Wednesday, October 31, 2007

एक प्रवास...

एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी...

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा...

एक प्रवास शुन्याचा
जणु हिमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा...

एक प्रवास जगण्याचा
क्षणा क्षणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा...

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या...

एक प्रवास प्रयत्नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्षणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा...

एक प्रवास...
तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा
आठवु म्हंटले तर आठवणींचा...

Tuesday, October 30, 2007

आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

हवे काय अजुनी त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

ओढ तुझ्या सावलीची माझिया रस्त्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

असो वा नसो कुणी आपल्या संगे, पर्वा त्याची कुणास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

माझ्या चुकांवरही मित्रा पांघरूण तुझे हमखास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

तुझ्याबरोबर ऐन उन्हाळा ही मजला मधुमास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

आयुष्याच्या पटलावरती तुझ्या मैत्रीची आरास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

कधी निखळ चर्चा, आणि कधीतरी उपहास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे

Monday, October 29, 2007

मी तुझ्यावर प्रेम करतोय

तुझं ते निरागस बोलणं,
मला खूप आवडतं
चारचौघांतही तुझं वेगळेपण,
अगदी आपसुखच जाणवतं.

तुझ्या डोळ्यांत दिसून येतो,
माझ्यावरचा अतोनात विश्वास
खळखळून हसणं तुझं
खरचं वाटतं झकास.


तुझा तो मिश्कीलपणा,
आणि ते खोडया करणं
जराजरी रागावलो मी तरी,
चटकन डोळ्यांत पाणी काढणं.

माझा प्रत्येक शब्द,
तू किती सहजपणे जपतेस
सांग बरं ही कला
कोणत्या शाळेत शिकतेस?

तुलाही फ़ुलाप्रमाणे जपण्याचा,
मी आटोकाट प्रयत्न करतोय
अभिमान वाटतो मला माझा
की मी तुझ्यावर प्रेम करतोय.

Friday, October 26, 2007

गंऽऽऽ भाजणी

[दिवाळी काही दिवसांवर येउन ठेपली आहे. आता घराघरातून फ़राळाची तयारी चालू झाली असेल. त्यानिमित्त...]

चाल: गं साजणी, कुण्या गावाची तू गं राणी

गंऽऽऽ भाजणी
थालि पीठाची
किंवा चकलीची
आहे कशाची तू गं राणी
गं ऽऽऽ
आली थापुन
आणि भाजुन
थोडी लाजुन माझ्या पानी

थप थप थापण्याच्या
तालावर झाली दंग
तालावर झाली दंग
पाणीथोडं फार
मऊ मऊ झालं अंग
मऊ मऊ झालं अंग
कांदे दोन चार
लाभला तयांचा संग
लाभला तयांचा संग

माझ्या घरात
तुझी परात
येते वरात मझ्या पानी
गं ऽऽऽ
आली थापुन
आणि भाजुन
थोडी लाजुन माझ्या पानी

लोणच्याची फोड तुझ्या
चुरडतो अंगावरी
चुरडतो अंगावरी
तुपाचीही धार तुझ्या
ओततोय अंगावरी
ओततोय अंगावरी
ताजं ताजं दही लोणी
ठेवलंय बाजुवरी
ठेवलंय बाजुवरी

तुज्या वासानं
जीव हैरान
भूक बेभान येड्यावानी
गं ऽऽऽ
आली थापुन
आणि भाजुन
थोडी लाजुन माझ्या पानी


Thursday, October 25, 2007

रेशीम गाठी

विदेशी कपडे घातले तरी
हृदय अजून मराठी आहे
तोडून तुटत नाहीत
या मजबूत रेशीम गाठी आहेत

पिझा, बर्गर खाल्ल्यावरही
पोट पुरणपोळीच मागतं
ईंग्रजी पुस्तकं वाचली तरी
मन मराठी चारोळीच मागतं

मात्रुभूमि सोडली की
आईपासून दूर गेल्यासारखं वाटतं
भाषा सोडली की
अस्तित्व हरवल्यासारखं वाटतं

वडाची झाडं मोठी होऊनही
परत जमिनीकडेच झुकतात
कितीही दूर गेलं तरी
पाय परत मात्रुभूमिकडेच वळतात

काहीही बदललं तरी
हृदय अजून मराठी आहे
तोडून तुटत नाहीत
या मजबूत रेशीम गाठी आहेत

Wednesday, October 24, 2007

कविता

एक बातमी आलीये , माझ्या दोस्ताला म्हणे बरं नाही

काल परवापर्यन्त बरा होता, पण हल्ली काही खरं नाही

पिंजारालेले केस अन् चुरगळलेला वेष,

चप्पल अंगठा तुटलेली, गळा शबनम लटकलेली

सैरभैर चित्त आणि , हाती कागद लेखणी

मुद्रेवर पहिलटकरी भाव,

सतत काहीतरी हरवल्याचा आव

रस्त्यात अचानक थांबतो, स्वतःशीच बडबडतो

झोळीतला कागद काढून काही बाही खरडतो

रोजच्याच गोष्टीत त्याला नवे अर्थ दिसतायत

चांगलं-चुंगलं ऐकावं,वाचावं अशा इच्छा होतायत

का कोण जाणे जीवाची फार घालमेल होतेय

पावलागणिक त्याला नवीन ओळ सुचतेय

त्याला म्हणे वैद्याकडे नेऊन,

विचारलं त्याची नाडी दाखवून,

की ‘ माझं नक्की काय होणार आहे ? ‘

उत्तर मिळालं, ” अभिनंदन,

तुम्हाला लवकरच एक कविता होणार आहे ! “


कवी - सतीश वाघमारे

Tuesday, October 23, 2007

माझे गाणे

माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे,
अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे

सर्व जगाचे मंगल, मंगल माझे गाणे,
या विश्वाची एकतानता हे माझे गाणे

आशेच्या वीणेचा चढवुनि सूर भौतिकांत
हे गाणे, हे प्रियकर माझे गाणे मी गाता.

ही प्रेमाची, ही शांतीची, विश्वमंगलाची,
सौभाग्याची तार तशी ही, ही जगदैक्याची.

"निरध्वनी हे, मूक गान हे" यास म्हणो कोणी,
नभात हे साठवले याने दुमदुमली अवनी.

सर्व धर्म हे, भेद-पंथही सर्व एक झाले,
माझे, माझे विश्व, तार ही प्रेमाची बोले

शांतहि मत्सर, प्रशांत कपटस्वार्थाची ज्वाला,
चिच्छांतीने अहा भरीले सगळ्या विश्वाला.

ही मोक्षाची, स्वातंत्र्याची, उन्नतिची माला,
सौभाग्याची तार लागलो मी छेडायाला.

हे नंदनवन ही स्वर्भूमी एक पहा झाली !
मंगल मंगल मद्‌गानाची गति ही शेवटली.


कवी - बालकवी

Monday, October 22, 2007

या झोपडीत माझ्या

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥३॥

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥

महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥

पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥७॥
संत तुकडोजी महाराज.

Friday, October 19, 2007

सारं काही नकली आहे...

शिकण्यात काही मजा नाही,
इंजिनिअरींग सारखी सजा नाही,
अभ्यासाला तर रजा नाही,
जागा आमची चुकली आहे,
अहो, सारं काही नकली आहे.

आम्हाला तर आहेत दोनच हात,
तरी सबमिशन करतो रातोरात,
शिव्या खाऊन काढतो दात,
लाज अब्रु विकली आहे,
अहो, सारं काही नकली आहे.


ओरल पुरता नमस्कार,
बाहेर येताच शिव्याचार,
हा तर म्हणे शिष्टाचार
कर्तबगारी खचली आहे,
अहो, सारं काही नकली आहे.

करुनी एवढी दरी पार,
आमची म्हणे बोथटच धार,
नोकरीस फिरतो दारोदार,
आशा आता थकली आहे,
अहो, सारं काही नकली आहे।


[इंजीनियरिंग करत असलेल्या सर्व मित्र मैत्रीणींना समर्पीत... :) ]

Thursday, October 18, 2007

प्रेमात पडलं की...

प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर थोडसं
वेड्यासारखंच वागतात.


यात काही चुकीचं नाही
सहाजिकच असतं सारं
एकदा प्रेमात पडलं की
उघडू लागतात मनाची दारं

मनातल्या भावना अलगद मग
कागदावरती उतरतात
डोळ्यांमधील आसवंसुद्धा
शब्द होऊन पसरतात

रात्रंदिवस तिचेच विचार
आपल्याला मग छ्ळू लागतात
न उमजलेल्या बरयाच गोष्टी
तेव्हा मात्र कळू लागतात.

डोळ्याशी डोळा लागत नाही
एकाकी रात्री खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द
कवितेमधून बाहेर फुटतात

गोड गोड स्वप्नं बघत मग
रात्र रात्र जागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात.

Wednesday, October 17, 2007

तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

तुला लागतो चहा , मला लागते कॉफ़ी
तुला नाही आवडत मी ऊलटी घातलेली टोपी
तुला वाजते थंडी , मला होतं गरम
तू आहेस लाजाळू , मी अगदीच बेशरम
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

झोपतेस तू लवकर आणि उठतेस पहाटे
आवडत नाही तुला बॉक्सिंग आणि कराटे
मी मात्र झोपतो बाराच्या नंतर
रविवारी नसतं क्रिकेटशिवाय गत्यंतर
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

फ़िरायला आवडतं , आवडतं तुला शॉपिंग
कपड्यांबद्दल बोलतेस अगदी विदाऊट स्टॉपिंग
मला मात्र खरेदीचा येतो कंटाळा
कळत नाही रंग राखाडी आहे की काळा
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

घालतो मी शर्ट इस्त्री न करता
जाऊन येतो एकटाच इतरांच न ठरता
तू मात्र बघतेस मैत्रिणींची वाट
बाहेर निघताना नखरे सतराशे साठ
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

मला नसतात लक्षात वाढदिवसाच्या तारखा
जातो बाजाराला पण काम विसरतो सारखा
तुला मात्र आठवते पाचवीतली मैत्रिण
बारीक तुझी नजर , डोळे आहेत की दुर्बीण?
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

एक सांगू का तुला ?
हे सगळं असुनही आहे तसं जमवुया का आपण?
ऊन आणि सावली राहतात ना जसं
तुझं आणि माझं जमेल का तसं?

Tuesday, October 16, 2007

केव्हातरी पहाटे...

केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली
मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली

कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली

सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे?
उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली!

उरले उरात काही आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली!

स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली!

आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी..
हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली

अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा..
गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली?

कवी - सुरेश भट.

Monday, October 15, 2007

काटा रुते कुणाला - विडंबन

'बाटा' रुते कुणाला,
आक्रंदतो इथे मी,
मज बूट हे रुतावे,
हा दैवयोग आहे!
(आहे वर तान घ्यावी,
नाहीतर बूट चावतो आहे
हे लक्षात कसे येणार?)
रुते कुणाला....!

सांगु कशी कुणाला,
कळ हाय अंगठ्याची,
हे बूट घालता मी,
अस्वस्थ फार आहे!
(आ.व.ता.घ्या.)
रुते कुणाला....!

चांभार हाय वैरी,
असतो कुठे दुपारी,
म्हणूनी जुनीच आता,
पायी वहाण आहे!
रुते कुणाला.....!

अंगठा विभक्त झाला,
तळवा फकस्त राहे,
हे चालणे बघा ना,
भलतेच मस्त आहे!
रुते कुणाला....!

फुटले नशीब आता,
ह्या दोन पावलांचे,
माझ्या जुन्या वहाणा,
ढापून चोर 'जा', 'ये'!
(म्हणजे चोर माझ्या जुन्या
वाहाणा घालुन माझ्यासमोरुनच
'ये-जा' करतोय)
रुते कुणाला..!

हा 'पायगुण' माझा,
आहे असा करंटा,
नुकताच मंदिरी त्या,
बदलुन बूट राहे!
रुते कुणाला..!

कवी - मानस.

Friday, October 12, 2007

एका तळ्यात होती...

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक

कोणी न तयास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

एके दिनी परंतू पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळले, तो राजहंस एक

कवी - ग. दि. माडगूळकर

Thursday, October 11, 2007

चुकली दिशा तरीही

चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे

मी चालतो अखंड चालायाचे म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे

डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे!

मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे ईशारे

चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे (न्या रे?)

आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे
बेसावधास कैसे डसणार हे निखारे?

कवी - विंदा करंदीकर

Wednesday, October 10, 2007

पत्र

पत्रे तिला प्रणयात आम्ही खुप होती धाडली,
धाडली अशी होती की नसतील कोणी धाडली

धाडली मजला तिने ही, काय मी सांगु तीचे
सर्व ती माझीच होती, एकही नव्हते तीचे

पत्रात त्या जेव्हां तिचे ही पत्र हाती लागले
वाटले जैसे कोणाचे गाल हाती लागले

पत्रात त्या हाय ! तेथे काय ती लिहीते बघा
माकडा आरशात आपुला चेहरा थोडा बघा

सार्तथा संबोधनाची आजही कळली मला
व्यर्थता या य़ौवनाची तिही आता कळाली मला

नाही तरीही धीर आम्ही सोडीला काही कुठे
ऐसे नव्हे की माकडाला, माकडी नसते कुठे

कवी - भाऊसाहेब पाटणकर



Technorati Profile

Tuesday, October 9, 2007

रेशमाच्या बाबांनी - रेशमाच्या रेघांनीचे विडंबन

रेशमाच्या बाबांनी, काल लाथा बुक्क्यांनी
बाकपुरा आहे माझा काढीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !

चूक झाली माझी लाखमोलाची
विचारल मी ही पोर कोणाची
विसरलो आहे कोण, आहे कोण जोडीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !

जात होती वाटेनं ती तोऱ्यात
अवचित आला बाप मोऱ्यात
आणि माझ्या नरडीला, धरूनीया ओढीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !

भीड नाही केली आल्यागेल्याची
मागितली माफी मी त्या मेल्याची
म्हणेन मी आता ताई, तुमच्या या घोडीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !


[हे विडंबन मला जाम आवडले आहे, कोणाला कवीचे नाव माहीत असल्यास जरुर कळवा।]

कवी - केशवसुमार [माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मिलिंद]

Monday, October 8, 2007

बघ तिला सांगुन

कधी कधी कोणासाठी असलेले आपले शब्द मनातच रहातात.
कधी ते ओठांवर येतात पण तिथेच अडतात.
कधी प्रयत्न करतो पण धाडस होत नाही
असेच काही 'दुसरी' कडेही होत असेल...
शेवटी तेच शब्द मुके होतात. आणि म्हणुनच...
म्हणुनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगुन !

किती दिवस पहाणार तिला तू खिडकीतुन
तो गुलाबही जाईल एक दिवस कोमेजुन
राहशील फक्त तू जगशील मरुन मरुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

किती दिवस बोलणार तू पडद्या आडुन
पोहोचवशील जरी भावना तिला दुसऱ्यांकडुन
"थॅंक्स!" म्हणेल तूला ती त्याचाच हात धरुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

किती दिवस घालवणार तू वायफळ बोलुन
बोलायला जाता एक वेगळाच विषय काढुन
एवढ्यात जाईल कोणतरी तेच तिला विचारुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

रोज रोज देशील एसएमएस तू पाठवुन
आतुरतेने हसत तॊ काढेल ती वाचुन
मेमरी फुल झाली की टाकेल डिलीट करुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

तुझा एक एक गुलाब ठेवील ती साठवुन
एक दिवस येईल गुलकंदाची बरणी घेवुन
लग्न ठरतय म्हणत जाईल ती निघुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

किती दिवस थांबणार तू बोलल्या वाचुन
एक दिवस येशील एकटं तिला गाठुन
रडतच निघेल ती पत्रिका हातात देवुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

जाशील लग्नाला शेवटच बघायला म्हणुन
मारशील तू अक्षता नवऱ्याला फेकुन
बघशील तेंव्हाही तिला चोरुन चोरुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

कधी तरी दिसशील तु तीला रस्त्या वरुन
थांबवेल तेंव्हा तुला ती एक हाक मारुन
विसरशील तू स्वःतालाच तिचं बाळ पाहुन
तीच म्हणेल तेंव्हा तुला
"एकदातरी...
बघायच होतस मला सांगून !!"

म्हणूनच म्हणतो,

वेळे आधीच गड्या दे लाज सोडुन
सांग तिच्या नजरेला नजर तू देवुन
हात तिचा तुझ्या हातात तू घेवुन
सांग तुझ्या भावना तिला तू कळवळून
बघेल जेंव्हा तुला ती डोळे भरुन
मिठी मारेल तुला तेव्हा ती कडकडून !

बस्स...
एकदातरी...
बघ तिला सांगून.

Friday, October 5, 2007

सांगा कस जगायचं?

सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

डोळे भरुन तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुम्च्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीचं ठरवा!

कळ्याकुट्ट कळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी
दीवा घेऊन उभं असतं
कळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीचं ठरवा!

पायात काटे रुतुन बसतात
हे अगदी खरं असतं;
आणि फ़ुलं फ़ुलुन येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फ़ुलांसारखं फ़ुलायचं
तुम्हीचं ठरवा!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!

सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

कवी - मंगेश पाडगावकर.

Thursday, October 4, 2007

रंग माझा वेगळा

रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा
गुंतुनी गुंत्यात सा-या पाय माझा मोकळा

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी
हे कशाचे दुख: ज्याला लागला माझा लळा?


कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा?


सांगती 'तात्पर्य' माझॆ सारख्या खोट्या दिशा
"चालणारा पांगळा अऩ पाहणारा आंधळा!"


माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा

कवी - सुरेश भट

Wednesday, October 3, 2007

निशब्द

मी दिल्या शब्दा असंख्य हाका शब्द ना मागे वळला कधी
शब्दासाठी जाहलो शब्द्खुळा शब्द ना मज मिळाला कधी
शब्द सकाळ, शब्द मध्यान, शब्द सांज, शब्द निशा कधी
मी गाळली असंख्य आसवे पण शब्द माझा ना पाझरला कधी.
शब्दासाठी हा सारा प्रयास पण शब्दा तो ना कळला कधी
शब्दासाठी हा धडपडता प्रवास पण हात शब्दाने ना धरला कधी
शब्द सागर शब्द कीनारा शब्द वारा मग शब्द वादंळ कधी
मला मिळाल्या असंख्य ठेचा पण शब्द माझा ना ओघळला कधी.
शब्दात माझा जीव गुतंला पण जीव शब्दचा ना जडला कधी
मी लिहील्या असंख्य कविता पण शब्दा त्या ना कळल्या कधी
शब्द जीवन शब्द संसार शब्द अस्तित्व शब्द कविता कधी
झालो मी आज निशब्द कवि पण शब्दा हा कवि ना कळला कधी.
आज जीवन माझं प्रश्नचिन्हं पण शब्दास हा प्रश्न ना पडला कधी
शब्दाच्या ओजंळीत श्वास माझा शब्दाने हा जीव ना सोडला कधी
शब्द सावली शब्द आधार शब्द आयुष्य शब्द सर्वस्व कधी
शब्दासाठी मी नेहमी शून्यच होतो पण हा शब्द मी ना खोडला कधी.