कविता शोध

माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.

आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/


Friday, September 28, 2007

कणा - विडंबन

ओळखलंत का परवेझ मला
पाकिस्तानात आला कोणी
तारवटलेल्या डोळ्यांमध्ये
कणभर नव्हतं पाणी

क्षणभर बसला, भेसूर हसला
बोलला वरती पाहून
मुंबईमधून आत्ताच आलो
आलो बॉम्ब लावून

माज चढल्या सैतानासारखा
लोकल्स मधून नाचलो
साथी सारे पकडले जातील
मीच एकटा वाचलो

वाटलं होतं बॉम्ब लावून
मुंबईची वाट लागली
मुंबईमात्र नेहमी सारखीच
पुन्हा धावायला लागली

खिशाकडे हात जाताच
वर बघून म्हटला
पैसे नकोत सरदार
मनात भकासपणा दाटला

मुंबईकरांचं धैर्य पाहून
मोडलाय माझा कणा
छातीवरती बंदुक ठेवून
फक्त मर म्हणा!

Thursday, September 27, 2007

आकाश उजळले होते

इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
(पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?)

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते

घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते

कवी - सुरेश भट

Wednesday, September 26, 2007

मी कधीच नाही म्हटंल की...

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
कदाचीत माझ्या नजरेतला भाव तुला कधी कळलाच नाही म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
माझ्या डोळ्यातुन ओघळणारा अश्रू तु कधीच टिपला नाहीस म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
भोवतालच्या मित्र-मैत्रिणींच्या गर्दीत मला कधी पाहीलच नाहीस म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
आपल्या ह्रदयाच्या रेशीमगाठी कधी जुळल्याच नाहीत म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
कारण मनातल्या भावना कधी ओठांपर्यंत पोहचल्याच नाहीत म्हणुन

पण आता मी बोलणार आहे
ह्रदयाचे सर्व बंध उलघडणार आहे
कारण मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन...

Monday, September 24, 2007

आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!

आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!

एकमेकांना, दिलेल्या दुःखांवर

एकमेकांसोबत, घालवलेल्या

अनेक आनंदी क्षणांचा, लेप लावण्यासाठी..

आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!

अनेक जुन्या, आठवणींनी आणलेले

एकमेकांच्या, डोळ्यातील आनंदाश्रु पुसण्यासाठी…..

आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!

आयुष्यात पुढे येणारया, अनेक दुःखी क्षणांच्या वेळी

एकमेकांच्या हातात, चेहरा लपवून मनसोक्त रडण्यासाठी!

आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!

प्रत्येक दुःखी, क्षणानंतर येणारया आनंदी क्षणात

एकमेकांचा, हात धरण्यासाठी एकमेकाला, सावरण्यासाठी…………

आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!

Friday, September 21, 2007

हनुमान

आक्रित विक्रित
वगैरे काय काय
घडायला लागलंय...
पोरगं येता जाता
चक्क पाया पडायला
लागलंय....||

का तर म्हणे Daddy सध्या
मी Superman नाही Hanuman आहे....
मी म्हणलं होक्का?
छान आहे!! ||


बायको म्हणाली
सोन्यासारखं पोर माझं
करतंय संस्कृतीचं रक्षण
चेष्टा सुचतीय तुम्हाला
जळ्ळं मेलं लक्षण... ||


अंजनीच्या पठिंब्याने
पवनपुत्र हसू लागला
घरातला झिरोचा बल्ब
ही त्याला सुर्याचा गोळा' दिसू लागला..... ||

रोज नवे पराक्रम..
रोज नवे उड्डाण..
बिल्डिंग हवालदील....
सोसायटी हैराण ||


संध्याकाळी घरी येताना
रोज चिंता जागलेली
कोण जाणे आज
कोणत्या लंकेला आग लागलेली... ||


शेवटी शेपूट सरसावून म्हणालो
'प्रिये हे अवघड होत चाललंय विलक्षण
हे केवळ टि. व्ही. चं खूळ आहे,
नाही संस्कृतीचं रक्षण'.. ||


म्हणाली उतरतंय जरासं खूळ तो आता जरा
At Ease होतोय..
पण मला बाई वेगळीच चिंता लागलीय
उद्या लॉर्ड कृष्णा रिलीज होतोय....||


कवी - वैभव जोशी