरुन संग्राहित]
Thursday, February 7, 2008
आयुष्य
आयुष्य असतो इतिहास
तारखा वार सण
दिवस मास सण
युध्द झुंजी मरण
य़श, अपयश, स्मरण
उत्कर्ष, -हास, हास, परिहास
आयुष्य असतो इतिहास
आयुष्य असतं गणित
बेरजां पेक्षा वजाबाक्या जास्त
गुणाकारा पेक्षा भागाकार म्हणणे रास्त
आयुष्याची समीकरणं सोडवता सोडवता
संपून जातात, आयुष्याची पानं
अवघड, कठिण, जटिल
आयुष्य असतं गणित
आयुष्य असतं साहित्य
अश्रुंची फुलेच जिथे उमलतात
शोकांतिका जास्त फुलतात
कधी कधी होतो विनोद सा-याच जीवनाचा
कविता फक्त स्वप्नातच डुलतात
अन् कल्पनेतच राहून जातं लालित्य
आयुष्य असतं साहित्य
आयुष्य असतं राजकारण
ज्याचं त्याचं आपलं समीकरण
डाव पेच हार जीत
कधी पट कधी चीत
सत्ते साठी जोड तोड
पैशा साठी सारे गोड
सारंच अद्भुत असाधारण
आयुष्य असतं राजकारण
आयुष्य असते तडजोड
आयुष्य असते घडामोड
आयुष्य असते हसू
आयुष्य असते आँसू
आयुष्य असतो आरसा
आयुष्य असतो कवडसा
आयुष्य असतं रेशमी जाळं
ज्यात जखडला असतो मनुष्य
असं हे आयुष्य.
Wednesday, February 6, 2008
रिक्त
उगिच कैसेतरी दिवस काढायचे
मधुन जमवायचे तेच ते चेहरे
मधुन वाऱ्यावरी घरच उधळायचे
चुकुन अपुली कधी हाक ऐकायची
मन पुन्हा बावरे धरुन बांधायचे
रडत राखायची लोचने कोरडी
सतत कोठेतरी भिजत धुमसायचे
उगिच शोधायचे भास विजनातले
अटळ आयुष्य हे टळत टाळायचे
ह्या इथे ही तृषा कधि न भागायची
मीच पेल्यातुनी रिक्त सांडायचे!
गझलकार - सुरेश भट (एल्गार कवितासंग्रहामधून)
Tuesday, February 5, 2008
दुःखाने कुठल्या समुद्र इतका हेलावतो सारखा ?
अश्रू का इतके पितो, खवळतो, खारावतो सारखा?
केव्हाचा खटल्यापरी गुदरतो आहेस तू जीवना ?
फिर्याद्यासम श्वासश्वास फिरतो, ठोठावतो सारखा
नाही ह्या दुनियेत मित्र अथवा वैरी मनासारखा
कोणी निर्दय एवढा न जपतो, जोजावतो सारखा
रक्ताने अमुच्या भिजून क्षितिजे तेजाळली येथली !
दर्पाने कसल्या प्रकाश इथला घोंघावतो सारखा ?
आभाळा, चमकून का निरखतो आहेस बाबा मला?
माझी झेप स्मरून मीच अजुनी भांबावतो सारखा !
भेटावा चकवा तसे दिवसही येतात भेटायला
आहे त्याच स्थळी अजून दुनिया, मी धावतो सारखा
"ये मागे परतून, खेळ अपुला मांडू नव्याने पुन्हा,"
माझ्यातील कुणी निरागस मला बोलावतो सारखा
कवी - चित्तरंजन
Monday, February 4, 2008
कंठशोष
जगती चिवट अजूनी, हा काय दोष त्यांचा?
जाळून बाल्य करता का रक्तशोष त्यांचा?
का व्यर्थ फडफडावे? चिमटीत गुदमरावे?
सुरवंट रेंगणारे विणतीच कोष त्यांचा!
कळती तुम्हास सार्या खाणाखुणा इशारे
ऐकू कसा न येई मग कंठशोष त्यांचा?
समजून कोण घेते कोणास आज येथे
माझ्यावरी तरीही आहेच रोष त्यांचा!
सवयीनुसार त्यांनी संकल्प सोडले अन
सवयीनुसार चालू हा मंत्रघोष त्यांचा!
कवी - पुलस्ति.
Friday, February 1, 2008
कळेना
मुलांना कसे वाढवावे कळेना
नव्याने कसे मी घडावे कळेना
जमाना असा, सर्व चालून जाते
स्वत:ला कसे पारखावे - कळेना
किती माहिती ही, किती तज्ञ सल्ले
कसे नेमके पाखडावे - कळेना
विजेसारखा आज उत्साह आला!
तरी मी पुन्हा का गळावे - कळेना
विचारी नभा चिंब ही चंद्रमौळी
"कुठे केवढे कोसळावे कळेना?"
पुन्हा वाचले, खोडले शेर सारे
कशाला असे गुरफटावे - कळेना
कडू, तुरट, खारट - असे जगत जाता
कसे शेवटी गोड व्हावे - कळेना
कवी - पुलस्ति