कोणी आज इथे अचानक अशी ही टोचली टाचणी?
तोंडातून न एक शब्द फुटला, ओलावली पापणी
घे तारांगण सूर्य चंद्र सगळे तू ज़ाग येताक्षणी
राहो तारण माझियाजवळ ही स्वप्नातली चांदणी
बापाने खत होउनी ज़गवली ती कालची पेरणी
आले पुत्र तशी कशी चटदिशी झाली सुरू कापणी?
ज्यायोगेच किती सुखात जगल्या वर्षानुवर्षे पिढ्या
झाली आज़च का अशी मग ज़ुनी ती कालची मांडणी?
आली थेट इथे मनात बसली, बोलून गेली तरी
नाही बेत तिचे मला समज़ले, ती केवढी धोरणी!
गेलो बोलविले म्हणूनच तिथे, मी सत्य ते बोललो
(त्याच्यानंतर मात्र फार तसली आली न बोलावणी)
आता ह्या इवल्या जगात मजला कोंडून मी घेतले
आल्या तोच कश्या इथे दशदिशा लांबून सार्याज़णी?
माझे प्रश्न मलाच चार पडले, मी उत्तरेही दिली
होती चूक न ती, बरोबर न ती, ही कोणती चाचणी?
त्यांना ते चरण्यास रान तिकडे, ह्यांना मिळाले इथे
सोयीची म्हणुनीच रोज घडते जेथेतिथे वाटणी
त्यांच्या बाह्यगुणावरी न भुललो, मी आत डोकावलो
त्यांनी सत्वर घेतली मखमली आतूनही ओढणी
आईबाप ज़री जगात नसले, ज़ा तू सुखाने घरी
ते वृंदावन आणि ती तुळसही आहेच की अंगणी!
आयुष्यात गमावले क्षण किती, कामास आले किती?
ती म्हटली "तुझियामुळेच ज़गले", आटोपली मोज़णी
झाली भातुकली ज़ुनी, हरवले ते मित्र त्या मैत्रिणी
का मी आज़ पुन्हा उगीच बसलो मांडून ही खेळणी?
कवी - प्रणव सदाशिव काळे