कविता शोध

माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.

आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/


Tuesday, January 29, 2008

या करु पुराण्या मराठीचा नि:पात!

(जागतिकीकरणाच्या लाटेत महाराष्ट्र नामे प्रांतातील मराठी भाषेचा उद्धार करायला मराठीचे प्रेमी आसुसलेले होते. सुंदर संपन्न इंग्रजी शब्दांची पखरण घालून ओबड धोबड मराठीला ते सजवू पाहत होते. डबक्यागत थिजलेल्या भाषेचे रुपांतर सळसळत्या प्रवाहात करण्याच्या महान हेतूने त्यांनी इंग्रजीचा प्रपात त्या भाषेवर घातला. आता भाषा कशी बहरून आली. खरेतर क्रियापद सोडता बाकी सर्व शब्द कुठलेही असले तरी काय फरक पडतो? डान्सुया न म्हणता डान्स करुया म्हंटले की झाले! अशाने ही आधुनिक मराठी भाषा सुंदर होइल, लोकप्रिय होइल, वाढीला लागेल. मात्र काही संकुचित मनाच्या हेकट मराठी माणसांना हे पाहवले नाही. त्यांनी या महान कार्यात बाधा आणायचा प्रयत्न केला. ही वार्ता समजताच साहित्यप्रवर्तक सरदार आपल्या प्रतिभेच्या अश्वावर आरुढ झाले, आणि.....)


"श्रुति सुन्न जाहल्या वाचुन आपुल्या बाता
का प्रतिभेला तुम्ही आमुच्या आडवे येता?
नव लेखक आमुचे होती हतप्रभ आता,
भर दिवसा आम्हा दिसु लागली रात"
या करु पुराण्या मराठीचा नि:पात!

ते कठोर शल्य ध्यानी ये त्यातील
जाळीत चालले आधुनिक लेखक दील
’निंदणे मराठी’ हेच मराठी शील
’तात्याद्वय’ रडले असतील ते स्वर्गात
या करु पुराण्या मराठीचा नि:पात!

वर भिवई चढली दात चावती ओठ
कळपटलावरती त्वेषे नाचती बोट
डोळ्यात फुले अंगार, केस ते ताठ
दौतीतुन उसळे टाकाची ती पात
या करु पुराण्या मराठीचा नि:पात!

किती काळ सोडले प्रभु, आम्ही हे माठ
ही कशी विसरलो, आम्ही मराठी जात
हा असा धावतो आज जुन्या गोटात
तव मानकरी घेउन, आंग्ल ओठात
या करु पुराण्या मराठीचा नि:पात!

ते फिरता बाजुस डोळे किंचित लाले
तीस कसे निखंदु विचार करते झाले
त्यासाठी रिकामे होती चहाचे पेले
उपसले शब्दांचे भार किती निमिषात
या करु पुराण्या मराठीचा नि:पात!

उपहास्यमुग्ध करुनि की सर्वांना
अपमानची करण्या घेती कुचक्या ताना
टिंगलीत चिंबले दाट, खोट शब्दांना
पाजळे आधुनिक आंग्ल-शब्द अंकित
या करु पुराण्या मराठीचा नि:पात!

शब्दात आग, भाषेत आग, आग लावुनी.
लेखणी परजली मराठीच्या द्वेषानी
रद्दीत घातली जणु मराठी त्यांनी
मग खास रंगले किचकट त्या शब्दांत
या करु पुराण्या मराठीचा नि:पात!

लेखांतही दिसते तरी मराठी वाचा
कवीतेत तरंगे शब्द मराठी साचा
क्षितिजवर दिसतो प्रकाश या भाषेचा
अद्याप वल्गना कुणी तारेतची गातं
या करु पुराण्या मराठीचा नि:पात!


कवी -

No comments: