कविता शोध

माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.

आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/


Friday, October 24, 2008

शुभेच्छा

जखमेवर मीठ... खरचं नाही तशी इच्छा
दिपावलीच्या तुम्हा सर्वास हार्दिक शुभेच्छा !!!

म्हटल तर सारं आहे आलबेल
उभी जखडून महागाईची ही वेल
आवाक्याबाहेर धान्य, डाळी आणि तेल
त्यात नाही कुठे डिस्काऊंट वा सेल.....
............तरिही दिपावलीच्या तुम्हा सर्वास हार्दिक शुभेच्छा !!!

फटाक्याचे दर असे भिडले आभाळी
आवाजविरहीत यंदाची दिवाळी
तोंडी लावण्यापुरते जिन्नस फराळी
सणासुदीतही तीच रोजची भुपाळी.......
............तरिही दिपावलीच्या तुम्हा सर्वास हार्दिक शुभेच्छा !!!

खिडकीत डोकावते बघ मंदीची लाट
बोनस, इन्क्रिमेंटला केव्हाच चाट
मिठाईच्या डब्यात बिस्कीटांचा थाट
कपातीची तलवार मारतेय काट.......
............तरिही दिपावलीच्या तुम्हा सर्वास हार्दिक शुभेच्छा !!!

आशेची पणती पेटवू दारात
स्वप्नांचे कंदिल झुलवू नभात
प्रेमाचे उटणे अपुल्या नात्यात
सुखदु:खाची रांगोळी येऊ दे भरात
............म्हणूनच दिपावलीच्या तुम्हा सर्वास हार्दिक शुभेच्छा !!!


कवी - कौतुक शिरोडकर

Thursday, October 23, 2008

पत्र लिही पण...

पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे
लिपीरेशांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे

चढण लाडकी भूवई मधली नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून

शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन
नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू वीज सूवासिक उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा सांगीतले मी , तू हट्टी पण !

पाठवीशी ते सगळे सगळे पहील्या ओळीमधेच मिळते
पत्र त्या नंतरचे मग वाचायाचे राहून जाते


कवयित्री - इंदिरा संत

Wednesday, October 22, 2008

स्वप्न

भीती तिला प्रणयात कोणी पाहील याची वाटते
येवूनही स्वप्नी माझ्या हेच तिजला वाटते

म्हणते कशी कैसी तरी स्वप्नात ह्या आले तुझ्या
सारेच पण आहेत बाई भोवती जागे तुझ्या

जाणते सर्वांस यांना मी ही नव्हते साधी तशी
स्वप्नातही येतील मेले मी जशी आले तशी

भेटण्या जेव्हा तिच्या स्वप्नात मी गेलो तिथे
स्वप्नातही अपुल्या स्वत:च्या हाय ती नव्हती तिथे

त्रास ऐशा अप्सरेला हाच असतो सारखा
नेतो तिला उचलून जो तो आपुल्याच स्वप्नी सारखा

ऐकिले दुसर्‍या कुणाच्या स्वप्नात ती आहे तिथे
बोलाविले नव्हते तरीही धावुनी गेलो तिथे

आता तरी दुर्दैव वाटे नकीच माझे संपले
पोचण्या आधीच ते ही स्वप्न सारे संपले


कवी - भाऊसाहेब पाटणकर

Tuesday, October 21, 2008

कधी

"हो" कधी, "नाही" कधी अन्‌ "कदाचित" ही कधी
काय समजावे कुणी ? ठाम असते ती कधी ?

रोज माझा प्रश्न अन्‌ रोज चतुराई तिची
टाळते हसुनी कधी, मागते अवधी कधी

हा निरागस चेहरा, हास्य हे मनमोकळे
वाटते अल्लड कधी, वाटते खेळी कधी

बांध पाटाला कधी जीवनाच्या घालते
आणि होते त्यावरी कागदी होडी कधी

ती कधी माझ्यामध्ये खोल दडुनी बैसते
फेर धरुनी नाचते जाणिवांभवती कधी

ती जरी नसली तरी श्वास माझा चालतो
येत नाही त्यास पण गंध कस्तूरी कधी

अंथरावी लागते वेदना हृदयातली
चालुनी येते गझल, 'भृंग', का सहजी कधी ?


कवी - मिलिंद फ़णसे

Monday, October 20, 2008

अंदाज आरशाचा, वाटे खरा असावा

अंदाज आरशाचा, वाटे, खरा असावा
बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा

जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा

नाही अखेर कळले, नौका कशी बुडाली
भयभीत काठ सांगे, तो भोवरा असावा

का आळ खंजिरावर, घेता तुम्ही खुनाचा?
की वाटले तुम्हाला, तो सोयरा असावा!

काठावरी उतरली, स्वप्ने तहानलेली
डोळ्यात वेदनेचा, माझ्या, झरा असावा

भेटून वादळाला, इतुके विचार आता
शाबूत एवढाही, का, कोपरा असावा

दारात ती उभी अन्‌, नयनी अबोल अश्रू
लाचार ती असावी, तो, उंबरा असावा

माथ्यावरी नभाचे, ओझे सदा "अलाही'
दाही दिशा कशाच्या, हा, पिंजरा असावा


कवी- इलाही जमादार