Friday, September 28, 2007

कणा - विडंबन

ओळखलंत का परवेझ मला
पाकिस्तानात आला कोणी
तारवटलेल्या डोळ्यांमध्ये
कणभर नव्हतं पाणी

क्षणभर बसला, भेसूर हसला
बोलला वरती पाहून
मुंबईमधून आत्ताच आलो
आलो बॉम्ब लावून

माज चढल्या सैतानासारखा
लोकल्स मधून नाचलो
साथी सारे पकडले जातील
मीच एकटा वाचलो

वाटलं होतं बॉम्ब लावून
मुंबईची वाट लागली
मुंबईमात्र नेहमी सारखीच
पुन्हा धावायला लागली

खिशाकडे हात जाताच
वर बघून म्हटला
पैसे नकोत सरदार
मनात भकासपणा दाटला

मुंबईकरांचं धैर्य पाहून
मोडलाय माझा कणा
छातीवरती बंदुक ठेवून
फक्त मर म्हणा!

Thursday, September 27, 2007

आकाश उजळले होते

इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
(पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?)

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते

घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते

कवी - सुरेश भट

Wednesday, September 26, 2007

मी कधीच नाही म्हटंल की...

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
कदाचीत माझ्या नजरेतला भाव तुला कधी कळलाच नाही म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
माझ्या डोळ्यातुन ओघळणारा अश्रू तु कधीच टिपला नाहीस म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
भोवतालच्या मित्र-मैत्रिणींच्या गर्दीत मला कधी पाहीलच नाहीस म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
आपल्या ह्रदयाच्या रेशीमगाठी कधी जुळल्याच नाहीत म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
कारण मनातल्या भावना कधी ओठांपर्यंत पोहचल्याच नाहीत म्हणुन

पण आता मी बोलणार आहे
ह्रदयाचे सर्व बंध उलघडणार आहे
कारण मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन...

Monday, September 24, 2007

आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!

आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!

एकमेकांना, दिलेल्या दुःखांवर

एकमेकांसोबत, घालवलेल्या

अनेक आनंदी क्षणांचा, लेप लावण्यासाठी..

आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!

अनेक जुन्या, आठवणींनी आणलेले

एकमेकांच्या, डोळ्यातील आनंदाश्रु पुसण्यासाठी…..

आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!

आयुष्यात पुढे येणारया, अनेक दुःखी क्षणांच्या वेळी

एकमेकांच्या हातात, चेहरा लपवून मनसोक्त रडण्यासाठी!

आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!

प्रत्येक दुःखी, क्षणानंतर येणारया आनंदी क्षणात

एकमेकांचा, हात धरण्यासाठी एकमेकाला, सावरण्यासाठी…………

आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!

Friday, September 21, 2007

हनुमान

आक्रित विक्रित
वगैरे काय काय
घडायला लागलंय...
पोरगं येता जाता
चक्क पाया पडायला
लागलंय....||

का तर म्हणे Daddy सध्या
मी Superman नाही Hanuman आहे....
मी म्हणलं होक्का?
छान आहे!! ||


बायको म्हणाली
सोन्यासारखं पोर माझं
करतंय संस्कृतीचं रक्षण
चेष्टा सुचतीय तुम्हाला
जळ्ळं मेलं लक्षण... ||


अंजनीच्या पठिंब्याने
पवनपुत्र हसू लागला
घरातला झिरोचा बल्ब
ही त्याला सुर्याचा गोळा' दिसू लागला..... ||

रोज नवे पराक्रम..
रोज नवे उड्डाण..
बिल्डिंग हवालदील....
सोसायटी हैराण ||


संध्याकाळी घरी येताना
रोज चिंता जागलेली
कोण जाणे आज
कोणत्या लंकेला आग लागलेली... ||


शेवटी शेपूट सरसावून म्हणालो
'प्रिये हे अवघड होत चाललंय विलक्षण
हे केवळ टि. व्ही. चं खूळ आहे,
नाही संस्कृतीचं रक्षण'.. ||


म्हणाली उतरतंय जरासं खूळ तो आता जरा
At Ease होतोय..
पण मला बाई वेगळीच चिंता लागलीय
उद्या लॉर्ड कृष्णा रिलीज होतोय....||


कवी - वैभव जोशी

Thursday, September 20, 2007

फ़क्त एकदाच

फ़क्त एकदाच तुला मनसोक्त हसताना पहायचंय
निदान त्यासाठी तरी मला विदूषक बनुन तुझ्यासमोर यायचय

फ़क्त एकदाच तुझ्या मनातले सारे काही जाणुन घ्यायचय ,
निदान त्यासाठी तरी नजरेला नजर भिडवुन तासनतास बसायचय.

फ़क्त एकदाच तुझ्या मऊ केसांवरुन हळुवार हात फ़िरवायचाय ,
निदान त्यासाठी तरी एक गजरा तुज़्या केसात माळायचाय ,

फ़क्त एकदाच तुला माझ्यासाठी बेचैन होताना पहायचय,
निदान त्यासाठी तरी ठरलेल्या वेळेच्या ऊशिरा यायचय.

फ़क्त एकदाच तुला अनिवार रडतना पहायचय,
निदान त्यासाठी तरी मला खोट खोट मरायचय.

Wednesday, September 19, 2007

आठवणींचे जग

आठवणींच जग कीती अनोखं
गुंतलो एकदा की खरं जग पारखं

सापडतो कधी सानपणचा चॉकलेटचा बंगला
गावाच्या मध्यभागी असणारा अमुचा इवलसा इमला

डोळ्यांपुढे सरकते मास्तरांची छडी
मित्रांसोबत चोरुन पेरु खाण्यातली गोडी

भेटतात आईवडीलांगत प्रेम करणारे शिक्षक
टीळकांच्या भूमिकेसाठी कौतुक करणारे प्रेक्षक

ऎन मध्यान्ही रंगलेला cricket चा डाव
टुर्नामेन्ट जिंकताना घेतलेली विजयी धाव

पहीला नंबर आल्यावर मिळालेलं बक्षीस
दीड मार्क कापले म्हणून मास्तर वाटायचे खवीस

उशीरा उठलो म्हणून मिळायचा धम्मकलाडू
बॅटसाठी हट्ट करताना फ़ुटलेलं खोटं रडू

कधी दीसतं आजीच्या हातचं थालीपीठ
मुंजीच्या वेळेस आईनं कौतुकानं लावलेली तीट

अचानक ओळख दाखवतात दडलेल्या स्म्रुती
मनात जतन करुन ठेवलेले क्षण तरी कीती

अशी माझी दीवास्वप्ने कीतीदा भंगती
मॅनेजर अचानक उभा असे संगती
नाईलाजाने coding साठी पुन्हा हात सरसावतात
आयुष्याची debugging उद्या पुन्हा करू असं मनाला समजावतात!!

Tuesday, September 18, 2007

कपडे स्वच्छ ठेवून कधी, चिखलात पडता येत नाही

कपडे स्वच्छ ठेवून कधी, चिखलात पडता येत नाही
आरसा पुढे ठेवून स्वतः पासून दडता येत नाही

प्रेम आणि स्वातंत्र्य हे विरूध्दार्थी शब्द आहेत
पंखात पंख घालून कधी, गगनात उडता येत नाही

मनात जिद्द असेल तर "एव्हरेस्ट" सुद्धा पार होतो
मेलेल्या मनाला साधा, जिना चढता येत नाही

आयुष्य धरायला गेलात तर, चावतं एखाद्या कुत्र्यासारखं
पण पळून जाईल ह्या भितीने, त्याला सोडता येत नाही

पूल बांधा, धरण बांधा, कालवे काढा उपयोग नाही
जेव्हा तुम्हाला माणसाला, माणूस जोडता येत नाही

आले जर माझ्या डोळ्यात पाणी तर हारलो मी म्हणून दैव सुखावेल
म्हणूनच मला ईच्छा असून, मोकळं रडता येत नाही

Monday, September 17, 2007

माझं आपलं असं प्रेम

माझं आपलं असं प्रेम !!!!

चंद्र सुर्य आणून देईन,
पदरात घालीन लक्ष तारे !
बांधून ठेवीन तुझ्या दारी,
तुझ्या केसांशी खेळते वारे !!!

असं मी मुळीसुद्धा म्हणणार नाही
उगाचं भाव खाण्यासाठी मी खोटं बोलणार नाही...

माझं आपलं सरळसोट सांगण
"माझं तुझ्यावर प्रेम आहे !"
अगदीच 'हीर - रांझा' नसलं तरी
थोडं थोडसं सेम आहे !!!

पेट्रोल जाळत फ़िरणं तुझ्यापाठी
मला अजिबात जमणार नाही,
शायनिंगसाठी पैसा उधळणं
मला अजिबात झेपणार नाही.

तरीसुध्दा मार हाक मनापासुन कधी !
उभा असेन तुझ्यासमोर तुझ्यासुद्धा आधी !!!
कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे !
हां ! 'जॉन - बिपाशा' सारखं नाही
माझं आपलं माझ्यासारखं प्रेम आहे !!!!


आणखी एक खरं सांगतो,
तुझं माझ्यावर आणि
माझं तुझ्यावर प्रेम असलं तरी !
'केवळ' सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी
बघत राहीन इतर पोरी !!

पण हे अगदी नक्की त्या कितीही सुंदर असल्या
आणि कितीही मोहक हसल्या तरी,
तुझ्याचं खळीवर पागल होतो,
तुझ्याचं बटांवर पागल आहे आणि
तुझ्याचं डोळ्यात आकाश बघेन !!
अगदी खरं सांगतो
तुझ्यावरच प्रेम होतं,तुझ्यावरच प्रेम आहे,
आणि तुझ्यावरच प्रेम करेन !!!!

Friday, September 14, 2007

प्रवास...

प्रवासात सगळेच अनोळखी असतात
म्हणून प्रवास टाळायचा नसतो
कारण त्यातला एखादा प्रवासी
आपल्यासाठी थांबलेला असतो

जीवनात सगळंच मिळत नाही
म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो
कुठल्यातरी वळणावर
आपला वाट पहाणाराही असतो

एखाद्याला आपलं करता आलं नाही
म्हणून जीव जाळायचा नसतो
जीवनच संपल्यावर आपण
त्या व्यक्तीच्या सहवासालाही मुकतो

जगण्याचे संदर्भ असे क्षणाक्षणाला बदलतात
आणि म्हणूनच माणसे उमलतात आणि फुलतात.

Thursday, September 13, 2007

एक प्रेयसी पाहिजे

एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.

एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;
माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी.

एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी;
पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी.

एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;
आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी.

एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी;
सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी.

एक प्रेयसी पाहीजे........ मिळेल का अशी?

Wednesday, September 12, 2007

फ़क्त आठवणीच हाती

कँटीन मधला चहा आणि
चहा सोबत वडा पाव
पैसे कुठले खिशात तेव्हा
उधारीचचं खातं राव !

कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून
आणि पोरींची चेष्टा करणं
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच बघून झुरणं !

बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पानं
आणि पेन सुध्दा चोरलेला !

परीक्षा जवळ आली
की मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्नं उद्याची
म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !

पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरांसोबत
जुनं झाड भरायचं.

अशी वर्तुळ भरता भरता कळलं
अरे कागदच भरला !
वर्तुळ झाल्या कागदाला
फ़क्त सलाम करायचा उरला !!

पुन्हा नविन रस्ता
पुन्हा नविन साथी
जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या
फ़क्त आठवणीच हाती !!!!!!

Tuesday, September 11, 2007

बहुतेक नवरे लाथाच खातात!

माकडं असोत वा गाढवं असोत
सगळेच प्राणी लग्न करतात
माणसं असोत वा सिंह असोत
बहुतेक नवरे लाथाच खातात!

गाढवीण आपल्या गाढवाला
'ऑफिशियली' लाथा मारते
माकडीण आपल्या माकडाला
हवं तसं 'टांगून' ठेवते

सिंहीण आपल्या सिंहराजाची
पाहीजे तेंव्हा आयाळ खेचते
अन बाई माणूस, बुवा माणसाचा
फक्त बोलून खीमा करते!

मार्ग त्यांचे काहीही असोत
उद्दीष्टं त्यांची एकच असतात
म्हणून
माणसं असोत वा सिंह असोत
बहुतेक नवरे लाथाच खातात!

गाढव नव-याला गाढविणीवरती
गुरकताना पाहिलंय कधी?
सिंहीणीला ताटाखालचं
मांजर झालेलं पाहिलंय कधी?
आपण पहातो माकडला
माकडचेष्टा करताना
अन बुवा माणसाला, बाईमाणसाच्या
मुठीत निमूट जगताना
जात त्यांची काहीही असो
अनुभव नव-यांचे सारखेच असतात
कारण
माणसं असोत वा सिंह असोत
बहुतेक नवरे लाथाच खातात!


गाढवासारखं 'हो' 'हो' म्हणत
नवरे आपले जगत रहातात
माकडासारखं आशांवरती
नवरे नेहमी लटकत रहातात
सिंह बनून जगण्यासाठी
हिंमत त्यांच्यात उरत नाही
माणूस म्हणून जगण्यासाठी
किंमत त्यांना उरत नाही
आलेला दिवस, आलेले क्षण
पुढे पुढे ढकलत रहातात
कारण

माणसं असोत वा सिंह असोत
बहुतेक नवरे लाथाच खातात!


कवी - प्रसाद

Monday, September 10, 2007

तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत अनेक मुले असतात
पण जो सर्वात साधा सुधा दीसतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत अनेक मुले असतात
पण जो सर्वांना सतत मदत करीत असतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीमध्ये मुले पीझ्झा बर्गर खातात
पण जो नेहमी वडा पाव खातांना दीसतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत मुले सीगरेट पिऊन येतात
पण जो घरुन पुजा करुनच येतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीमध्ये मुले मुलींना प्रोपोज करतात
पण जो आवडत्या मुलीला फ़क्त चोरुनच पहात असतो
तो मराठी मुलगा असतो

Friday, September 7, 2007

काय म्हणता, काळ बदळला?

काय म्हणता, काळ बदळला?
पुर्वीच काळ सुखाचा
आता नाही कोण कुणाचा
तोच प्रवास, तोच रस्ता
वीट आलाय या जीवनाचा?

मान्य आहे, इंधन महागलंय, प्रदूषण वाढलंय
पण कधी पहाटे लवकर उठून
घन:श्याम सुंदरा ऐकलंय?
ते राहू द्या, सुर्योदयाचं मनोहर रुप
शेवटचं केव्हा पाह्यलंय?

मान्य आहे, तुम्ही खूप धावपळ करता,
एकाच वेळी अनेक ठिकाणी असता
पण पाहिलाय कधी पौर्णिमेचा चंद्र
कोजागिरी वगळता?
तृण मखमालीवर आकाश पांघरुन
मोज्ल्यात कधी चांदण्य़ा रात्र सरता?

मान्य आहे पाउलवाटांचे हमरस्ते झालेत
अन मनाचे कप्पे अरुंद झालेत.
जरी करीत असाल तुम्ही इंटरअनेटवर हजारो मित्र
पाठवितही असाल ढिगांनी ई-मेल अन चित्र
पण कुणाला पाठवलंय कधी एखादं
पान्नास पैशाचं अंतरदेशीय पत्र?
अन लुटलाय का कधी पोस्टमेन कडून
शुभेच्छा तार स्विकारल्याचा स्वानंद?

मान्य आहे, जीवनमान बदललंय,
पालटलाय साराच नूर
आम्हालाही पडते आजकाल
डिजे पार्ट्यांची भूल
पण ऐकलाय का हो कधी
रेडियोवर अकराचा बेला के फ़ूल?

मला नाही कळत असं काय झालंय
की ज्यानं आपलं अवघं विश्वच बदललयं

सुर्य नाही बदलला, चंद्रही नाही बदलला
काळ आहे तिथेच आहे, तो नाही बदलला
फ़क्त तुमचा आमचा, पहाण्याचा नजरीया बदलला.

Thursday, September 6, 2007

उद्या जगेन

उद्या जगेन उद्या जगेन म्हणून आजवर मरत राहीलास
न पाहीलेल्या भविष्यासाठी वर्तमानात झुरत राहीलास
सागं कधी जगलास का ते उद्याच जीवन तु आजवर?
आजही तेच करतोस जे आयुष्यभर करत राहीलास

मर मर मरुन उद्यासाठी तु खूप काही केलंस
तो उद्या आलाच नाही तु तुझ्यासाठी काय केलस?
आज भुतकाळाच्या जखमा पाहून का रडतोस तु
सुखासाठी हजारदा मन मारलस हे तु काय केलस?

एक दिवस तरी सागं जेव्हा नव्हता दु:खाचा चोप
आठवतय का कधी मिळाली शेवटची साखर झोप
अरे तो दिवस आलाच नाही ज्याची तु वाट पाहीलीस
आठवतय का कधी केलीस अखेरची मन मौज

तु म्हणतोस जे केलं त्यामुळे मी आजवर जगलो
आणि एवढ करुनही आजवर ही नाही मी थकलो
घरासाठी दारासाठी संसारासाठी मी खुप काही केलं
हा माझ्यासाठी मी आजवर काही नाही करु शकलो.

आयुष्यभर धावलास तु न पाहीलेल्या उद्यासाठी
तु राहीलास उपाशी नाही केलास आराम जीवासाठी
सागं हा जिवनाचा खेळ होता का नशिबाचा तमाशा
तु जगलास खरा पण कोणासाठी आणि कशासाठी?

सोडणांर आहेस त्या जगासाठी की तुला विसरणा-या घरासाठी
कपाटातल्या तिजोरीसाठी का त्या पोष्टातल्या खात्यासाठी
आता तरी सागं कशासाठी जगलास तु आजवर बोल?
हातातल्या काठीसाठी की डोळ्यावरच्या जाड भिगांसाठी
बघ आजही तरी तुला चींता पुन्हां त्या उद्याची
चदंनाच्या लाकडाची आणि शुद्ध वनस्पती तुपाची.

Wednesday, September 5, 2007

सकाळी उठोनी...

सकाळी उठोनी | चहा-काँफी घ्यावी,
तशीच गाठावी| विज-गाड़ी||

दाती तृण घ्यावे | हुजूर म्हणून;
दुपारी भोजन| हेची सार्थ ||

संध्याकाळ होता | भूक लागे तरी,
पोराबाळांवरी | ओकू नये||

निद्रेच्या खोपटी | काळजीची बिळे,
होणार वाटोळे| होईल ते||

कुणाच्या पायाचा | काही असो गुण;
आपुली आपण| बिडी प्यावी||

जिथे निघे धूर| तेथे आहे अग्नी;
आम्ही जमद्ग्नी | प्रेतरुपी||


कवी - बा. सी. मर्ढेकर.

Tuesday, September 4, 2007

तुला काहीच कसं रे वाटत नाही?

आठवत तुला......

जेव्हा तु उदास असायचीस
एखाद्या दुखा:त खोलवर बुडायचीस
तेव्हा मी तुझ्या ओझरत्या
नजरेकडे पहायचो
ओठावर हसु ठेवत
मी वेड्यासारखा बडबडायचो
तेव्हा वाटायचं मला
की मला आनंदात पाहुन
तु तुझं दु:ख विसरशील
माझ्य़ाकडे पाहुन मोहक हसशील............

पण... तेव्हा तु म्हणायचीस
"तुला काहीच कसं रे वाटत नाही?
एखाद्या वेदनेचे भाव तुझ्या चेह-यावर कसे कधीच दिसत नाहीत?"

पण आता...

जेव्हा तु नाहीस
या डोळयात आसु ठेऊन
मी सारखा तुझा विचार करतोय
वेदनेच्या प्रत्येक पावसात एकटाच भिजतोय
अजुनही मन माझं तोच तो प्रश्न विचारतय
की "तु माझी होशील?"
माझी ही अवस्था पाहुन
उद्या कदाचीत तु परत येशील
तोवर माझे हे आसु पण सुकतील
तुला पाहुन माझे हे
हसु विसरलेले ओठ पुन्हा हसतील
आणि माझ्या त्या हास्याकडे पाहुन

तु पुन्हा तेच म्हणशील

"तुला काहीच कसं रे वाटत नाही
एखाद्या वेदनेचे भाव तुझ्या चेह-यावर कसे कधीच दिसत नाहीत".....

Monday, September 3, 2007

मैत्री केली आहेस म्हणुन...

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय


गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस