Monday, April 13, 2009

मी नाही!

जिवंत कोण? कुणालाच बातमी नाही
दिसे हरेक तरी... सावली हमी नाही

किती धुवाल तुम्ही रक्त शेवटी अमुचे
पचेल खून असा रंग मोसमी नाही

जपून वेच, फुले ही जनावरांसाठी
अरे, वसंत असा येत नेहमी नाही!

अम्हास रोज तुझे शब्द सांगतो वारा
तुला कळेल... तुझी शॄंखला घुमी नाही

धनुष्यबाण जरी शोधशोधतो आम्ही
कसे अरण्य, इथे एकही शमी नाही!

दिलास तूच मला तूच हा रिता पेला
नसेल थेंब, तरी धुंद ही कमी नाही!

विचारतेस कशी बावरुन ताऱ्यांना...
घरासमोर तुझ्या चांदण्यात मी नाही!


गझलकार - सुरेश भट.

1 comment:

  1. चांदण्यात फिरताना माझा धरलास हात !
    सखया रे, आवर ही सावर ही चांदरात !

    निजलेल्या गावातुन आले मी एकटीच;
    दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच;
    ह्या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात !
    चांदण्यात फिरताना माझा धरलास हात !
    सखया रे, आवर ही सावर ही चांदरात !

    सांग कशी तुजविनाच पार करू पुनवपूर ?
    तुज वारा छळवादी अन्‌ हे तारे फितूर !
    श्वास तुझा मालकंस ! स्पर्श तुझा पारिजात !
    चांदण्यात फिरताना माझा धरलास हात !
    सखया रे, आवर ही सावर ही चांदरात !

    जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून,
    पण माझी तुळस तिथे गेली रे हिरमुसून
    तुझिया नयनात चंद्र ! माझ्या हृदयी प्रभात !
    चांदण्यात फिरताना माझा धरलास हात !
    सखया रे, आवर ही सावर ही चांदरात !

    गीत : सुरेश भट
    स्वर : आशा भोसले
    संगीत : हृदयनाथ मंगेशक

    ReplyDelete