Friday, January 23, 2009

चल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली

चल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली
बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली

मंदावला कधीचा गगनात शुक्रतारा
अन्‌ चोरपावलांनी आला पहाटवारा
गालांवरी उषेच्या आली हळूच लाली

घे आवरून आता स्वप्नांतला पसारा
बेचैन गोकुळाने केला तुझा पुकारा
तव गीत गात सारी ही पाखरे उडाली

तुज दूर हाक मारी कालिंदिचा किनारा
कुंजांतल्या फुलांनी केला तुला इशारा
तुज शोधण्यास वेडी राधा पुन्हा निघाली


कवी - सुरेश भट

2 comments:

  1. फारच छान ही कविता पूर्ण वाचायचीच होती .

    ReplyDelete
  2. पहाटे पहाटे मला जाग आली
    तुझी रेशमाची मिठी सैल झाली !

    मला आठवेना... तुला आठवेना ...
    कशी रात्र गेली कुणाला कळेना
    तरीही नभाला पुरेशी न लाली !
    तुझी रेशमाची मिठी सैल झाली !

    गडे हे बहाणे, निमित्ते कशाला ?
    असा राहू दे हात माझा उशाला
    मऊमोकळे केस हे सोड गाली !
    तुझी रेशमाची मिठी सैल झाली !

    कसा रामपारी सुटे गार वारा
    मला दे उशाशी पुन्हा तू उबारा
    अता राहू दे बोलणे, हालचाली !
    तुझी रेशमाची मिठी सैल झाली !

    तुला आण त्या वेचल्या तारकांची
    तुला आण त्या जागणाऱ्या फुलांची
    लपेटून घे तू मला भोवताली !
    तुझी रेशमाची मिठी सैल झाली !

    गीत : सुरेश भट
    संगीत : रवि दाते
    स्वर : सुरेश वाडकर

    ReplyDelete